इच्छापूर्ती करणारी ‘अक्षय तृतीया’

इच्छापूर्ती करणारी ‘अक्षय तृतीया’

  •  श्रीमती लक्ष्मी जोग
    (खडपाबांध-फोंडा)

या दिवशी सुरू केलेले कोणतेही काम अक्षय टिकते असा दृढभाव असल्यामुळे लोक हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतात. या दिवशी आपण केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीच क्षय होत नाही. देव व पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते अक्षय होते.

गौर पुसे शंकरासी | स्वामी विनंती परियेसी |
मज पाठवा माहेरासी | भेटून येईन स्वामीया ॥

देवी पार्वती श्री शंकराकडे माहेरी जाऊन येण्याची परवानगी मागते. शंकर म्हणतात, ‘तू माहेरी गेलीस की इथे कैलासावर मला करमणार नाही. हा पर्वत सुन्न भासेल. तेव्हा तू तिथे फार दिवस राहू नकोस’, असे सांगून तिच्या जाण्याची व्यवस्था करतात. सोबतीला व वाट दाखवायला नंदी असतो. बरोबर सख्यांचा मेळा असतो. पार्वती शंकरांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेताना तिलाही भरून येते… पार्वती माहेरी पोचते.. तिथे तिचे भरगच्च स्वागत होते… खूप दिवसांनी माय-लेकीची भेट होते… आम्ही जशाकाही प्रत्यक्ष तिथे आहोत आणि तो सोहळा पाहात आहोत… असंच वाटत होतं. प्रसंग होता चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचा… समोरच एका सुंदर चिमुकल्या झोपाळ्यावर नटली-सजलेली गौर विराजमान होती. झोपाळा फुलांच्या माळांनी सजवलेला होता. गौरीसमोर एका तबकात खणानारळांनी ओटी भरलेली दिसत होती. अनेक पदार्थांनी भरलेली ताटं गौरीसमोर ठेवलेली होती. अनारसे.. करंज्या.. लाडू.. बर्फी.. फळफळावळ.. कशाकशाची कमी नव्हती. बैठकीवर सुवासिनींचा मेळा नव्या भरजरी साड्या परिधान करून, फुलांचे गजरे भरगच्च अंबाड्यांवर माळून बसलेल्या होत्या. घरातील यजमानीण प्रत्येकीचे पाय परातीत धुऊन ते स्वच्छ कपड्याने हळुवारपणे पुसत होती. ते झाल्यावर तिने एका चांदीच्या वाटीतून पिवळेजर्द द्रावण आणले व ते प्रत्येकीच्या तळहातावर बोटांनी लावले. ते द्रावण दोन्ही हातांनी चोळून आपापल्या गालावर लावण्यात सगळ्या गर्क झाल्या. नंतर यजमानीणबाईंनी प्रत्येकीला हळदीकुंकू व तीट लावली. तांदूळ लावले. अत्तर लावले व फुले दिली. चांदिवड्याच्या पानावर अनेक तर्‍हेची फळें, डाळीची कोशिंबीर असे साग्रसंगीतपणे घालून एकेक पान प्रत्येक सुवासिनीला दिले जात होते. सगळ्यात शेवटी आंब्याचे स्वादिष्ट पन्हे! त्यातलीच एक वयोवृद्ध आजी गौरीचं हे गाणं म्हणत होती. सासर व माहेर अशा दोन्हीकडचे रेशिमबंध बाईला कसे ओढ लावतात त्याचंच हे प्रतीक होतं!!
असा चैत्रगौरीचा सोहळा घरोघरी साजरा होत असतो व त्या निमित्ताने हळदीकुंकू! चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत हा सोहळा चालतो. हीच अक्षय तृतीया! साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त!
वसंत ऋतूला घेऊन येणारा चैत्रमास! यालाच मधुमास असेही म्हणतात. पुढे वसंतऋतू येणार याची चाहूल काही दिवस आधीच लागते. पहाटे-पहाटे कोकीळ कूजन कानावर पडते. सार्‍या सृष्टीला आनंदाची नवपालवी फुटते. फळाफुलांना बहर येतो. त्यामुळे वातावरणही सुगंधित झालेले असते. ही सृष्टीदेवता चैत्रगौरीच्या रूपाने घरोघरी पुजतात. या माहेरवाशिणीचे आदरातिथ्य खूप मनापासून आपण करतो. घरोघरी हळदीकुंकवाच्या निमित्ताने स्त्रियांचे येणे-जाणे होते. एकमेकींची ख्यालीखुशाली विचारली जाते. कार्यप्रस्थांची निमंत्रणे दिली जातात. कारण अक्षय तृतीया हा दिवस शुभ मुहूर्ताचा असतो.

