ब्रेकिंग न्यूज़

‘ऍनिमिया’चे वाढते प्रमाण

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही हा रोग होऊ शकतो. या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये, वाढत्या वयाच्या मुलांमध्ये, जुनाट आजारांनी त्रस्त रोग्यांमध्ये अधिक आढळते. तसेच गर्भिणी अवस्थेत जर आईने व्यवस्थित संतुलित आहार व आयर्न व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेतल्या नाहीत तर बाळालाही रक्ताल्पता (ऍनिमिया)चा त्रास होऊ शकतो.

बदलती जीवनपद्धती, आधुनिकीकरण, निःसत्व आहार सेवन, तणावग्रस्त जीवन, स्पर्धेचे युग, दुसर्‍यापेक्षा पुढे जाण्याच्या शर्यतीत आपलं शरीर मात्र थकत आहे. रस-रक्तक्षय होत आहे. जीवनाची गती कमी होत आहे. ‘ऍनिमिया’सारखा आजार शरीराला विळखा घालून बसला आहे.

आहारामध्ये हिरव्या भाज्या, शेंगा प्रकारातील भाज्या, मसूर, तूर, गूळ, खजुर, डाळींब, गहू, जुने तांदूळ, तूप यांत बरेच लोह असते. या आहारीय द्रव्याबरोबर मोड आणलेल्या कडधान्यांचा वापर केल्यास लोह रक्तात मिसळण्यासाठी सहाय्यभूत ठरते.

रक्त म्हणजे जीवन, म्हणूनच अति रक्तस्राव झाला व त्याचा अटकाव करता आला नाही तर, जीवनयात्रा धोक्यात येते किंवा संपते. अशा या जीवनरूपी रक्ताची जेव्हा हानी होते किंवा जेव्हा शरीरात रक्ताल्पता आढळते तेव्हा शरीर मृत व्यक्तीप्रमाणे निस्तेज बनते. प्रभा व कांती यांची हानी होते. रोगी फिका दिसू लागतो. आयुर्वेद शास्त्रात यालाच पाण्डूरोग असे म्हणतात.

केवड्याच्या कणसातील गाभा जसा फिकट, निस्तेज दिसतो तशी पांडुरोगामध्ये त्वचा दिसते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही हा रोग होऊ शकतो. या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये, वाढत्या वयाच्या मुलांमध्ये, जुनाट आजारांनी त्रस्त रोग्यांमध्ये अधिक आढळते. तसेच गर्भिणी अवस्थेत जर आईने व्यवस्थित संतुलित आहार व आयर्न व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेतल्या नाहीत तर बाळालाही रक्ताल्पता (ऍनिमिया)चा त्रास होऊ शकतो.

पूर्वी सकस आहार पद्धतीमुळे व सकष्ट कामाच्या व्यायामाने पांडुरेगाचे प्रमाण फारच कमी होते. हा रोग पूर्वी गरीब जनतेला, ज्यांच्यामध्ये पौष्टीक आहाराची कमतरता आहे अशांनाच भेडसावत असे, पण आता मात्र ‘ऍनिमिया’ने प्रत्येकजणच ग्रस्त असल्यासारखा वाटतो. अगदी काही अपवाद सोडता, बदलती जीवनपद्धती, आधुनिकीकरण, निःसत्व आहार सेवन, तणावग्रस्त जीवन, स्पर्धेचे युग, दुसर्‍यापेक्षा पुढे जाण्याच्या शर्यतीत आपलं शरीर मात्र थकत आहे. रस-रक्तक्षय होत आहे. जीवनाची गती कमी होत आहे. ‘ऍनिमिया’सारखा आजार शरीराला विळखा घालून बसला आहे याचे भान मात्र कुणालाच राहिलेले नाही.

