ब्रेकिंग न्यूज़
उन्हाळी शिबिरांतून मिळावा…  ‘संस्कारांचा’ गारवा!

उन्हाळी शिबिरांतून मिळावा… ‘संस्कारांचा’ गारवा!

  • पौर्णिमा केरकर

गोव्यात अलीकडे विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच सरकारी संस्था मुलांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करतात. प्रामुख्याने ही शिबिरे शहरी भागात असल्याने त्याचा लाभ शहरी मुलांना होतो. गावात शिकणारी व गावातच राहणार्‍या मुलांना उन्हाळी शिबिरांपासून वंचित रहावे लागते. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातूनही काही संस्थांनी मुलांसाठी असे उपक्रम राबवावेत, जेणेकरून शहरी मुलांना गावातील लोकमानसांची जीवनशैली अनुभवता येईल.

कधी एकदा आपली परीक्षा संपते, आणि आपल्याला मामाच्या गावी जायला मिळते याची अमन खूप उत्सुकतेने वाट पाहत होता. पण अमनच्या या उत्साहावर विरजण घातले ते त्याच्या मम्मीने. तिने त्याला अगदी निक्षून सांगितले की आता बारावीत पोहोचेपर्यंत तुला सुट्ठीत मामाच्या घरी जाता येणार नाही. तुझं नाव मी ट्यूशन क्लासला घातले आहे. दहावीत चांगली टक्केवारी मिळाली तर बारावी सायन्स पर्यंत मजल मारता येईल. अमन अगदीच हिरमुसला झाला. आठवीत पोहोचेपर्यंत अमनची दिवाळीची आणि मे महिन्यातली दीर्घ सुट्टी मामाच्या घरीच साजरी व्हायची. पण आता मात्र इथून पुढे त्याची सुट्टी अभ्यास…अभ्यास आणि अभ्यासातच जाणार होती. मम्मीच्या या निर्णयाचा त्याला फारच राग आला. खूप चिडचिड केली त्याने. रागाने आदळआपट केली. पण काहीच उपयोग झाला नाही. अमनला तर तो खूप लहान असताना पासून मामाचे घर आवडायचे. चुरणे, चाफरा, जारा, जांभळे गोळा करण्यासाठी तो आपल्या मित्रमंडळींबरोबर भटकायचा. नदीवरी मामा बरोबर पोहोण्यासाठी जाऊन धम्माल करणे, मासे पकडण्यासाठी नदीत गळ घालून तासन्‌तास बसणे हा तर त्याचा खूप आवडीचा छंद. त्याशिवाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी धावाधाव, खेळ खेळे, रानातील पदभ्रमण…एक नाही की दोन आणि मग तिन्ही सांजा झाल्या की लॅपटॉपवर एखादं चांगलं सर्जनशील फिल्म बघायचं व निवांत व्हायचं.

अमनच्या मम्मीची नेहमीची तक्रार की, ‘अमन आमचो वंगळो घरान कायच करिना फक्त टी.व्ही. मोबाईल, कांदा हाडून दी म्हटल्यार लसूण हाडून दितलो’ म्हणून आता यापुढे त्याला उन्हाळी शिबिराच्या वर्गाना पाठवणार आणि आठवी झाल्यानंतर फक्त ट्यूशन्स! आपल्या मुलांच्या बाबतीत अशाच तर्‍हेने विचार करणार्‍या मम्मी घराघरांत आढळतील. मुलांकडे असलेल्या अंगभूत कलागुणांकडे त्यांच्या आवडी निवडीकडे घरातील माणसे, पालक मंडळी अभावानेच लक्ष देतात. अमन मामाच्या घरी सुट्टीत आला असता, त्याचे निरीक्षण केल्यानंतर लक्षात आले की, त्याला प्राण्यांची खूप आवड आहे. ही नुसतीच आवड नव्हती तर कुत्री, मांजरे, कोंबडी, पक्षी यांचे अवलोकन करून त्यांच्या खाण्या जेवण्याचा, फिरण्या, भांडणाचा बारीक सारीक तपशील त्याला माहीत आहे. इंग्रजीतील कलात्मक चित्रपट त्याच्या आवडीचे आहेत. या चित्रपटांचे वेगळे ज्ञान त्याच्याकडे आहे. तो चित्रे खूप सुंदर काढतो. प्राण्यांना दुखलं, खुपलं तर त्यांची सेवा करतो. झाडापेडांचे ज्ञान त्याला बरं आहे. शोधक नजर आणि जिज्ञासू वृत्ती लाभलेला कलंदर हळव्या मनाचा, शांत मनमिळाऊ अमन आता पुढील चार वर्षांत त्याच्या मम्मी-डॅडीच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाणार होता. त्याला मामाचं घरच कशाला, उन्हाळी शिबिराला सुद्धा मुकावं लागणार होतं.

