इंग्लंड दौर्‍यासाठी विंडीज संघाची घोषणा

>> डॅरेन ब्राव्हो, किमो पॉल, शिमरॉन हेटमायरची माघार

इंग्लंडविरुद्धच्या प्रस्तावित तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विंडीजने काल बुधवारी आपला १४ सदस्यीय संघ जाहीर केला. ही मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये जाण्यास विंडीजच्या तीन खेळाडूंनी मात्र नकार दिला आहे. यात नवोदित शिमरॉन हेटमायर, कसोटी स्पेशलिस्ट डॅरेन ब्राव्हो व अष्टपैलू किमो पॉल यांचा समावेश आहे. माघार घेतलेल्या खेळाडूंवर कोणतीही कारवाई केली जाणार नसून आम्ही त्यांच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो, असे मंडळाने सांगितले आहे.

क्रिकेट वेस्ट इंडीज निवड समितीने मुख्य संघासोबतच ११ राखीव खेळाडूंची निवड केली. क्रिकेट वेस्ट इंडीजने यासंबंधी निवेदन जारी करत त्यात म्हटले आहे की, इंग्लंड सरकारच्या अंतिम मान्यतेनंतरच ही मालिका खेळवली जाईल. मान्यता मिळाली तर वेस्ट इंडीज ८ जुलैपासून जैव सुरक्षित वातावरणात खेळल्या जाणार्‍या सलग तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेमध्ये विस्डेन ट्रॉफीचा बचाव करेल. वेस्ट इंडीजचा संघ या आठवड्यात कोविड-१९ चाचणी केल्यावर ८ जून रोजी खासगी चार्टरवर इंग्लंडला रवाना होणार आहे. जर ही मालिका झाली तर मार्चनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट होण्याची ही पहिलीच वेळ असेल. माघार घेतलेल्या तीन खेळाडूंऐवजी विंडीजने केवळ दोन बदली खेळाडू निवडले आहेत. यात मधल्या फळीतील फलंदाज एनक्रोमा बोनर व जलदगती गोलंदाज चेमार होल्डर यांचा समावेश आहे.

२०१६ सालच्या १९ वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेत खेळलेला चेमार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आला आहे. २०१९-२० या मोसमात त्याने १८.९१च्या सरासरीने ३६ बळी घेतले आहेत. ३१ वर्षीय बोनर याच्या गाठीशी ६९ प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. ३३२१ धावा त्याच्या नावावर आहेत. विंडीजकडून दोन टी-ट्वेेंटी आंतरराष्ट्रीय सामनेदेखील त्याने खेळले आहेत. वेस्ट इंडीजच्या चार दिवसीय अजिंक्यपद स्पर्धेच्या मागील मोसमात त्याच्या नावावर ५२३ धावा जमा असून आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने त्याने ४५ प्रथमश्रेणी बळीदेखील घेतले आहेत. न्यूझीलंड (२०१७) दौर्‍यावर कसोटी पदार्पण केलेल्या रेयमन रिफर याचे विंडीज संघात पुनरागमन झाले आहे. २०१९-२० च्या मोसमात फलंदाजी व गोलंदाजीत त्याची सरासरी अनुक्रमे २५.५५ व ३०.०६ अशी राहिली आहे.

वेस्ट इंडीज संघ ः जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शेट होप, शेन डावरिच, रॉस्टन चेज, शामराह ब्रूक्स, रहकीम कॉर्नवाल, एनक्रुमा बोनर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कॅम्पबेल, रेयमन रिफर, किमार रोच व जर्मेन ब्लॅकवूड.
राखीव खेळाडू ः सुनील अंबरिस, जोशुआ डी सिल्वा, शेन्नन गेब्रियल, किओन हार्डिंग, कायल मायर्स, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्किनो मिंडले, शेन मोसेेले, अँडरसन फिलिप, ओशेन थॉमस व जोमेल वार्रिकन.