‘कालविवेक’ या ग्रंथात अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व विशद केले आहे. या दिवशी श्री परशुराम जयंती, हयग्रीव जयंती तसेच बसवेश्‍वर जयंती असते. नर-नारायण या जोडदेवांचीही याच दिवशी जयंती असते. श्री व्यासांनी महाभारत या ग्रंथाची रचना करण्यास याच शुभ मुहूर्तावर प्रारंभ केला. या ग्रंथाचे लेखन श्री गणपतीने केले अशी पुराणात आख्यायिका आहे. भारतातील उत्तराखंडात असणार्‍या बदरीनारायण मंदिराचे द्वार याच दिवशी उघडतात. त्यानंतर ते दिवाळीतील भाऊबिजेच्या दिवशी पुनश्च बंद करतात. याच दिवशी वृंदावनातील बाके बिहारीच्या मंदिरात श्री विग्रहाचे चरणदर्शन होते. एरवी पूर्ण वर्षभर ते चरण वस्त्राने झाकलेले असतात.

जो मनुष्य या दिवशी समुद्रस्नान वा गंगास्नान करील तो पापापासून मुक्त होईल, अशी समजूत आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. म्हणून तिला अक्षय तृतीया म्हणतात. देव व पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते अक्षय होते. याच दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका आहे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळतात. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजनही काही ठिकाणी करतात.
या दिवशी मातीच्या घटात पाणी घेऊन त्यात वाळा घालून त्या सुगंधित पाण्यासहित घट व पळसाच्या पानांच्या पत्रावळीत व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे, चिंचोणी, पापड, कुरडया इ. वाढून ते ब्राह्मणाला दान देतात. त्यामुळे पितर संतुष्ट होतात, अशी समजूत आहे. या दिवशी सुरू केलेले कोणतेही काम अक्षय टिकते असा दृढभाव असल्यामुळे लोक हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतात. आपण केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीच क्षय होत नाही.

हिंदू संस्कृतीमध्ये या दिवशी करायच्या गोष्टी…..
* या दिवशी जवळ असलेल्या नदीत किंवा शक्य असलेल्या समुद्रात पवित्र स्नान करावे.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप-साखर, चिंच, फळ व वस्त्र यांचे दान करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. ब्राह्मणभोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व सांगितलेले असल्यामुळे ते भक्षण करावे.
* नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने जमल्यास विकत घ्यावे. साडेतीन मुहूर्तातील हा महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे नवीन वास्तूत प्रवेश, सोने खरेदी करणे, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे हे शुभ मानतात.
भारतातील निरनिराळ्या प्रदेशात अक्षय तृतीयेची निरनिराळी नावे आहेत, शिवाय वेगवेगळ्या उपासना व फळ सांगितले आहे.
राजस्थान – तिथेही या दिवसाला शुभ मानतात. या तिथीला ‘आखाती’ असे म्हणतात. शहरी तसेच ग्रामीण भागात विवाहादी शुभकार्ये करतात.
पश्चिम बंगाल – या भागात या दिवसाला व्यापारी वर्ग खूप महत्त्वाचा दिवस मानतात. या तिथीला ‘हालकटा’ असे नाव आहे. श्रीगणपती व लक्ष्मीची विशेष पूजा ते लोक या दिवशी करतात. हिशोबासाठी नवीन वह्या वापरात आणतात.
ओरिसा – या दिवसाचे शेतकरी वर्गात विशेष महत्त्व आहे. ते लक्ष्मीची पूजा करून नवीन धान्याची पेरणी करतात. या सणाला ते ‘मुठीचुहाणा’ या नावाने ओळखतात. या दिवशी पालेभाजी व मांसाहार वर्ज्य करतात. या दिवशी श्री जगन्नाथ यात्रेला प्रारंभ होतो.

