उन्हाळ्यातले त्रास

 डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)

या लॉकडाऊनच्या काळात बरीचशी शारीरिक कामे कमी झालीत. एसीमध्ये वावर वाढला त्यामुळे तहान कमी लागते. घामही येत नाही. पाणी पिण्याचे प्रमाण बर्‍यापैकी कमी झाल्याने मूत्रवह संस्थानच्या आजारांना बळ आलेले आहे.

दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या झळा वाढत चालल्या आहेत. मूत्रवह संस्थानाचे आजारही तसेच वाढीला आलेले दिसत आहे. या लॉकडाऊनच्या काळात बरीचशी शारीरिक कामे कमी झालीत. एसीमध्ये वावर वाढला त्यामुळे तहान कमी लागते. घामही येत नाही. पाणी पिण्याचे प्रमाण बर्‍यापैकी कमी झाल्याने मूत्रवह संस्थानच्या आजारांना बळ आलेले आहे.

मूत्रदाह, मूत्रकृच्छ्र, मूत्राघात यांसारखे विकार किंवा लक्षणांनी रुग्ण बेजार झाले आहेत. मूत्रविकारासाठी बरेच रुग्ण दवाखान्यात सल्ला घेण्यासाठी किंवा दूरध्वनीद्वारे सल्ला व उपाय वैद्यांकडे विचारताना दिसतात.
मूत्रविकाराची कारणे –
* अतिव्यायाम
* रुक्ष पदार्थांचे सेवन
* आनूप मांस व मासे अधिक प्रमाणात खाणे
* अध्यशन
* अजीर्ण
* मल, मूत्र, शुक्र आदी वेगांचे विधारण करणे
* दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे
* अति चमचमीत, विरुद्धाहार सेवन
मूत्रविकाराची लक्षणे –
– लघवी करताना जळजळ
– बस्ती, कुक्षी, उदर, पार्श्‍व, हृदय इ. ठिकाणी वेदना
– आध्मान
– मूत्र करतेवेळी वेदना
– वारंवार थोडी थोडी मूत्रप्रवृत्ती
– पीतवर्णाचे मूत्र
– मूत्रावरोध
मूत्रविकारामधील सामान्य औषधोपचार
– कटि, पार्श्‍व, उदर, वंक्षण, सक्थि या प्रदेशी तेलाने स्नेहन करावे.
– अवगाह स्वेद
– मूत्रल औषधांमध्ये तृणपंचमुल, गोक्षुर, पुनर्नवा, रिंगणी, पलाशपुष्प इ. द्रव्यांचा वापर विशेषत्वाने केला जातो.
– शिलाजतु, त्रिवंग, गुग्गुळ कल्प लाभदायी ठरतात.
– चंदन, कमळ, वाळा, नागरमोथा, पर्पटक. प्रवाळ, मौक्तिक, कामदुधा इ. शीतवीर्य औषधांचा प्रयोगही केला जातो. मृदुविरेचनासाठी एरंडस्नेह उपयुक्त ठरतो.
– शतावरी, काश, कुश, गोक्षुर, विदारी, इक्षुमूल, उशीर यांचा क्वाथ थंड करून मध व साखरेबरोबर देण्याने पित्तज मूत्रकृच्छ्र त्वरेने कमी होते.

– कमल, शृंगारक, काकडीचे बी, द्राक्ष, पाषाणभेद यांनी सिद्ध केलेले जल शर्करायुक्त देणे लाभदायी ठरते.
– नाचणीचे पीठ मध घालून मेंढीच्या दुधाबरोबर सात दिवस सेवन केले असता मूतखड्याचे बारीक तुकडे होऊन तो लघवीद्वारे बाहेर पडतो.
– शेवग्याच्या मुळांचा काढासुद्धा मूतखड्यामध्ये उपयुक्त ठरतो.
– लघवीच्या वेळी फार वेदना होत असल्यास ब्राह्मी मुळांच्या कल्कात सिद्ध केलेले दूध प्यावे.
– त्रिफळा चूर्ण सैंधव घालून ऊन पाण्यात कालवून प्यावे.
– चंद्रप्रभा वटी, गोक्षुरादी गुग्गुळ, पुनर्नवादी काढा, वरुणादी काढा, शिलाजतु, सारिवाद्यासव, चंदनासव इ.
कोणत्याही आजारांमध्ये औषधोपचार करताना वैद्याचा सल्ला नक्की घ्यावा.

