उरुग्वेकडून इक्वादोरचा धुव्वा

>> कोपा अमेरिका फुटबॉल

स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेजच्या शानदार खेळाच्या जोरावर उरुग्वेने १० इक्वादोरचा ४-० असा धुव्वा उडवित कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत काल शानदार विजयी सलामी दिली.

हा उरुग्वेचा १९६७ नंतरचा कोपा अमेरिका स्पर्धेतील सर्वांत मोठा विजय ठरला. विजयामुळे त्यांनी क गटात अव्वल स्थान मिळविले आहे.
सामन्यात जुझे क्विंटेरोला रेफ्रीने रेड कार्ड दाखवित मैदानावर काढल्याने इक्वादोरला १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. अपेक्षेप्रमाणे सामन्यावर उरुग्वेने बव्हंशी वर्चस्व राखले होते. त्यांनी आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या ६व्याच मिनिटाला आपले खाते खोलले. निकोलास लोडेरोने हा गोल नोंदविला. ३३व्या मिनिटाला एडिनसन कावानीने गोल नोंदवित उरुग्वेची आघाडी २-० अशी केली. तर लुईस सुआरेझने ४४व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल नोंदवित पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत उरुग्वेला ३-० अशा आघाडीवर नेले.

दुसर्‍या सत्रात इक्वादोरने उरुग्वेला चांगली लढत दिली. परंतु ७८व्या मिनिटाला त्यांच्या आर्तुरो मिनाने स्वयंगोलाची नोंद केल्याने उरुग्वेने हा सामना ४-० असा एकतर्फी जिंकला.
दरम्यान, अन्य एका लढतीत कतारने पेराग्वेला २-२ असे बरोबरीत रोखले. ऑस्कर कार्दोजोने ४थ्याच मिनिटाला पेराग्वेला पेनल्टीवर गोल नोंदवित १-० अशी आघाडी मिळवून दिली. डेर्लिस गोन्साल्वीसने ५६व्या मिनिटाला पेराग्वेची आघाडी २-० अशी केली. आल्मोएज अलीने ६८व्या मिनिटाला कतारची पिछाडी १-२ अशी भरून काढली. तर ७७व्या मिनिटाला जुआन रॉड्रिगो रोजासने स्वयंगोल नोंदविल्याने कतारने हा सामना बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले.