ऋतुबदलाच्या काळात घ्यावयाची काळजी

  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

कोरोनाचे संकट अजूनही वाढले असल्याकारणाने हलका सुपाच्य आहार घ्यावा. नेहमी गरम पाणी प्यावे. आंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर करावा. गुडुचीचूर्णाचा काढा प्यावा किंवा तुळस, दालचिनी, मिरे, सुंठ यांचा काढा प्यावा, जेणेकरून आपली व्याधी प्रतिकारशक्ती वाढेल व या ऋतूसंधीच्या काळातसुद्धा आपण आपले आरोग्य टिकवू शकू.

सद्य परिस्थितीत आरोग्याच्या रक्षणार्थ हेतू आयुर्वेद शास्त्राच्या आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आयुर्वेद हे एकमेव असे शास्त्र आहे ज्यामध्ये रोगाच्या चिकित्सेबरोबर निरोगी आयुष्य कसे जगावे याचे यथार्थ ज्ञान दिले आहे. आता आठवड्याभरापूर्वी सूर्याच्या संतप्ततेने अंगाची नुसती लाही लाही होत होती. पण पावसाच्या आगमनाने बाह्य वातावरणात अगदी परस्पर विरोधी असा बदल झाला. शेवटी ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानुसार बाह्य जगतात जे जे बदल होत असतात त्यानुसार आपल्या शरीरातही सतत बदल होत असतात. याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रात आरोग्य रक्षणासाठी ऋतुचर्या सांगितली आहे.

शरीरातील दोषादिकांची अंतःस्थिती व सतत बदलती बाह्यस्थिती यातील विरोध टाळून, सुसंवाद निर्माण करून कायम ठेवणे हेच ऋतुचर्येचे उद्दिष्ट आहे.

‘सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणम्’… या आयुर्वेदाच्या प्रमुख सिद्धान्ताचा विचार करूनच ऋतुचर्येचा विचार केलेला आहे.
ऋतू म्हणजे काल मोजण्याचे एक परिमाण आहे. संपूर्ण वर्षांत एकूण सहा ऋतू असतात. हेमंत- शिशिर (हिवाळा); वसंत- ग्रीष्म (उन्हाळा); वर्षा- शरद (पावसाळा) असे हे विभाजन आहे.
आहार- विहार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक ऋतूनुसार आपल्या राहणीमानात, खाण्यापिण्यात, वागण्यात बदल केले असता आपण आरोग्याचे उत्तम प्रकारे रक्षण करू शकतो.

भारतीय कालगणनेनुसार दोन महिन्यांचा एक ऋतू होतो. कोणताही ऋतू कधी सुरू होतो व कधी संपतो हे नुसत्या तारखेवरून समजू शकत नाही. कारण सृष्टीतले बदल ठरावीक साच्याप्रमाणे होतीलच असे नाही. सांगितलेल्या महिन्यावरून ऋतूची साधारण कल्पना येऊ शकते. ऋतू कधी सुरू झाला आणि कधी संपला हे आपल्याला बाह्य वातावरणात होणार्‍या बदलावरूनच ठरवावे लागते. तसेच आपण राहतो त्या प्रदेशानुसारही ऋतू थोडा थोडा बदलत राहतो… जसे केरळात पावसाला लवकर सुरुवात होते, गोवा-महाराष्ट्र थोड्या दिवसांनी तर गुजरातमध्ये पावसाळा सुरू व्हायला अजून जास्त वेळ लागेल. कधी- कधी एखादा ऋतू त्याच्या ठरलेल्या अवधीपेक्षा लांबू शकतो. एखादा ठरलेल्या वेळेच्या अगोदर संपतो. अशावेळी नुसता महिना किंवा तारीख बघून ऋतू निश्‍चित करता येत नाही. नाहीतर बाह्य वातावरणाचे निरीक्षण करून ऋतूचा अंदाज घेऊन आपला आहार-विहार ठरवावा लागतो.