गोव्यात अलीकडे विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच सरकारी संस्था मुलांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करतात. प्रामुख्याने ही शिबिरे शहरी भागात असल्याने त्याचा लाभ शहरी मुलांना होतो. गावात शिकणारी व गावातच राहणार्‍या मुलांना उन्हाळी शिबिरांपासून वंचित रहावे लागते. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातूनही काही संस्थांनी मुलांसाठी असे उपक्रम राबवावेत, जेणेकरून शहरी मुलांना गावातील लोकमानसांची जीवनशैली अनुभवता येईल. मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरी धंद्यासाठी कुटुंबे आपल्या गावापासून दुरावलेली असतात. मुलांचे पालक सण, समारंभाला, जत्रा, नाटकांना गावात येतात, जातात. पण त्यातील बरेच जण मुलांना मात्र गावाचा हा सांस्कृतिक अनुभव घेऊ देत नाहीत. अशा उन्हाळी शिबिरांच्या निमित्ताने अशी देवाण घेवाण झाली तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. अलीकडेच तर व्यावसायिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यात एकसुरीपणा आढळतो. प्रभावी वक्त्यांना आणून एका बंदिस्त जागेत काटेकोर शिस्तीत ही शिबिरं घेतली जातात. त्यात कला कौशल्याचा भाग असतोच. त्याचा मुलांना काही प्रमाणात फायदा होतो. परंतु एरव्ही मुले शाळेत बंदिस्त जीवन जग असतातच. मग मौजमजा करण्यासाठी जी सुट्टी मिळालेली असते, ती सुद्धा बंदिस्तच ठेवली तर मुलांमध्ये आक्रस्ताळेपणा वाढण्याची शक्यता असतेच. मग अशावेळी शिबिरे आयोजित करणार्‍या संस्थांनी असे काही उपक्रम राबवून पहावेत, की जेणेकरून समाजाप्रतीची संवेदनशीलता या उमल्यात पिढीत सजगता निर्माण करणारी ठरेल. भवितव्यातील सुशील नागरिकां बरोबरीने चांगले संशोधक, शिक्षक, इतिहास, संस्कृती, निसर्गप्रेमी म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर आपल्या प्रदेश आणि देशाप्रति आत्मीयता, स्वाभिमान प्रेम असणारी पिढी घडविण्यासाठीचा हातभार लागणारी ठरतील.

एप्रिल-मे महिन्याचे दिवस तर लग्नाच्या मौसमातील धामधुमीचे दिवस. आजकाल या लग्न समारंभासाठी जे बुफे लावलेले असतात, त्यातून कुठल्याच प्रकारची आपली पारंपरिक अन्न संस्कृती दिसत नाही. ‘वापरा-फेका’ची मनोवृत्ती, जेवणानंतरची बेशिस्त, थंड पेये, आइस्क्रीम आरोग्याला हानिकारक असलेल्या या गोष्टी परंपरा म्हणूनच आपल्या मुलांसमोर येतात. तेव्हा मग मुलांना आत्मविश्‍वास, सजग, सुदृढ, संवेदनशील बनवू इच्छिणार्‍या अशा संस्थांनी पुढाकार घेऊन कोवळ्या फणसांची, कुवल्यावी भाजी, कच्च्या कैर्‍यांचे ताजे केलेले लोणचे, सोजी, वरण, उकडा भात याची चव दाखवता येते. केळीच्या पानात किंवा पत्रावळीवर त्याचा आस्वाद कसा घ्यायचा असतो, याचे प्रात्यक्षिक दाखविता येते. झाडाच्या सावलीत करमळाच्या पानावर कोवळ्या फणसाच्या गर्‍याची भाजी कशी खायची असते, हे कृतिशीलतेने मुलांना कळून येईल. या पारंपरिक चवी मुलांच्या जिभेला अनोळखीच आहेत. पिझ्झा, बर्गर, तंदुरीच्या मार्‍याने आरोग्यम् धनसंपदा हे आपले ब्रीद डळमळीत होत आहे. आपली पिढी शारीरिक, मानसिक सुदृढ करण्यासाठी असे काही उपक्रम उन्हाळी शिबिरांमधून इतर उपक्रमांच्या जोडीने राबविता येतात. सहा अभयारण्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान असलेल्या शिवाय पक्षी, कृमी कीटक आणि वन्यजिवांचे वैविध्यपूर्ण घटक असलेल्या या प्रदेशात पर्यावरणाचे उपक्रम राबविणार्‍या संस्था आहेत. माणसेही आहेत. त्याना सोबतीला घेऊन निसर्ग पर्यावरणाची ओळख करून देता येते.

