ब्रेकिंग न्यूज़
एकजुटीचा संदेश देणारा पारंपरिक धालो

एकजुटीचा संदेश देणारा पारंपरिक धालो

– रश्मिता राजेंद्र सातोडकर
आपल्या गोव्याला लोकसंस्कृतीचा मौल्यवान असा खजिनाच लाभलेला आहे, ज्यात आहे गोव्याची नैसर्गिक संपत्ती, लोकगीतांच्या कहाण्या, धालो, फुगडी यासारखी संस्कृती आजवर आपल्या पूर्वजांनी जपून ठेवली आहे आणि याच पारंपरिक लोकसंस्कृतीत पौष महिन्यात भर पडते धालोत्सवाची!
आला आला ग पौषाचा महिना
धालो पौर्णिमा आली गं
धालो पौर्णिमा आली ग…
असे म्हणत प्रत्येक गावा-गावात धालो खेळले जातात. धालोंमधून आपल्याला पारंपरिक ज्ञानाची प्राप्ती होत असते. याच धालोंच्या निमित्ताने गावातल्या बायका एकमेकांना बोलावून पाच किंवा सात दिवसांचा धालो खेळ खेळतात आणि याच धालोंच्या निमित्ताने बायकांमधील एकजूट आणि त्यांच्यामधील पारंपरिक संस्कृतीची भावना व प्रेम दिसून येते. आणि ही एकजूट त्यांच्या धालोंच्या माणावर दिसून येते जेव्हा सर्व बायका एकत्र येऊन शेणाचा वापर करून उत्सव साजरा करण्यासाठी ‘‘माण’’ तयार करतात. माण म्हणजेच धालो खेळण्यासाठी तयार केलेली जागा. धालो खेळताना बायकांबरोबर मुलींचासुद्धा सहभाग असतो. धालो खेळताना दोन रांगेत बायका एकमेकांच्या कमरेला हात घालून उभ्या राहतात ज्याला ‘‘फातीला’’ राहणे असे म्हणतात. वनदेवतेला नमस्कार आणि प्रार्थना करून धालोला सुरुवात केली जाते.कार्तिक महिना कार्तिक महिना
मालनी पुनये आनन जाला गे
जाला जाल्यार बरा जाला
सखया साद घाला गे…
असे म्हणत गावातील स्त्रिया एकमेकींना मालनी पुनवेचा आनंद धालोत्सवाच्या रूपातून प्रकट करतात. प्रपंचाच्या संपूर्ण दिवसाच्या खटा-खटीतून संध्याकाळी मनाला एक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी अशा प्रकारची लोकसंस्कृती टिकून राहिलेली आहे. पौष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीतही गावातील स्त्रिया धालोच्या माणावर मोठ्या हौसेने धालो खेळत असतात. धालो खेळत असताना स्त्रियांवर एक वेगळेच हास्य निर्माण होत असते. कोणतेही दुःख जरी असले तरीही ते त्यांच्या चेहर्‍यावर न आढळता त्या स्त्रिया आनंदाने खेळ खेळू लागतात आणि याचमुळे त्यांचे लोकसंस्कृतीविषयी प्रेम आणि आत्मीयता दिसून येते.
हाडीले नारळ ओतिले माणार
केली पाच वळी गे
रवळनाथ देव माणार येता
खेळोंक दिल्या मळी गे…
धालो खेळताना बायका दोन रांगेत एकमेकांच्या विरुद्ध कमरेला हात घालून उभ्या राहतात आणि धालोची गाणी म्हणत एका तालात कंबरेत थोडं पुढे वाकून पुढे सरकतात आणि तशाच पुन्हा मागे जात असतात. या धालोच्या गाण्यांतून गावातील स्त्रिया धरती मातेला वंदन करीत असतात.
माणांवर एकमेकींच्या कंबरेला हात घालून स्त्रियांनी तयार केलेली ‘फाती’ म्हणजे तो जणू त्यांच्या एकजुटीचा संदेशच असावा. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी आधुनिक तंत्रे उपलब्ध नसल्याने गावातील सर्व लोक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून जात असत आणि गावातील स्त्रिया स्वतःमध्ये असलेली कला त्याठिकाणी सादर करीत असत. आजच्या युवा वर्गाने फेसबुक, व्हॉटस् अपसारख्या सोशल मिडियावर उगाच स्वतःचा वेळ वाया घालविण्यापेक्षा गावात सुरू असलेल्या सांस्कृतिक वारसा जपणार्‍या कला-कार्यक्रमांमध्ये भाग घेतला तर सर्वांमधील माणुसकीचे आंतरिक संबंध दृढ होऊन त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळेल.