ब्रेकिंग न्यूज़

इकडम् तिकडम् सीर्फ एक घंटा!

  • सुरेश वाळवे

‘भारतीय प्रमाण वेळ’ हा आपल्याकडे थट्टेचा विषय झाला आहे, त्याची खरे तर आपल्याला शरम वाटली पाहिजे. विमाने उशिरा सुटणार, आगगाड्या उशिरा सुटणार, बसेस विलंबाने सुटणार…. मग प्रवासी वेळेवर पोचायचा कसा? आपल्या देशाला आज खरी गरज आहे ती समयबद्धतेची!

या सदराच्या दुसर्‍याच लेखांकात स्मृती इराणींना आकाशवाणीचा गलथान कारभार सुधारण्यासंबंधात साकडे घातले होते, ते वाचकाना आठवतच असेल. पण दोन महिन्यांच्या आत त्यांच्याकडून ते खातेच प्रधानमंत्र्यांनी काढून घेतले असल्याने आता राज्यवर्धन सिंह राठोड यांना गार्‍हाणे घालण्याखेरीज दुसरा मार्ग नाही. गत महिन्याच्या शेवटास दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जो फियास्को झाला, त्यासाठी स्मृतीजींना जबाबदार धरून ही कारवाई करण्यात आली, हे स्पष्ट आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी त्यांचे मनुष्यबळ साधन विकास मंत्रालय अशाच प्रकारे ‘अन्‌सेरेमोनियसली’ काढून ते प्रकाश जावडेकर यांना दिले होते. श्रीमती इराणी या पूर्वीच्या टीव्ही कलाकार असल्याने त्यांच्या पेशाशी संबंधित विभाग देऊन पहावा, असे मोदीजींनी ठरवले असावे. तेथेही त्यांची कामगिरी समाधानकारक न वाटल्याने हे पाऊल उचलले गेल्याचे दिसते. पण उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरलेली असणार ती राष्ट्रपतींची नाराजी. आपण अवघ्याच विजेत्यांना पुरस्कार प्रदान करीन. फक्त तासभर समारंभस्थळी राहीन, असे म्हणे महामहिमांनी माहिती व नभोवाणी खात्याला आधीच स्पष्ट केले होते. खात्याच्या अधिकार्‍यांनी आदल्या दिवशी गौण/दुय्यम विजेत्यांना कल्पना दिली की, त्यांना मंत्री-राज्यमंत्री पुरस्कार प्रदान करतील. फक्त महत्त्वाचे अकरा पुरस्कार रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते प्रदान केले जातील. या प्रकारामुळे नाराज-संतप्त बनलेल्या विजेत्यांनी विज्ञान भवनातील समारंभावर बहिष्कार घालून श्रीमती इराणी आणि श्री. राठोड यांना आपण महत्त्व देत नाही, हे दाखवून दिले. राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाचा विचका होऊन उलट तो वादाचा विषय बनला. इतका की, खुद्द प्रधानमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. त्यातही राष्ट्रपतींनी या सार्‍या प्रकारास खात्याला जबाबदार धरून तसे प्रधानमंत्र्यांना कळविले. आपण तासापेक्षा अधिक वेळ देऊ शकत नाही, हे आधीच स्पष्ट केले होते, तेही त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणले. चूक कोण, बरोबर कोण हे आपण येथे बसून ठरवू शकत नसलो तरी राष्ट्रपतींची भूमिका योग्य आहे.
वाचकांना माहीतच असेल की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आदींचे कार्यक्रम मिनिट टु मिनिट चालतात. म्हणजे ठरलेल्या ठोक्याला सुरू होतात आणि संपतात. ते सर्वसाधारणपणे तासभर चालतात. (आणि तेवढेच चालले पाहिजेत.)
आपल्याकडे हल्ली कार्यक्रमांची रेलचेल झाली आहे अन् ही तथाकथित सांस्कृतिक/सांगीतिक मेजवानी अजीर्ण होण्याच्या पातळीवर कशी पोचली आहे, याचा ऊहापोहही पंधरा दिवसांपूर्वीच्या सदरात केला होता. एक सांगा, हे कार्यक्रम वेळीच सुरू होतात का? वेळीच संपतात का? वास्तविक त्यात कठीण काही नाही. पण नियोजन बरोबर नसल्याने आणि ढिसाळ आयोजनामुळे सगळा भरकटलेपणा जाणवतो. महनीय व्यक्ती प्रमुख पाहण्या म्हणून बोलावल्या असतील तर त्याही बर्‍याचदा वेळेवर पोचत नाहीत. त्यांची तशी इच्छा नसते, असे नाही. पण ऐन वेळा आणखी काहीतरी कामात गुंतून पडल्याने ते उशिरा पोचतात. मुख्य म्हणजे दोन कार्यक्रमांमध्ये वेळेचे किती अंतर ठेवायला हवे, याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आपल्याकडे ८०च्या दशकात एक ‘लोकप्रिय’ मंत्री होते. त्यांची दैनंदिनी एवढी व्यस्त असायची की, ते कार्यक्रमबरहुकूम अमलात येणे अशक्यप्राय ठरावे. उदा. पहिला कार्यक्रम सकाळी १० वा. पेडण्याला. पण स्वारी पोचायची ११ वाजता. दुसरा १२ वाजता काणकोणला. आता पेडणे कुठे, काणकोण कुठे; या अंतराचा काही विचार. पुन्हा मध्ये मतदारसंघात आलतू फालतू काही तरी असायचे. असे करता करता सायंकाळी ७चा कार्यक्रम रात्री १० वाजता सुरू होऊन मध्यरात्री आटोपायचा. सगळ्याच कार्यक्रमांची रखडपट्टी आणि विचका. लोकही विलक्षण. त्यांनी पर्याय नाही, या भावनेने हे सगळे सहन करायचे.