‘मल्टीटास्क’ निभावणारी स्त्री नेहमी निरुत्साही, निस्तेज, थकल्यासारखी (मेकअप उतरविला की हाच चेहरा) पुरुषवर्ग म्हणजे घर्‍चा कर्ता जो संपूर्ण दिवस मेहनतीचे काम करून आनंदी चेहर्‍यानी आपल्या मुलाबाळांकडे घरी वळायचा तो आत चिडचिड करतच घरांत शिरतो. मुले खेळणे, खोड्या करणे, व्यायाम करणेच विसरली. अभ्यासही सोफ्यावर झोपून, धावताना धाप लागते… असेच काहीसे चित्र खेडोपाडी, गावां-शहरांमध्ये दिसत आहे. या ‘ऍनिमियाचा’ एवढा अतिरेक झाला की त्यासाठी केंद्र सरकारने ‘वीकली आयर्न अँड फॉलिक ऍसिड सप्लिमेन्टेशन’ नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना दर आठवड्याला ठराविक दिवशी ऍनिमिया – नियंत्रक गोळ्या दिल्या जातात. गर्भारपणात संपूर्ण नऊ महिने व प्रसुतीपश्‍चात सहा महिने फॉलिक ऍसिड व आयर्नची खुराक दिली जाते. आजची पिढी उद्याची देशाची संपत्ती आहे, विकासाचे मूळ आहे. हे मूल असे निकृष्ट होऊन कसे चालणार? त्यामुळे वाढत्या ‘ऍनिमिया’च्या समस्येकडे पाहता केंद्र सरकारला हे पाऊल उचलणे भाग पडले.
ऍनिमिया म्हणजे काय?….
ऍनिमिया म्हणजे सोप्या भाषेत रक्तातील लाल पेशी व हिमोग्लोबीनच्या प्रमाणामध्ये कमतरता. हिमोग्लोबीन हा लाल रक्तपेशीमधील प्रमुख घटक असून तो सर्व शरीरातील पेशी व अवयवांना प्राणवायूचा पुरवठा करतो. रक्तातील लाल रक्तपेशी व हिमोग्लोबीन कमी झाल्यास शरीरात प्राणवायूचा योग्य पुरवठा होत नाही व ऍनिमिया होतो. ‘हिमोग्लोबीन’ हे एक प्रथिने् आहे. हिम म्हणजे आयर्न व ग्लोबीन म्हणजे अमिनो ऍसिड प्रोटीन. आपल्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी होत असल्याने आपल्या भारतातील प्रत्येक मुलामध्ये खेळाडू बनण्याची क्षमता असूनही आपण मागे पडतो.
पुरुषांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण साधारणतः १४ ते १८ व स्त्रियांमध्ये १२ ते १६ असावे.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ….
स्वकारणांनी प्रकूपित झालेले दोष, हे पित्ताची अधिक दुष्टी निर्माण करतात. हे प्रकूपित झालेले पित्त रसरक्त यांच्याबरोबर सर्व शरीरात संचार करते आणि शरीराच्या सर्व धातूंच्या ठिकाणी शैथिल्य उत्पन्न होते. हेच प्रकूपित पित्त हृदयात प्रवेश करून सर्वत्र प्रक्षेपित होते म्हणूनच मनोदैन्य, भीति वाटणे यांसारखी लक्षणे उत्पन्न होतात. शरीरातील सर्वच धातूंची उत्पत्ती नीट होत नसल्याने शरीरातील बल, वर्ण, स्नेह हे भाव आणि ओज यांचा क्षय होऊ लागतो. सर्व शरीराच निःसार बनते. अर्थग्रहणाचे कार्य त्यांच्याकडून योग्यप्रकारे होत नाही. विशेषतः रक्त व मेद या धातूंचा क्षय अधिक प्रमाणात दिसून येतो. सर्व शर्‍ीरावर वैवर्ण्य उत्पन्न होते. त्याचप्रमाणे रक्तवहस्रोतसाचे मूलस्थान असणार्‍या यकृताची व पर्यायाने रंजक पित्ताची दुष्टी होते. रसाला रंजकत्व प्राप्त करून देणे हे रंजक पित्ताचे कार्य या व्याधीत योग्य प्रकारे होत नाही. रक्तपोषक तत्त्वांचा आहारातील अभाव आणि रंजक पित्तामध्ये आढळणारी विकृती यामुळे रक्तक्षय होतो व पांडूरोग (ऍनिमिया) होतो.
ऍनिमियाची कारणे ….
बदललेली जीवनशैली म्हणजे काय?,,,
– हिरव्या भाज्या न खाणं, बीट-गाजर अशा कंदमुळांचा अभाव, जास्त तेलकट-मसालेदार-चटपटीत खाणं, फास्टफूडचा अतियोग, अन्न पचलेले नसतानाही खाणे, खाल्ल्यानंतर – जेवणानंतर लगेच झोपणे, व्यायामाचा अभाव.
– मानसिक दडपण.
– लघवी-संडास अशा वेगांचे धारण
– आघाताने झालेल्या व्रणातून जीवरक्त शरीराबाहेर अधिक प्रमाणात जाणे
– जिवाणू (हूकवर्म)चा प्रादुर्भाव
– लघवीमध्ये संसर्ग होऊन लघवीवाटे रक्त पडणे.
– पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्त जाणे.
– प्रसुतीपश्‍चात अधिक रक्तस्राव
– ‘डाएट’च्या नावाखाली पोषक आहाराचा अभाव.

