एएफआयने जाहीर केली खेळाडूंना कडक नियमावली

भारतात कोरोना महामारीच्या रुग्णांची संख्या लाखाच्या वर गेलेली आहे. असे असले तरी केंद्र सरकारने गत रविवारी जाहीर केलेल्या चौथ्या टप्प्यात खेळाडूंसाठी काही ढिलाईही दिली आहे. त्यांना सरावासाठी क्रीडा संकुले आणि स्टेडियम्स खुली करण्याचा निर्णय सुनावला. अशात भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने (एएफआय) आपल्या खेळाडूंसाठी कडक नियमावली सादर केली आहे.

या लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना हस्तांदोलन करणे, गळाभेट घेणे, थुंकणे तसेच केशकर्तनालयात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ‘एएफआय’ने शिबिरार्थीसाठी सराव करताना स्वत:ची कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यानुसार, खेळाडूंनी सराव करताना सामाजिक अंतराच्या नियमांचे अचूक पालन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. जर एखाद्या खेळाडूला सर्दी, खोकला, थकवा, श्वास घेण्यास अडचणी येत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना केली आहे. तसेच करोनाची लक्षणे आढळून आल्यास, खेळाडूंनी त्वरित मुख्य किंवा साहाय्यक प्रशिक्षक तसेच उच्च कामगिरी संचालकांशी संपर्क साधण्यास सांगितलेले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवतानाच खेळाडूंनी मैदाना सरावाच्या वेळी प्रशिक्षकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट घेणे टाळावे, शिंकताना नाक आणि तोंड पूर्णपणे झाकावे, मैदानावर थुंकू नये, असा सक्त इशारा दिला आहे. त्याच बरोबर खेळाडूंना केशकर्तनालय, शॉपिंग मॉल तसेच ब्युटी पार्लरमध्ये जाता येणार नसल्याचे स्पष्ट करून बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळावे असा सल्ला दिलेला आहे. खेळाडूने शक्यता एकट्याने सराव करावा आणि यावेळी स्वत:ची पाण्याची बाटली, सॅनिटायझर आणि रुमाल आपल्या जवळ ठेवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.