अतिमहनीय पाहुण्यांच्या बाबतीत असे चालत नाही. भाषणांचा सोस, हे स्थानिक पातळीवर एक मोठेच दुखणे होऊन बसले आहे. तोंडाची वाफ दवडायची तरी किती? काळवेळ वगैरे कशा-कशाचेही भान न ठेवता हाती माइक आला रे आला, अक्कल पाजळणे सुरू. प्रेक्षक/श्रोते यांची सहनशीलता किती म्हणून ताणायची? राष्ट्रीय स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना अनेक अवधाने सांभाळावी लागतात. परंतु स्थानिक पातळीवर तरी एवढा पसरटपणा कशासाठी?
आधी केले, मग सांगितले या म्हणीनुसार प्रस्तुत लेखकाचा गेल्या दहा वर्षांतील किमान तेवढ्या कार्यक्रमांचा अनुभव नमूद करणे अनाठायी ठरू नये. किंचित आत्मप्रौढीचा वास येईल, त्याला इलाज नाही. फक्त एकाचा अपवाद वगळता माझे सारे कार्यक्रम जाहीर वेळेला, अगदी ठोक्याला सुरू होऊन तासाभरात आटोपले. नामवंत पाहुणे असूनसुद्धा हे शक्य झाले कारण त्यांना नम्रपणे आधीच दिलेली कल्पना. तुमचे सिरियसनेस जेव्हा त्यांना कळते, तेव्हा ते जीव तोडून वेळी पोचायचा प्रयत्न करतात, हा अस्मादिकांचा अनुभव. हे पहा, एका तासात तुम्हाला मोकळा करायची जबाबदारी माझी. धिस इज अ जेन्टलमन्स वर्ड. मात्र उपकार करून वेळीच पोचा, अशी गळ घातली तर कोण तुमचा टाइम पाळणार नाही? सूत्रसंचालन, स्वागत, प्रास्ताविक अन् आभारप्रदर्शन हे थोडक्यातच आटोपले पाहिजे. पांडित्य दाखवायची ती जागा वा संधी नाही. अन् ‘पाहुण्यांचा परिचय’ म्हणून जे काही चावून चोथा झालेले चर्‍हाट लावले जाते, ते तर सहनशीलतेचा कडेलोट करणारे. अरे, नामवंत, प्रसिद्ध, सर्वपरिचित म्हणून तुम्ही त्यांना बोलावलेत ना? त्यांची पदे, कामगिरी वगैरे सारे श्रोत्यांना माहीत नाही, असे समजून छापील ‘बायो डाटा’ची रटाळ उजळणी का करायची? हां, पाहुणे परराज्यातील असतील, कर्तृत्ववान असले तरी फार परिचित नसतील तर त्यांची ओळख करून द्यायला हरकत नाही. पण तिखटमीठ लावून, असलेले नसलेले गुण चिकटवून पाहुण्यांना हरभर्‍याच्या झाडावर चढविण्याचा किळसवाणा प्रकार चालतो, तो ताबडतोब बंद व्हायला हवा.
‘पाहुण्यांचे शब्दफुलांनी स्वागत झाले. आता त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करू या,’ असे सूत्रनिवेदकाने म्हटले की, अंगावर काटा येतो. कारण प्लास्टिकच्या पारदर्शक कागदात बांधलेली घुसमटणारी फुले डोळ्यांपुढे येतात. ‘बुके’ आणि ‘बुफे’ हे जणू आपल्या आधुनिक सांस्कृतिक जीवनाचे दोन अविभाज्य भाग बनावेत, इतकी त्यांनी भारतीयत्वावर कुरघोडी केली आहे. बरे, हे ‘बुकेमहाशय’ जवळपास तरी हवेत! ते प्रेक्षागृहाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात वा दूरवर असणार. नावाचा पुकारा झाल्याबरोबर ते धावतधावत मंचावर येणार. पाहुण्यांचे सपुष्प स्वागत करणार. त्यात गेली चारपाच मिनिटे. तोवर निवेदक, पाहुणे आणि प्रेक्षक तिष्ठत राहिलेले. पाहुणे तर कधी एकदा हे पुष्पप्रदान होतेय, त्याची वाट बघत उभे! हे सारे शोभादायक आहे का? पण आपले बहुतेक सर्व सार्वजनिक समारंभ असेच एवढे तिष्ठत ठेवणारे बनू लागले आहेत की, संताप यावा.

