‘‘उद्धवच्या धमकीमुळे बाळासाहेबांचा नाईलाज झाला…’’

‘‘उद्धवच्या धमकीमुळे बाळासाहेबांचा नाईलाज झाला…’’

>> नारायण राणे यांच्या आगामी आत्मचरित्रातील स्फोटक प्रकरण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार श्री. नारायण राणे यांचे *** हे अत्यंत स्फोटक इंग्रजी आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. हार्पर कॉलीन्स या प्रख्यात प्रकाशनसंस्थेने खास नवप्रभेच्या वाचकांसाठी दिलेले हे त्यातील एक महत्त्वाचे प्रकरण —

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, मी अनेकदा अपेक्षांहून सरस ठरलो. खरे सांगायचे तर लोकांच्या माझ्याकडून खूप कमी अपेक्षा होत्या. मी तरुण होतो, जास्त शिकलेला नव्हतो, चांगले वक्तृत्व नव्हते, ‘पॉलिश्ड’ किंवा अनुभवी नव्हतो. ह्यामुळे आणि अशा इतर कारणांमुळे, काही नेत्यांना, माझ्या स्वपक्षातले सुद्धा, वाटायचे की मी म्हणजे ‘वन हिट वंडर’ आहे. मी माझा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर, पुढील सरकार जवळजवळ घडवल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस सरकार जवळजवळ पाडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, जर आमची आघाडी जर कधी पुन्हा सत्तेवर आली, तर मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना वाट पाहावी लागेल, कारण मी त्या पदासाठीची पहिली निवड असेन.

मला खात्री आहे की उद्धवजींना माझ्या यशाबद्दल असूया होती आणि त्यामुळे मी बोलावलेल्या बैठकांना नेत्यांनी हजर राहू नये यासाठी ते पक्षातील नेत्यांना बोलवून घ्यायचे. माझा पूर्वनियोजित सार्वजनिक कार्यक्रम असेल तर ते त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मिलिंद नार्वेकर – उद्धवजींचा वैयक्तिक सहायक – (मनोहर) जोशी आणि (सुभाष) देसाई यांच्या मदतीने बोलवून घ्यायचे आणि त्या कार्यक्रमास जाण्यापासून परावृत्त करायचे आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला कोणतीही गर्दी जमवू नये यासाठी प्रयत्न करायचे.

माझ्या मते, स्वतःच्या अहंकारांना कुरवाळताना ते जे क्षुद्र राजकारण खेळले, त्यातून त्यांच्याच स्वतःच्या पक्षाची वाढ खुंटली. मी हे वेळोवेळी साहेबांच्या निदर्शनास आणायचा प्रयत्न करायचो आणि ते उद्धवजींना ताकीद द्यायचे, पण ती वाया जायची, कारण जोशीजी आणि देसाई उद्धवजींचे कान माझ्याविरोधात फुंकायचे. मला याविषयी पूर्ण खात्री होती.

नारायण राणे यांच्या आगामी आत्मचरित्रातील स्फोटक प्रकरण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार श्री. नारायण राणे यांचे हे अत्यंत स्फोटक इंग्रजी आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. हार्पर कॉलीन्स या प्रख्यात प्रकाशनसंस्थेने खास नवप्रभेच्या वाचकांसाठी दिलेले हे त्यातील एक महत्त्वाचे प्रकरण —

आपल्याला ठाऊक आहे, २००५ साली जे घडले ते खरोखरच माझ्यासाठी आणि नीलमसाठी दुःखद होते, कारण आम्हाला खरोखरच वाटे की उद्धवजी आणि रश्मीभाभी ही खूप चांगली माणसे आहेत. आम्ही कौटुंबिक मित्र होतो. आम्ही मुलांसह एकत्र जेवायला बाहेर जायचो. जर आम्ही विदेशांत प्रवास करीत असू, लंडन किंवा सिंगापूरला आणि आम्हाला कळले की आम्ही सगळे एकाच शहरात आहोत, तर आमच्या सुटीत देखील आम्ही एकत्र वेळ घालवायचो.

मला अजूनही आठवते, जेव्हा मी रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर लोकांशी बोलत असायचो आणि पक्षाच्या बैठकांना हजर असायचो, रश्मीभाभी आमची खूप काळजी घ्यायच्या. मातोश्रीच्या तिसर्‍या मजल्यावरचे त्यांचे घर मला माझे स्वतःचे असल्यासारखे वाटे. माझ्यावर जेवायच्या वेळेबाबत बंधने असायची आणि विविध पथ्यही असे. रात्री दहा वाजता रश्मीभाभी नेहमीच मला निरोप पाठवायच्या की वर येऊन जेवून घ्या, जे माझी सगळी पथ्ये ध्यानात ठेवून त्यांनी बनवलेले असायचे.

