ऍड. पांडुरंग नागवेकरांचे इतिहास लेखन अभ्यास व पुराव्यांनिशी ः मंत्री गावडे

0
648

इतिहास लेखनासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. काहीवेळा चुकीचा इतिहास पुढे येत असतो, मग त्याची उलटसुलट चर्चा होते; मात्र पांडुरंग नागवेकर यांनी अभ्यासाअंती पुराव्यांनिशी इतिहास लेखन केले आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी येथे केले.

शिल्पकार प्रकाशन, वळवई, गोमंतक मराठी अकादमी आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने ऍड. पांडुरंग नागवेकर यांच्या ‘गोमंतकाची मातृभाषा’, ‘सच्चे हिंदू इथे चिरविश्रांती घेत आहेत’ व ‘गोमंतकाची बखर’ अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन इन्स्टिट्यूट ब्रागांझाच्या सभागृहात रविवारी करण्यात आले. त्यावेळी गोविंद गावडे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, समाज कार्यकर्ते अतुल कृष्णा वेर्लेकर, प्रमुख वक्ते प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, द. वा. तळवणेकर व प्रभाकर ढगे तसेच प्रकाशक सौ. शिल्पमाला पां. नागवेकर, लेखक ऍड. पांडुरंग नागवेकर व इन्स्टिट्यूट ब्रागांझाचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर गोरख मांद्रेकर उपस्थित होते.

याप्रसंगी वेदमूर्ती हरी विश्‍वनाथ अभिषेकी आणि इंदिरा ह. अभिषेकी, तुळशीदास दत्तू नागवेकर, कै. तुकाराम सुभाष शिरोडकर व कै. दिना काणकोणकर यांचा सत्कार करण्यात आला. तुकाराम व दिना यांचा सत्कार अनुक्रमे स्नुषा स्मिता व पत्नी यशोदा यांनी स्वीकारला. शिल्पमाला नागवेकर यांनी प्रास्ताविक केले. परेश प्रभू यांनी, या पुस्तकांमागे इतिहास संशोधनाची दृष्टी आहे. हा दस्तावेज आहे असे नमूद करून ते म्हणाले, ‘गोमंतकाची मातृभाषा’ हा त्यांचा ग्रंथ भाषिक संघर्षाच्या मुळाशी जाणारा ग्रंथ आहे. इतिहासात नोंद घेतली जाईल असे हे ग्रंथ आहेत.