उन्हाळी शिबिरं आजकाल मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचा भावनिक बुध्यांक वाढविण्यासाठी गरजेचीच झालेली आहेत. ती शाळेतील चार भिंतीसारखी बंदिस्त चौकटीत घेतली गेली तर त्याचा सकारात्मक, संवेदनशील परिणाम मुलांच्या मनावर होऊ शकेल का? याचा विचार करायला हवा. आपला सभोवताल कसा आहे, आणि या सभोवतालच्या प्रतीची संवेदनशीलता या वाढणार्‍या मुलांच्या हृदयात निर्माण करण्याची जबाबदारी आता या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांवर येऊन पडलेली आहे. पूर्वी हेच काम एकत्र कुंटुंब पद्धती, समाज सहजपणाने करायचा. आता असं होत नाही. म्हणून जबाबदारी वाढलेली आहे. उन्हाळी शिबिरं त्याच्यासाठी उपयुक्त माध्यम आहे. मुलांना वेळ देणं, त्यांच्यामध्ये संवाद साधणं, त्यांच्या आवडी निवडी जोपासणं, त्यांच्यातील ऊर्जा हेरणं, त्यांची कार्यक्षमता जाणून घेणं, त्यांच्या मतांना किंमत देऊन विश्‍वासात घेऊन जी कामे घराघरांतून होणं क्रमप्राप्त होते, ती जबाबदारी आता उन्हाळी शिबिरावरती येऊन पडलेली आहे. याची जाणीव ठेवूनच जबाबदार, समाजमन असलेली संवेदनशील पिढी घडविण्यासाठीच अशा शिबिरांचे आयोजन, नियोजन करीत असताना अमन सारखी जी मुलं आहेत, त्यांच्याकडे असलेल्या कला कौशल्याचा, त्यांच्या क्षमतांचा विचार जरूर व्हायला हवा. दहावी, बारावीची वर्षे महत्त्वपूर्ण आहेत. त्याही पेक्षा मुलांचे भावजीवन, त्यांची संवेदनशीलता, समाजातील त्यांचे योगदान, पालकांना अनुभवण्याची दृष्टी, मोबाईलपेक्षा सुद्धा वेगळं जग आपल्याला खुणावत आहे, ही जाणीव या मुलांना अशा शिबिरांतून होणे गरजेचे आहे. उन्हाळी शिबिरांतून नुसताच व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून मुलांना प्रशिक्षित न करता समाज, कुटुंब, प्रदेश, देशाप्रति संवेदनशील, सजग माणूस घडविणे ही काळाची गरज आहे.

प्राचिन स्थळांचा अभ्यास हवा
इतिहास संस्कृतीशी नाते सांगणार्‍या अनेक जागा या प्रदेशात आहेत. पुराश्मयुगांशी नाते सांगणारी कुंकळ्ळीतील मल्लांगिणी ही जागा, आदिमानवांचे वसतिस्थान होते. येथेच प्राचीन गुंफा सापडलेल्या आहेत. त्याशिवाय रिवण येथे सुद्धा नैसर्गिक गुंफा आहेत. या विषयावरील जाणकार संशोधकांना घेऊन मुलांसाठी असा दौरा आखता येतो. तसेच मानवनिर्मित गुंफा असलेल्या जागा म्हणजे, मये, लामगाव, हरवळे, सुर्ला आदी ठिकाणे. या स्थळांची माहिती देता येते. प्रस्थापितांना सोबत घेऊन त्या त्या क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या जाणकारांना सहवासात घेऊन पदभ्रमण, गिर्यारोहण, निसर्ग भ्रमंतीचा विचार करता येतो. उन्हाळ्याच्या दिवसात गावात अजूनही काही जागा आहेत की, जेथे मुबलक प्रमाणात रानमेवा उपलब्ध असतो. या रानमेव्याचा प्रत्यक्षातील अनुभव मुलांना देता येतो. गावगाड्यातील बाय बलुतेदार हे विषय अभ्यासक्रमात असतात. त्यांची ओळख ही फक्त पुस्तकी असते. ती तेवढ्यापुरतीच न ठेवता प्रत्यक्षातील कुंभारकाम, चितार्‍यांची कला कुशलता, लाकूड काम यातील कलात्मक सौंदर्याची ओळख करून करून द्यायला हवी. आपल्या प्रदेशातील काही जागा या विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्धीस पोहोचलेल्या आहेत. ती गोष्ट म्हणजे त्या त्या गावाची ओळखीची खूण असते. जसे की, कुंकळ्ळीचे चितारी फक्त गोव्यातच नाहीत तर गोव्याबाहेरही नाव कमवून आहेत. आपल्या
प्रदेशाचे हे मोठेपण मुलांपर्यंत
पोहोचविणे आजच्या काळात तर
खूपच गरजेचे झाले आहे.