सहा ऋतूनुसार निसर्गात व शरीरात होणार्‍या बदलानुसार खाणे, पिणे, वागणे यात काय बदल करावेत हे जरी खरे असले तरी नुसते कॅलेंडरच्या साहाय्याने ऋतू ठरवू नये तर निसर्गात होणारे बदल पाहून त्यानुसार राहण्या- खाण्यात- पिण्यात- वागण्यात आवश्यक ते बदल करावेत. प्रत्येक ऋतूला साधारण कालावधी सांगितलेला असला तरी ऋतू सुरू झाल्याची लक्षणे जसजशी बाह्य वातावरणात दिसावयास सुरुवात होईल तसतसा एक ऋतू संपून दुसरा सुरू होत आहे हे जाणावे. आयुर्वेदिक ग्रंथात या बदलत्या परिस्थितीला ऋतुसंधी म्हटले आहे.
‘पूर्वस्यर्तोरन्त्यः सप्ताहः उतरस्य चाद्यः सप्ताहः
एव चतुर्दशात् ऋतुसंधिः|’
संपणार्‍या ऋतूचा शेवटचा सप्ताह व सुरू होणार्‍या ऋतूचा पहिला सप्ताह अशा १४ दिवसांच्या मधल्या कालावधीला ऋतुसंधी म्हणतात. एक ऋतू संपून दुसरा सुरू होतो त्या वेळेला वातावरणात हळूहळू बदल होऊ लागतो. दोन ऋतुंच्यामधील हवामानाच्या स्थित्यंतराचा हा जो काल तो ऋतुसंधी – दोन ऋतूना जोडणारा काल.
या ऋतुसंधीच्या काळातच आरोग्यास फार जपावे लागते. पूर्वीच्या ऋतुमानातील वातावरणाचे शरीरास थोडेफार सात्म्य झालेले असते. अशावेळी वातावरणात होणार्‍या बदलाचा परिणाम शरीरावर फार चटकन होत असतो. याचवेळी आहार- विहारावर फारच नियंत्रण ठेवावे लागते.

