इंधन दरवाढीविरोधात आज कॉंग्रेसचे धरणे

 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने डिझेल व पेट्रोलच्या दरात सतत वाढ करण्याचे जे धोरण अवलंबिले आहे त्याच्या निषेधार्थ कॉँग्रेस पक्षाने आज सोमवार दि. २९ जून रोजी उत्तर व दक्षिण गोव्यात दोन तासांच्या धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दक्षिण गोव्यात मडगाव जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर तर उत्तर गोव्यात म्हापशातील उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी १० ते १२ या दरम्यान धरणे धरण्यात येणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले. या दरवाढीच्या निषेधार्थ आम्ही हे धरणे धरणार असून ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात येणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. यावेळी मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात येणार आहे. तसेच कॉंग्रेस समितीचे समाजमाध्यम पथक ‘पेट्रोलियम पदार्थ दरवाढीवर बोला’ या विषयावरील ऑनलाईन मोहिमही सुरू करणार आहे. या दरवाढीवर बसमालक, ट्रकमालक, टॅक्सीवाले, ट्रॉलरवाले, रिक्षावाले, मोटरसायकल पायलट, पिकअपवाले, शेतकरी व पगारदार यांचे काय हाल होत आहेत याची माहिती देणारे व्हिडिओ व पोस्ट समाजमाध्यमावर अपलोड करण्यात येतील.