ब्रेकिंग न्यूज़
एक सर्वांगसुंदर कार्यक्रम ः ‘सृजनसंगम’

एक सर्वांगसुंदर कार्यक्रम ः ‘सृजनसंगम’

सृजनसंगम हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मुलं मजा-मस्ती करतातच, पण या व्यतिरिक्त मुलं ज्ञानाचा साठा घेऊन जातात. हा कार्यक्रम कलागुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतो. आताची मुलं सोशल मिडियावर आपला मौल्यवान वेळेचा गैरवापर करून नको त्या गोष्टींमागे पळतात व खरं जीवन जगण्याचं विसरून जातात. त्यांना बरोबर वळणावर येण्याचं मार्गदर्शन आम्हांला ‘सृजनसंगम’सारख्या कार्यक्रमात मिळतं. हे मार्गदर्शन आपल्या जीवनात आवश्यक आहे कारण आताचा युवा वर्ग स्वतःला एवढे व्यस्त करून घेतो आहे की त्यांना स्वतःकडे पाहायलाही वेळ नसतो. स्वतःकरताच ते अनोळखी आहेत. आपल्यामध्ये कोणते कला-गुण आहेत, याची जाणीवच त्यांना नसते.
जीवनात चुका होणेही गरजेचं आहे कारण चुका झाल्याशिवाय अचूक मार्गाची ओळख आम्हाला होत नाही. स्वतःचं जीवन चौकटीत न ठेवता, त्याच्या बाहेर आलं पाहिजे, तरंच कळतं की जग किती मोठं आहे. नाहीतर स्वतःचं आयुष्य तुम्ही स्वतः आखलेल्या सीमेपर्यंतच जर मर्यादित असेल तर या समाजाला तुम्ही स्वतःची ओळख नाही करून देऊ शकत! लोकांमध्ये मिसळून, वेगवेगळ्या लोकांच्या सहवासात नाही राहिलात, तर जगाच्या पाठीवर आपल्याला कुठेही आनंद मिळणार नाही. कारण आपण आपलं जीवन फक्त आपल्यापुरतं मर्यादित ठेवलेलं असतं.
‘सृजनसंगम’ हा वेगवेगळ्या कलागुणांचा संगम होय. स्वतःच्या आयुष्याला वळण कसं द्यायचं, जीवनाला अर्थ कसा द्यायचा, या समाजात आपली ओळख स्मरणीय कशी करायची… हे सगळं आपल्यावर निर्भर असतं. प्रत्येक माणूस कलागुणांनी संपन्न असतो. फक्त योग्य वेळेवर आणि योग्य ठिकाणी याची जाणीव त्याला व्हायला हवी. सतत नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला याची जाणीव होणे थोडे अवघडच! ‘सृजनसंगम’सारख्या कार्यक्रमांना गेल्यावर आपल्याली मिळून-मिसळून कसं रहायचं, याचा अनुभव येतो.
वेगवेगळे विद्यार्थी, वेगवेगळ्या कला क्षेत्रात असणारे ‘सृजनसंगम’मध्ये एकत्र येतात. यात खूप स्पर्धा आयोजित केल्या जातात. आपल्या कलेची खरी परीक्षा अशाच वेळेला होते, जेव्हा आपण स्पर्धेत भाग घेतो, सर्वांसमोर आपली कला सादर करतो. स्पर्धेत भाग घेणे आणि जिंकणे यात फरक आहे. थोडी मुलं जिंकण्यासाठीच स्पर्धेत भाग घेतात तर काही मुलं आपल्यात कला आहे याची जाणीव घेऊन भाग घेतात. त्यात त्यांना बक्षीस मिळो अथवा न मिळो, त्यांना काही फरक पडत नाही. मात्र स्वतःला कमी न लेखता ते सकारात्मक दृष्टीने विचार करतात. स्वतःच्या कलेला लोकांसमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळाली व त्यातून त्यांना खूप काही नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या, तर त्यात त्याला समाधान मिळतं.
‘सृजनसंगम’ हा मराठी भाषेतून केलेला कार्यक्रम आहे, ज्यात मेंदी, रांगोळी, फुलांची वेणी अशा अनेक स्पर्धाही आयोजित केल्या जातात… यातून आपल्याला कलेला प्रतिसाद कसा मिळवायचा हे कळतं आणि जीवन कसं जगायचं याचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. कलेच्या माध्यमातून आपल्याला एक ओळख मिळते. माणूस शरीराने जरी नसला तरी त्याची कला त्याला लाखो लोकांच्या हृदयात अनेक वर्षे अजरामर ठेवते.
‘सृजनसंगम’ हा गोवा मराठी अकादमीने युवा-युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आखलेला सर्वांगसुंदर कार्यक्रम. गोव्यातील विविध महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालयातील दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यात सहभाग दर्शवला होता. मराठी भाषा – संस्कृती यांच्याशी युवा मने जोडली जावीत, याचसाठी केलेला हा प्रयत्न यशस्वी झाला. खास म्हणजे या सृजनसंगमाचे आयोजन तरुण-तरुणींनीच केले होते. या कार्यक्रमात एक शिस्त होती, संस्कृती होती. युवा कलाकारांचा तो एक उत्स्फूर्त संगम होता. प्रमुख पाहुणे श्री. योगेश सोमण यांचे समारोपाचे भाषण तर युवकांना प्रेरणा देणारेच होते. सृजनसंगमने मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या.