ब्रेकिंग न्यूज़

उरुग्वेचा लागणार कस

>> फ्रान्सविरुद्ध आज उपांत्यपूर्व फेरीचा सामना

फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या ‘अंतिम ८’ फेरीला आजपासून उरुग्वे व फ्रान्स यांच्यातील लढतीने प्रारंभ होणार आहे. मागील वेळी ब्राझिलमध्ये झालेल्या विश्‍वचषकात फ्रान्सला उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले होते तर कोलंबियाकडून पराभूत झाल्याने उरुग्वेला उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता.
उभय संघांची खेळण्याची शैली परस्परविरोधी आहे. दोघांची बलस्थाने व कच्चे दुवे वेगळे आहेत. सांघिक कौशल्याच्या बळासाठी उरुग्वेचा संघ ओळखला जातो तर खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरी जोरावर सामना खेचून आणण्याची क्षमता फ्रान्स संघात आहे.

उभय संघांना या सामन्यात आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंविना उतरावे लागणार आहे. पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात उरुग्वेला एकहाती सामना जिंकून दिलेला कवानी पोटरीच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार असून दोन पिवळी कार्डे मिळाल्यामुळे फ्रान्सच्या जेम्स माटुईडी याला हा सामना खेळता येणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत डाव्या बगलेत नबील फकिर किंवा थॉमस लेमार यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात कायलन एम्बापे याने आपल्या वेगाने प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी हादरवून टाकली होती. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ बिथरला होता. उरुग्वेविरुद्ध मात्र असे होणे नाही. उरुग्वेने आघाडी घेणारा गोल केला तर दिएगो गॉडिन व जुझे गिमिनेझ यांचा समावेश असलेली त्यांची दक्ष बचावफळी फ्रान्सच्या आघाडीफळीला रोखण्यास समर्थ आहे. पोर्तुगालच्या पेपेने नोंदविलेला गोल वगळता यंदाच्या कॅलेंडर वर्षात या बचावफळीने अजून एकही गोल स्वीकारलेला नाही. त्यामुळे फ्रान्सला सामन्यातील पहिला गोल करत दबाव टाकावा लागेल.