इटलीहून २६९ खलाशी गोव्यात दाखल

 

इटलीहून २६९ दर्यावर्दींना घेऊन आलेले विशेष विमान काल सकाळी ७ वाजता दाबोळी विमानतळावर उतरले. विदेशात असलेल्या गोमंतकीयांना कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घेऊन येणार हे सातवे विमान होते. विमानतळावर उतरल्यानंतर खलाशांची कोरोना तपासणीची चाचणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी हलवण्यात आले.

गेल्या २९ मे रोजीही इटलीहून २७९ दर्यावर्दी (खलाशी) गोव्यात आले होते. त्यात २०६ गोमंतकीय तर ६३ महाराष्ट्रातील दर्यावर्दींचा समावेश होता. त्याशिवाय २ जून रोजी दुबईहून आलेल्या चार्टर विमानातून ११० गोमंतकीय गोव्यात आले होते. दुबईहून आलेल्या गोमंतकीयांनी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठीचे शुल्क भरण्यास नक्रार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, काल इटलीहून आलेल्या दर्यावर्दींनी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठीचे पैसे भरण्याची तयारी दाखवल्याने सगळे काही सुरळीत पार पडल्याचे दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी सांगितले. अजूनही बरेच गोमंतकीय विदेशात अडकून पडलेले असून त्यांना घेऊन आणखी विमाने गोव्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

गुरूवारी देशांतर्गत तीन विमाने उतरली
काल गुरुवारी (दि. ४) रोजी दिवसभरात देशातील देशांतर्गत विमानातून तीन विविध भागातून तीन विमाने ११० प्रवाशांना घेऊन दाखल झाली. या विमानांतून नंतर ३४५ प्रवासी देशातील तीन विविध भागात रवाना झाले. हैदराबादहून दाबोळी विमानतळावर आलेल्या विमानातून २० प्रवासी गोव्यात दाखल झाले. तर याच विमानातून नंतर ५७ प्रवासी हैदराबादला जाण्यासाठी रवाना झाले. बेंगळूरहून आलेल्या विमानातून ३० प्रवासी गोव्यात आले तर या विमानातून नंतर १३१ प्रवासी बेंगळूरला जाण्यासाठी रवाना झाले. दिल्लीहून आलेल्या विमानातून गुरुवारी ६० प्रवासी गोव्यात दाखल झाले. तर १५७ प्रवासी येथून दिल्लीला जाण्यासाठी या विमानातून रवाना झाले.