एक्झिट पोल अंदाजांनुसार केंद्रात पुन्हा एनडीएची सत्ता

लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होण्याआधी काल विविध एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टाईम्स नाऊ – व्हीएमआर यांच्या एक्झिट पोलनुसार एकूण ५४२ जागांपैकी एनडीएला ३०६ जागांवर विजयाची शक्यता आहे. तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए १३२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एबीपी – नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला २६७, यूपीएला १२७, सपा-बसपा युतीला ५६ व अन्य पक्षांना ८४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार काय, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची कामगिरी कशी होणार, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काय होईल, सपा-बसपाच्या युतीला मतदारांचा पाठिंबा लाभेल काय या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या एक्झिट पोलमध्ये झाला आहे.