इंग्लंडची फायनलमध्ये धडक

>> ऑस्ट्रेलियावर ८ गडी व १०७ चेंडू राखून विजय

काल गुरुवारी झालेल्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ८ गडी व १०७ चेंडू राखून दारुण पराभव करत क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेची अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणार्‍या फायनलमध्ये इंग्लंडची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. त्यमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवीन विश्‍वविजेता मिळणार हे नक्की झाले आहे. ऑस्ट्‌ेलियाने विजयासाठी ठेवलेले २२४ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडने ३२.१ षटकांत गाठत दिमाखात आगेकूच केली. केवळ २० धावा मोजून ३ गडी बाद केलेला ख्रिस वोक्स व तुफानी फटकेबाजी करून कांगारूंना पळता भुई थोडी केलेला जेसन रॉय या द्वयीने इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

धावांचा पाठलाग करताना जेसन रॉय (८५) कांगारूंच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ९ चौकार व ५ षटकारांसह आपली खेळी सजवली. जॉनी बॅअरस्टोवसह त्याने १२४ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. स्टार्कने जॉनीला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे रॉयला संभाव्य शतकापासून वंचित रहावे लागले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. सामना सुरू होऊन काही मिनिटांतच त्यांची ३ बाद १४ अशी दयनीय स्थिती झाली. स्टीव स्मिथ (८५) व आलेक्स केरी (४६) यांनी चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचून संघाचा कोसळता डोलारा सावरला. केरी परतल्यानंतर स्मिथने डाव पुढे नेला. त्याने आपले २३वे वनडे अर्धशतक झळकावले. पण दुसर्‍या बाजूने त्याला फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकांत २२३ धावांत आटोपला. ख्रिस वोक्स आणि आदिल रशीदने प्रत्येकी ३, जोफ्रा आर्चरने २ आणि मार्क वूडने १ गडी बाद केला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर झे. बॅअरस्टोव गो. वोक्स ९, ऍरोन फिंच पायचीत गो. आर्चर ०, स्टीव स्मिथ धावबाद ८५, पीटर हँड्‌सकांेंब त्रि. गो. वोक्स ४, आलेक्स केरी झे. व्हिन्स गो. रशीद ४६, मार्कुस स्टोईनिस पायचीत गो. रशीद ०, ग्लेन मॅक्सवेल झे. मॉर्गन गो. आर्चर २२, पॅट कमिन्स झे. रुट गो. रशीद ६, मिचेल स्टार्क झे. बटलर गो. वोक्स २९, जेसन बेहरेनडॉर्फ त्रि. गो. वूड १, नॅथन लायन नाबाद ५, अवांतर १६, एकूण ४९ षटकांत सर्वबाद २२३
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स ८-०-२०-३, जोफ्रा आर्चर १०-०-३२-२, बेन स्टोक्स ४-०-२२-०, मार्क वूड ९-०-४५-१, लियाम प्लंकेट ८-०-४४-०, आदिल रशीद १०-०-५४-३

इंग्लंड ः जेसन रॉय झे. केरी गो. कमिन्स ८५ (६५ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार), जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. स्टार्क ३४, ज्यो रुट नाबाद ४९, ऑईन मॉर्गन नाबाद ४५, अवांतर १३, एकूण ३२.१ षटकांत २ बाद २२६
गोलंदाजी ः जेसन बेहरेनडॉर्फ ८.१-२-३८-०, मिचेल स्टार्क ९-०-७०-१, पॅट कमिन्स ७-०-३४-१, नॅथन लायन ५-०-४९-०, स्टीव स्मिथ १-०-२१-०, मार्कुस स्टोईनिस २-०-१३-०