आता अधिक मास सुरू झाला म्हणून सुस्कारा सोडायचा. कारण लग्न-मुंजींचे मुहूर्त नसतात. पण विवाह समारंभात गेल्या काही काळापासून जो एक वधू-वराचा कपडे बदलण्याचा नामक कार्यक्रम असतो, तो शेकडो निमंत्रितांच्या वेळेला कस्पटासमान मानणारा आहे. डोईवर मंगलाक्षता पडल्यानंतर अंतरपाट दूर होऊन नवरा-नवरीने एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या रे घातल्या की, उभयता शेजारील राखीव कक्षामध्ये जी अंतर्धान पावतात, ती नव्या कोर्‍या कपड्यानिशी पुनरपि उगवायला चांगला तास-पाऊण तास घेतात. तोवर बिचारे निमंत्रित देवाची करावी तशा प्रतीक्षेत हॉलमध्ये रांगेत उभे. सुदैव, हल्ली अहेराचे प्रस्थ ओसरले आहे. नपेक्षा रंगीत कागदामध्ये मंडित ते भले मोठे बॉक्स सांभाळत उभे राहणे, ही एक शिक्षाच असायची. बरे, आपण आलोय तेव्हा वधु-वराला तोंड दाखवून कॅमेर्‍यात छबी बद्ध करून जाणे आवश्यक. पण त्यातही किती वेळाची बरबादी! डावीकडून रांग असेल तर उजवीकडून व्हीआयपीना प्राधान्य. त्यांच्या कृपा(?)कटाक्षासाठी आसुसलेले काहीजण आपली रांग सोडून त्यांच्यामागे. या सार्‍यात गोंधळ आणि विचका. मंचावर फक्त छायाचित्रकार/कॅमेरामन याचा अधिकार. ते सांगतील तोवर वधुवराच्या दोन्ही बाजूना निमंत्रितांनी उभे राहायचे, मागे पुढे व्हायचे. ‘हस्तिदंती’ करायची. थोडक्यात, आपले सारे सांस्कृतिक – सार्वजनिक जीवन हे असे पसरट, ढिसाळ, वेळेला काडीचीही किंमत न देणारे आणि सवंग बनले आहे. आपल्या खेडेगावात (आता ती तशी उरलेली नाहीत, तरी) तर विचारूच नका. कोणा घरी लग्न वा श्रीसत्यनारायणाची पूजा म्हणजे कर्णासुराचा सकाळपासून ताप. त्यांवर थिल्लर फिल्मी गीतांचा कर्णकटू धूमधडाका. प्रसादाचे द्रोण आता प्लॅस्टिकचे. ते नंतर सर्वत्र विखुरलेले. पोराटोरानी अर्धवट खाऊन फेकून दिलेल्या प्रसादाचा ‘लाभ’ मग हुंगत हुंगत फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांच्या भाग्यात. काही प्रसाद भक्तांच्या पायतळी! बिचार्‍या सत्यनारायणाचे काय हे दुर्दैव!
खाजगी जीवनात काही शिस्तबिस्त असो वा नसो, तिचा कोणाला ताप नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी, सणा-उत्सवात अन् समारंभात जेव्हा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी स्थिती होते, तेव्हा उबग येतो. नेमके, नेटके आयोजन असेल तर सगळ्यांना हुरूप. म्हणून राष्ट्रपतीनी फक्त एका तासाच्याा कार्यक्रमाचा जो निर्णय घेतला आहे तो अभिनंदनीय तर आहेच; अनुकरणीयदेखील होय. महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल आदींची भाषणे छापील असतात, ती त्यासाठी. (मग भले ती त्यांच्या प्रसिद्धी सचिवानी लिहिलेली का असेनात!)
राष्ट्रगीताने नांदी आणि ‘जन गण मन’नेच भरतवाक्य. तेदेखील फक्त ५२ सेकंदांमध्ये आटोपणे अनिवार्य. ‘भारतीय प्रमाण वेळ’ हा आपल्याकडे थट्टेचा विषय झाला आहे, त्याची खरे तर आपल्याला शरम वाटली पाहिजे. विमाने उशिरा सुटणार, आगगाड्या उशिरा सुटणार, बसेस विलंबाने सुटणार…. मग प्रवासी वेळेवर पोचायचा कसा? आपल्या देशाला आज खरी गरज आहे ती समयबद्धतेची!