ऍनिमियाची लक्षणे ….
* त्वचा, नखं, नेत्र यांच्या ठिकाणी पांडुता येते. हे अवयव निस्तेज होतात, कांतिहीन होतात.
* शरीरावर रूक्षता निर्माण होते. अंग मोडल्यासारखे वाटते.
* तोंडात सारखी थुंकी येते.
* लघवी पिवळी होते.
* खाल्लेले पचन नाही. घशाकडे येत राहते.
* काहींना माती खाण्याची इच्छा होते.
* कानांतून आवाज आल्यासारखा वाटतो.
* भूक लागत नाही. जेवण जेवताना नकोसे वाटते.
* तोंडाला चव नसते.
* पायात गोळे येतात.
* अल्पश्रमानेही श्‍वास लागतो.
* केस गळतात
* छातीत धडधड होते.
* व्यक्ती त्रासिक व चिडचिडे होतात. झोप फार येते.
* सारखा राग येत राहतो.
* बर्‍याच दिवसांपासून लोहाची कमतरता असल्यास जिभेवर किंवा तोंडात घाव येतात. गिळताना त्रास होतो.
लोहाच्या कमतरतेच्या लक्षणांना फार मोठ्या तक्रारींनी सुरुवात होत नाही, अगदी थकव्यासारख्या सामान्य लक्षणांपासून सुरुवात होते.
ऍनिमियामधील चिकित्सा ….
– यामध्ये स्नेहन महत्त्वाचे आहे. स्नेहनासाठी दाडिमादी घृत, द्राक्षाघृत, तिक्तक घृत यांसारख्या सिद्ध तुपांचा वापर करावा.
– पित्तप्रधान व्याधी असल्याने शोधताना मृदु विरेचन द्यावे. त्यासाठी आरश्‍वध, मनुका, गंधर्वहरितकीसारख्या मृदु विरेचन द्रव्यांचा वापर करावा.
– लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लोहकल्पांचा वापर करावा., लोह, ताम्र, रौप्य आणि अभ्रक हे धातू उत्तम आहेत.
– सुवर्णमाक्षिक भस्म हे एक अत्यंत उपयुक्त असे औषध आहे.
– आरोग्यवर्धिनी, सूतशेखरसारखे ताम्रकल्प यकृतावर कार्य करणारे लोहवृद्धीसाठी उपयुक्त आहे.
– सप्तधातुंच्या ठिकाणी येणारे दौर्बल्य तसेच ओजक्षय नाहीसा करण्यासाठी च्यवनप्राशासारखे आमलकी कल्प वापरावेत.
– त्याचप्रमाणे धात्र्यावलेह, अश्‍वगंधावलेह, कुष्मांडावलेह, शतावरी कल्प यांसारखे बल्य, सप्तधातुवर्धक कल्प सहाय्यभूत आहे.
रक्तामध्ये लोह कमी आहे म्हणून फक्त उत्तम लोहकल्प दिले म्हणून होत नाही. कारण लोहकल्पांचेसुद्धा पचन व्हावे लागते. रक्ताल्पतेत यकृतामधील पचनक्रिया बिघडते. त्यामुळे पचनाकरिता प्रथमोपचार करावेत व ‘ऍनिमिया’चा कोणता प्रकार आहे याचे निदान झाल्यावरच औषधोपचाराला सुरुवात करावी.
ऍनिमियामध्ये फक्त टॉनिक घेतले म्हणून त्याचा उपयोग नाही. या टॉनिकबरोबर आहाराचीही जोड हवी.
– मांसाहार सेवन करत असल्यास लोह पटकन रक्तात मिसळते. यासाठी मांसरस, सकृतरस सेवनाला प्राधान्य दिले आहे.
– शाकाहार सेवन करताना लोहाची पूर्तता होण्याआधी लोहाबरोबर ‘क’ जीवनसत्वाची गरज असते, म्हणूनच जेवणाबरोबर लिंबाचे लोणचे, आवळ्याचे लोणचे खावे किंवा निदान लिंबाची फोड तरी घ्यावी.
– आहारामध्ये हिरव्या भाज्या, शेंगा प्रकारातील भाज्या, मसूर, तूर, गूळ, खजुर, डाळींब, गहू, जुने तांदूळ, तूप यांत बरेच लोह असते. या आहारीय द्रव्याबरोबर मोड आणलेल्या कडधान्यांचा वापर केल्यास लोह रक्तात मिसळण्यासाठी सहाय्यभूत ठरते.
– रोजच्या जेवणात धान्य व डाळीच्या एकत्रित समावेश असावा.
– रोज एक चमचा तूप किंवा लोणी जेवणाबरोबर घ्यावे.
उत्तम संतुलित आहार व योगसाधनेच्या आधारे ‘ऍनिमिया’वर मात करता येते.