उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला अपघात ः पीडिता गंभीर

>> भाजप आमदारावर एफआयआर नोंद

उन्नाव (उत्तर प्रदेश) बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कारला काल झालेल्या अपघातप्रकरणी संशयित आरोपी भाजप आमदार कुलदिप सिंह सेनगर, त्याचा भाऊ व अन्य आठजणांविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदविले आहे. पीडित तरुणी व तिच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस तैनात असतात. मात्र अपघातावेळी एकही पोलीस त्यांच्यासोबत नव्हता असे उन्नावचे पोलीस अधीक्षक एम. पी. वर्मा यांनी सांगितले.

रायबरेली येथे बलात्कार पीडित जात असलेल्या कारला एका ट्रकने ठोकरल्याने त्या कारमधील दोन महिला ठार झाल्या व पीडित तरुणी व तिचा वकील गंभीर जखमी झाले. हा अपघात नसून कारस्थान असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने आवाज उठविला. संशयित आरोपी तुरुंगात असला तरी यामागे त्याचा हात असल्याचा दावा पीडितेच्या कुटुंबियांनी केल्यानंतर संशयित आमदार सेनगर याच्याविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली एफआयआर नोंद करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस पोचले तेव्हा संबंधित ट्रकची नंबर प्लेट काळ्या रंगाने रंगवण्यात आली होती असे दिसून आले.
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पीडित तरुणीच्या आईने या सर्वामागे संशयित कुलदिप सिंह असल्याचा आरोप केला आहे.