उत्तर भारत – इथले लोक या दिवशी श्री परशुराम जन्मोत्सव साजरा करतात. पूजा व प्रार्थना करतात. गंगेत मंगलस्नान करण्याची रीत आहे. तीर्थयात्रा, यज्ञकर्म भक्तिभावाने करतात. अन्नधान्य, सातू यांचे दान करण्याची पद्धत आहे. दक्षिण भारत – हे लोक लक्ष्मी-कुबेर पूजन करतात. अन्नदान करतात. मंदिरात देवदर्शनाला जातात.
महाराष्ट्र – इथल्या स्त्रिया मोठ्या आनंदाने चैत्रगौरीची स्थापना करतात. पूजा-नैवेद्य करतात. चैत्रातच एखादे दिवशी सुवासिनींना हळदीकुंकासाठी घरी बोलावतात. त्यांना फुलांचे गजरे, आंबाडाळ व पन्हे देतात. मोड आलेल्या हरभर्‍यांनी त्यांची ओटी भरून त्यांचा सन्मान करतात. या तिथीला अन्नकोट मांडतात. या तिथीला ‘आखिती’ किंवा ‘अखजी’ असेही म्हणतात.

या लेखाच्या सुरुवातीला वर्णन केले ते आपल्या गोमंतकातले आहे.
या दिवशी कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे विचारवंतांचे मत आहे. ज्योतिषशास्त्रात चार युगातील सर्व वर्षे मिळून होणार्‍या काळाला ‘महायुग’ म्हणतात. ही चार युगे म्हणजे महायुगाचे चार चरण मानतात. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ होतो त्याला कल्पादी व त्रेतायुगाच्या प्रारंभाला युगादी म्हणतात. तो दिवस म्हणजे वैशाख शु. तृतीयेचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया! असे या दिवसाला अनेक तर्‍हेने महत्त्व प्राप्त झालेले आहे.

यंदा ही तिथी म्हणजे अक्षय तृतीया ही ७ मे या दिवशी आली आहे. चैत्र शु. तिजेला ‘दोलायमान’ (झोपाळ्यावर) बसलेली माहेरवाशीण गौर आता आपल्या घरी जाईल. लेक सासरी गेल्यावर घर जसं सुनंसुनं होतं, तसंच आताही होईल. ग्रीष्म ऋतूचे पदरव पृथ्वीवर वाजू लागतील व उन्हाच्या उष्ण ज्वाळा वातावरण तापवतील.
आपले भारतीय सण हे निसर्गाच्या स्थितीवर आधारलेले आहेत. अक्षय तृतीया हासुद्धा वसंतोत्सवाचे एक महत्त्वाचे अंग आहे. चैत्राचा पहिला दिवस हा हिंदू वर्षाचा आरंभ. यालाच संसार पाडवा, गुढीपाडवा, वर्षप्रतिपदा अशीही नावे आहेत. पाडव्यापासून रामनवरात्राचा आरंभ होतो. रामनवमी, हनुमान जयंती असे महत्त्वाचे दिवस याच चैत्रात येतात. तसेच साडेतीन मुहूर्तातले दोन मुहूर्त म्हणजे पाडवा व अक्षय तृतीया वसंत ऋतूंत येतात.
या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वांना अक्षय सुखसमृद्धी लाभो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत अशी ईश्‍वराजवळ प्रार्थना करते.