काही घरगुती काढे किंवा पेय
* धने – जिर्‍याचा काढा ः चार कप पाण्यात १ चमचा धन्याची भरड व १ चमचा जिर्‍याची भरड घालून चांगले उकळावे. १ कप पाणी शिल्लक उरेपर्यंत उकळावे. या एक कप काढ्यात चवीसाठी थोडासा गूळ टाकून किंवा नुसताच हा काढा रोज सकाळ-संध्याकाळी सेवन करावा. याने लघवीला साफ होते व जळजळ लगेच थांबते.
* चार- पाच पळसाची फुले रात्री एक कप पाण्यात भिजत ठेवावी व सकाळी चार कप पाण्यात ती फुले चांगली कुस्करून उकळावी व हे पाणी दिवसभर पिण्यास द्यावे. यामुळे लघवी साफ होऊन वेदनापण कमी होतात.
* पुनर्नवाच्या पानांचा स्वरस साधारण ३० मिलि, दिवसातून तीन वेळा घेतल्याने लघवीच्या बर्‍याच विकारांपासून मुक्ती मिळते. पुनर्नवाचा काढाही करून सेवन करता येतो.
* तुळशीच्या बिया दुधात किंवा पाण्यात शिजवून सेवन केल्याने लघवीची जळजळ थांबते.
* धणे, मुस्ता, उशीर, शुंठी व बिल्वदल सममात्रेमध्ये घेऊन काढा करून सेवन केल्यास मुत्रकृच्छ्र, मूत्राघात, मूत्राश्मरीमध्ये उपयुक्त ठरतो.
* धान्यक हिम – धण्याचे चूर्ण १ भाग त्यात शृतशीतजल १० भाग घेऊन रात्री भिजत घालावे व सकाळी हे पाणी गाळून प्यावे. मात्रा ५० ते १०० मिलि दिवसातून ३ वेळा. याने लघवीच्या वेळी होणार्‍या वेदना, लघवी न होणे व लघवीच्या वेळी असलेली जळजळ कमी होते.
– नागरमोथा, चंदन, सुंठ, वाळा, काळावाळा व पित्तपापड या सहा द्रव्यांनी सिद्ध षडंगोदक पित्तशामक आहे.
– मूत्रल विकारामध्ये योग्य वेळी व तहान लागल्यावर पाणी पिणेच श्रेयस्कर आहे.
सध्या ग्रीष्मऋतु असल्याने ग्रीष्मऋतुचर्या पालन केल्यास बर्‍याच प्रकारचे उन्हाळ्याचे त्रास कमी होतात. पेयामध्ये शीत व पित्तशामक व शरीर व मन प्रीणन करणार्‍या पेयांचा समावेश करावा.
– शहाळ्याचं पाणी सर्वोत्तम आहे.
– ऊसाचा रस सेवन करावा.
– कोकम सरबत, कैरीचे पन्हे प्यावे.
– गोड ताकामध्ये जिरेपूड टाकून जेवणानंतर प्यावे.
– महाळूंगाचा रस प्यावा. कलिंगडाचा रस प्यावा.
– दिवसभर माठातील पाणी प्यावे व जेवताना कोमट पाणी प्यावे.
पथ्यापथ्य –
– साधा सुपाच्य आहार सेवन करावा.
– मसाल्यामध्ये दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरी, आल्याचा वापर करावा.
– मसालेदार चटपटीत पित्तकर आहार सेवन करू नये.
– अजीर्ण झालेले असता जेवू नये.