इंग्लंडसमोर अफगाणिस्तानची शरणागती

>> यजमानांचा १५० धावांनी विजय

>> कर्णधार ऑईन मॉर्गनचे झंझावाती शतक

यजमान इंग्लंडने काल मंगळवारी विश्‍वचषक क्रिरेट स्पर्धेतील सामन्यात दुबळ्या अफगाणिस्तानवर १५० धावांनी एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार ऑईन मॉर्गनच्या झंझावाती १४८ धावांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानसमोर ३९८ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. पण अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच पोहोचता आले. इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांतून ८ गुण मिळवत गुणतक्त्यात अव्वलस्थानी धडक मारली. कालच्या पराभवासह अफगाणिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान आटोपले आहे.

आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने अत्यंत सावध सुरुवात केली. आर्चरने नूर अलीचा शून्यावर त्रिफळा उडविल्यानंतर दुसर्‍या गड्यासाठी नैब व रहमत यांनी ४८ धावांची भागीदारी केली. रहमत शाहने चांगली झुंज दिली पण तो देखील ४६ धावांवर बाद झाला. हशमतुल्ला शाहिदी याने आपले नववे एकदिवसीय अर्धशतक केले. तो ७६ धावा काढून तंबूत परतला. असगर अफगाण देखील अर्धशतकाच्याजवळ आला, पण तो ४४ धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानने धावांचा पाठलाग करताना विजयाच्या दृष्टीने खेळ न करता पराभवाचेे अंतर कमी करण्यावर जास्त भर दिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जायबंदी जेसन रॉयच्या जागी संधी मिळालेला जेम्स व्हिन्स या संधीचा लाभ घेण्यात कमी पडला.

संघाच्या ४४ धावा फलकावर लागलेल्या असताना वैयक्तिक २६ धावा करून त्याने तंबूची वाट धरली. त्यानंतर माजी कर्णधार ज्यो रूटच्या साथीने जॉनी बॅअरस्टोवने डाव सांभाळला. या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. वनडेत ११व्या वेळी अर्धशतकी वेस ओलांडलेला बॅअरस्टोव शतकाला मात्र मुकला. ९० धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. ज्यो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले ३२वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तुफानी फटकेबाजी करत केवळ ५७ चेंडूत १०० धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार ठोकत अफगाणी गोलंदाजांच्या चिंधड्या उडविल्या. त्याने केवळ ७१ चेंडूना सामोरे जाताना १४८ धावांची विस्फोटक खेळी साकारली. आक्रमक फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ४ षटकार आणि १ चौकार खेचत ९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला ५० षटकात ६ बाद ३९७ धावांची मजल मारून दिली. अफगाण- कडून दौलत झादरान आणि गुलबदिन नैब यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

धावफलक
इंग्लंड ः जेम्स व्हिन्स झे. मुजीब गो. दौलत २६, जॉनी बॅअरस्टोव झे. व गो. नैब ९० (९९ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार), ज्यो रुट झे. रहमत गो. नैब ८८ (८२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), ऑईन मॉर्गन झे. रहमत गो. नैब १४८ (७१ चेंडू, ४ चौकार, १७ षटकार), जोस बटलर झे. नबी गो. दौलत २, बेन स्टोक्स त्रि. गो. दौलत २, मोईन अली नाबाद ३१ (९ चेंडू, चौकार, ४ षटकार), ख्रिस वोक्स नाबाद १, अवांतर ९, एकूण ५० षटकांत ६ बाद ३९७
गोलंदाजी ः मुजीब रहमान १०-०-४४-०, दौलत झादरान १०-०-८५-३, मोहम्मद नबी ९-०-७०-०, गुलबदिन नैब १०-०-६८-३, रहमत शाह २-०-१९-०, राशिद खान ९-०-११०-०

अफगाणिस्तान ः नूर अली झादरान त्रि. गो. आर्चर ०, गुलबदिन नैब झे. बटलर गो. वूड ३७, रहमत शाह झे. बॅअरस्टोव गो. रशिद ४६, हशमतुल्ला शाहिदी त्रि. गो. आर्चर ७६, असगर अफगाण झे. रुट गो. राशिद ४४, मोहम्मद नबी झे. स्टोक्स गो. राशिद ९, नजिबुल्ला झादरान त्रि. गो. वूड १५, राशिद खान झे. बॅअरस्टोव गो. आर्चर ८, इक्रम अली खिल नाबाद ३, दौलत झादरान नाबाद ०, अवांतर ९, एकूण ५० षटकांत ८ बाद २४७
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स ९-०-४१-०, जोफ्रा आर्चर १०-१-५२-३, मोईन अली ७-०-३५-०, मार्क वूड १०-१-४०-२, बेन स्टोक्स ४-०-१२-०, आदिल रशिद १०-०-६६-३

मॉर्गन बनला षटकारांचा बादशहा
इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॉर्गनने १७ षटकार ठोकले. वनडेत याआधी तीन खेळाडूंच्या नावावर हा विक्रम होता. रोहित शर्मा (वि. ऑस्ट्रेलिया, बंगळुरू, २ नोव्हेंबर २०१३), दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स (वि. वेस्ट इंडीज, जोहान्सबर्ग, १८ जानेवारी २०१५) आणि वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल (वि. झिंबाब्वे, कॅनबेरा, २४ फेब्रुवारी २०१५) यांनी एका डावात १६ षटकार ठोकले होते.

राशिद खानची नकोशी ‘सेंच्युरी’
अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान याची इंग्लंडच्या फलंदाजांनी धुलाई केली. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या राशिदच्या गोलंदाजीवर इंग्लंडने तब्बल ११ षटकार लगावताना ३ चौकारांसह ११० धावा केल्या. आपल्या ९ षटकांत त्याने १२.२२ च्या इकॉनॉमीने ११० धावांची खैरात केली. क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासातील तो सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. एकूण एकदिवसीय क्रिकेटचा विचार केल्यास सर्वाधिक धावा देणार्‍यांमध्ये राशिदचा तिसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाचा मायकल लुईस (११३ धावा) पहिल्या व पाकिस्तानचा वहाब रियाझ