* पूर्वीच्या ऋतूत योग्य असणारा आहार हा कदाचित पुढील ऋतूचा विचार करता अपथ्यकर ठरण्याची शक्यता असते.
– असेही असले तरी आहार-विहारातील बदल हा अचानक कधीच करू नये.
– जे सात्म्य झालेले असते, असा पहिल्या ऋतूतील आहार हळूहळू कमी करून पुढील ऋतूसाठी योग्य असणारा आहारही हळूहळू सात्म्य करून घेतला पाहिजे.
– जर क्रमाक्रमाने हा बदल घडवून आणला तरच आरोग्य टिकून राहते. अन्यथा असात्म्यज असे विविध रोग होण्याचीच अधिक शक्यता असते.
– ऋतुसंधीचा काळ हा सर्वाधिक काळजी घेण्याचा असतो. कारण शरीराला बाह्य वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्याचे कठीण काम करायचे असते.
– ऋतुसंधीकाळात अनेक वेळा रोग होताना दिसतात. त्यांच्या निवारणार्थ पूर्वी भैषज्ययज्ञ केले जात असत. यामुळे सर्वांचेच आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होत असे. तसेच येणारा ऋतू चांगला यावा, त्याचा अयोग होऊ नये हाही हेतू याच्या मागे असे. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडावा, वादळं, भूकंप अशा आपत्ती येऊ नयेत, पृथ्वीवर साथीच्या रोगांचे आक्रमण होऊ नये, अशा विविध गोष्टी या भैषज्य यज्ञांपासून साध्य होत असत.
उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीतलावरील सर्व जलीय अंश कमी होतो. स्निग्धपणा नाहीसा होतो. रूक्षता वाढते. याच बाह्य वातावरणातील वाढलेल्या रूक्षतेच्या परिणामस्वरूप सर्व धातूंमधील स्नेह व ओलावा उष्णतेने शोषला जाऊन रूक्षता वाढते. याच बाह्य वातावरणातील वाढलेल्या रूक्षतेच्या परिणामस्वरूप सर्व धातूंमधील स्नेह व ओलावा उष्णतेने शोषला जाऊन रूक्षता वाढते. या रूक्षतेमुळेच ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरामध्ये वात दोषाचा संचय होऊ लागतो. तसेच त्वचेवाटे शरीरातील उष्मा बाहेर पडत असल्याने अग्निमांद्यही निर्माण होते. पुढे पावसाळ्यात या संचित झालेल्या वाताला रूक्षतेबरोबरच शैत्याचीही जोड मिळते व हा वात अधिकच प्रकूपित होतो. तसेच बाह्य वातावरणातील आर्द्रता व इतर बाबींमुळे अग्निमांद्यही फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. शरीरात विष्टब्धता निर्माण होऊन पित्तदोषाच्या संचयाला सुरुवात होते.
– म्हणून उन्हाळ्यात ज्या पालेभाज्या सेवनाला हितकर म्हटले त्याच पालेभाज्या पावसाळ्यात सेवन करण्यास निषिद्ध मानल्या आहेत. ऋतुसंधीच्या काळात पालेभाज्यांचे प्रमाण कमी असावे.
– उन्हाळ्यात भाताचे प्रमाण अधिक असले तरी चालते पण पावसाळ्यात मात्र तांदूळ भाजून घेऊन भात करावा. पचण्यास हलका असा आहार घ्यावा. म्हणून ऋतुसंधीच्या काळात नवीन तांदूळ वर्ज्य सांगितला आहे.
– साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या वा पॉपकॉर्न हे पचण्यास हलके पदार्थ आहेत.
– या ऋतूत दूधभात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठले, भाकरी, चपाती असे सहज पचणारे पदार्थ आहारात असावे.
– दुधाच्या पदार्थांपैकी, दूध, दही, ताक, तूप यांसारखे पदार्थ आहारात असणे चांगले असले तरी पावसाळ्यात दही खाऊ नये. ताक मात्र दोन्ही ऋतूत पथ्यकारक आहे.
– डाळी रूक्ष असल्याने उन्हाळ्यात शक्यतो टाळावीत. मुगाचा थोडाफार उपयोग करण्यास हरकत नाही. पण पावसाळ्यात मूग, तूर यांसारख्या डाळींचे वरण वापरणे इष्ट ठरते.
– उन्हाळ्यात लसणीचा अजिबात वापर करू नये. पण पावसाळ्यात लसूण ही उष्ण, स्निग्ध असून उत्तम वातनाशक व अग्निवर्धकही असल्यानेच या ऋतूत वापरणे फायद्याचे ठरते.
– उन्हाळ्यात शीतोपचार अपेक्षित असल्याने आहारातही शीतयुक्त पदार्थ अधिक हवेत. या ऋतूत काकडी, टरबूज, कलिंगड यांसारखी फळे तसेच मधुर – अम्ल रसात्मक द्राक्षे – आंबाही फळेही खाल्ली जातात पण ऋतुसंधीच्या काळापासून मात्र ही फळे हळूहळू वर्ज्य करावीत.
आजकाल कुठल्याही ऋतूत कुठलीही फळे मिळतात पण प्रत्येकाने निसर्गतः ज्या ज्या ऋतूत जी फळे पिकतात त्याच फळांचे सेवन करावे.
– पिण्याचे पाणी चांगले उकळून प्यावे. उन्हाळ्यात जरी माठातील पाणी पीत असला तरी आता पाणी पिण्यासाठी निदान कोमट तरी असावे. पुढे वर्षाऋतुमध्ये चांगले काढ्याप्रमाणे उकळून चहाप्रमाणे फुंकून फुंकून प्यावे.
– थंडगार पाण्याची आंघोळ सोडून कोमट – गरम पाण्याने आंघोळ करावी.
त्यातच कोरोनाचे संकट अजूनही वाढले असल्याकारणाने हलका सुपाच्य आहार घ्यावा. नेहमी गरम पाणी प्यावे. आंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर करावा. गुडुचीचूर्णाचा काढा प्यावा किंवा तुळस, दालचिनी, मिरे, सुंठ यांचा काढा प्यावा. जेणेकरून आपली व्याधी प्रतिकारशक्ती वाढेल व या ऋतूसंधीच्या काळातसुद्धा आपण आपले आरोग्य टिकवू शकू.