अनेकदा मला वाटे की उद्धवजी आणि साहेब यांच्यात माझ्यामुळे भांडणे होतात. त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करायचो. ती जेव्हा टोकाला पोहोचली, मला वाटले की वडील आणि मुलगा यांच्यातील दरीचे मी कारण होऊ नये, आणि सेना सोडण्याच्या माझ्या निर्णयामागे ही अपराधी भावना हेही एक कारण होते. जेव्हा ही टोचणी मला जास्तच जाचू लागली, तेव्हा मी साहेबांना अनौपचारिक पत्र लिहून ते सारे नजरेस आणले.

मी स्पष्ट केले होते की मी सेना सोडीन आणि घरी बसेन. दुसर्‍या कोणत्याही पक्षात सामील होण्यात मला रस नव्हता. जगात माझ्यासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण व्यक्ती असलेल्या एका माणसाला मी लिहिलेले ते एक भावपूर्ण पत्र होते. मी त्यांना माझे दैवतच मानायचो. ते पत्र सुपूर्द करताच मी पंधरा दिवस देशाबाहेर निघून गेलो.
जेव्हा मी परतलो, तेव्हा मी सेना सोडतोय आणि कॉंग्रेस – राष्ट्रवादीत सामील होतोय अशा बातम्या सर्व वर्तमानपत्रांत वाचून मी अवाक झालो! मी जेव्हा ह्या बातम्यांच्या स्त्रोताची चौकशी केली, तेव्हा आश्चर्य म्हणजे मला सांगण्यात आले की त्या माध्यमांकडे नार्वेकर, जोशीजी आणि देसाई यांनी पेरल्या होत्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी, मी माझ्या कर्मचार्‍यांना तीन राजीनामा पत्रे तयार करायला सांगितली. साहेबांची वेळ घेऊन संध्याकाळी मी त्यांना भेटायला मातोश्रीवर गेलो आणि त्यांच्या हाती शिवसेनेतून राजीनामा देत असल्याचे पहिले, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे दुसरे आणि विधानसभेचा राजीनामा देत असल्याचे तिसरे पत्र सुपूर्द केले. साहेब आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी ताबडतोब उद्धवजींना बोलावले आणि माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याला त्यांनी जी वागणूक दिली ती देण्याचा त्यांना काहीही अधिकार नसल्याचे सांगत त्यांची खरडपट्टी काढली. आणि सांगितले की शिवसेनेला माझी जरूरी आहे आणि त्यासाठी मला शांत करण्यासाठी सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत. उद्धवजींनी आरोप फेटाळला आणि सगळे काही ठीक असल्याचे व माझ्याविरुद्ध काहीही शिजत नसल्याचे आपल्या वडिलांना सांगू लागले. पण मी माझ्या मनाची तयारी केली होती आणि माझा राजीनामा मागे घेण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो.

साहेबांनी मला घरी पाठवले आणि ते विसरून जाण्याचा सल्ला दिला.
साहेबांची माझी ती शेवटची प्रत्यक्ष भेट ठरली.
त्यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी मला प्रेमाने फोन केला आणि विचारले, ‘‘काय नारायण, तुझा राग कमी झाला आता?’’ पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो आणि त्यांना सांगितले की आता मागे फिरणे नाही. माझ्या निष्ठावान सैनिकांकडून मला नंतर समजले की जेव्हा उद्धवजींना साहेबांनी सकाळी मला फोन केल्याचे कळले, तेव्हा ते धावत खाली त्यांना भेटायला आले आणि रागाने म्हणाले की मी सेना सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने मला परत बोलवायचे काही कारण नाही. ‘‘ते राहतील किंवा मी’’ असेही ते उद्गारले. मग त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला, ‘‘जर राणे पक्षात परत येतील, तर मी आणि रश्मी मातोश्री सोडणार!’’
कार अपघातात एक मुलगा गमावलेल्या आणि दुसर्‍यापासून दुरावलेल्या एका वयस्कर पित्यासाठी ही अशा प्रकारची धमकी तिसर्‍या मुलाच्या इच्छेविरुद्ध काही करण्यापासून थांबवणारी ठरली.