इफ्फीत कोकणी चित्रपटाचा समावेश करावा ः कामत

इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी यंदा एकही कोकणी चित्रपटाची निवड झाली नसल्याबद्दल गोमंतकीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असतानाच काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनीही याबाबत मत व्यक्त करताना ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे ट्विट केले आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पॅनोरमा विभागासाठी एकही कोकणी चित्रपटाची निवड न होणे ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना असल्याचे कामत यांनी ट्विटमधून म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही दिगंबर कामत यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. कोकणी चित्रपटाला इफ्फीत स्थान मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी म्हटले आहे.