ईडीसीकडून मुख्यमंत्री कोविड निधीला १ कोटी रु.

राज्य सरकारने कोविड-१९ अंतर्गत सुरू केलेल्या मुख्यमंत्री कोविड निधीसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) या निधीसाठी १ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे १ कोटी रुपयांचा धनादेश काल सुपूर्द केला. राज्याला कोविड १९ विरोधात लढाईसाठी मोठ्या प्रमाणात साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यामुळे आर्थिक विकास महामंडळाने या कार्यासाठी मोठा निधी देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

जिल्हा खनिज निधी आणि खनिज कायम निधीतून १७० कोटी रुपये कोविड १९ साठी खर्च केले जाणार आहेत. राज्यातील विविध सामाजिक संस्था, आस्थापने, देवस्थान इतर संस्थांकडून कोविड निधीसाठी योगदान दिले जात आहे.