आहार आणि आपली त्वचा

आहार आणि आपली त्वचा

  • डॉ. अनुपमा कुडचडकर
    त्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉस्पि. जुने गोवे)

ज्यांच्या शरीरात जास्त चरबी असते त्यांची गळ्याभोवतालची, काखेतली व जांघेमधील त्वचा काळी व जाडसर बनते. चामखीळ येतात. चेहर्‍यावरची त्वचा जाड होते. फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

आपण दररोज जे काय खातो त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आपलं आरोग्य म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचं आरोग्य. त्यातच त्वचेचं आरोग्यही आलं. तर आपल्या त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपला आहार समतोल असायला हवा.
आपण जे काय खातो ते सगळं आपल्या शरीरित मिसळतं. आपल्या आहारात कर्बोदके (कार्बोहायड्रेट्‌स), प्रथिने(प्रोटीन्स), स्निग्ध पदार्थ (फॅट्‌स), जीवनसत्व (व्हिटामिन्स) आणि क्षार किंवा धातू (मिनरल्स) हे घटक प्रामुख्याने असतात. समतोल आहार म्हणजे या घटकांचे आपल्या आहारातील प्रमाण समतोल असायला हवे. कुठलाही घटक जास्त प्रमाणात शरीरात गेला तर त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात. आपल्या वयानुसार आपला आहार बदलायला हवा. वय जसजसं वाढत जातं तसतसं गोड व तेलकट पदार्थ आहारातून टाळले पाहिजेत.

पालेभाज्या, फळं, सलाद या गोष्टींचा वापर आहारात जास्त व्हायला हवा. भाज्या जास्त शिजवून खाऊ नयेत. कुठलीही गोष्ट जास्त शिजली की त्यामधील जीवनसत्वे नष्ट होतात. ‘काकडी, गाजर, बीट, टमाटर, कांदा इ.चं सलाद बनवून रोज खाल्लं तर शौचाला त्रास होणार नाही. शौचाला रोज साफ व्हायला हवं. दिवसाला दोन तरी फळं खावीत. पालेभाज्या व फळांमध्ये जीवनसत्वे व क्षार जास्त प्रमाणात असतात, ज्याची शरीराला व त्वचेला गरज असते.

जर जीवनसत्वांची कमतरता शरीरात निर्माण झाली तर….
– त्वचा कोरडी, काळसर, सुरकुतलेली दिसते. व्हिटामिन-ए त्वचेला मऊ व मुलायम ठेवते.

– केसांच्या वाढीसाठीही माणसाला व्हिटामिन-ए ची गरज असते.
हल्ली फास्ट फूडचा जमाना आहे. त्यामुळे घरच्या जेवणापेक्षा बाहेरच्या जेवणाची ओढ काहींना जास्त लागलेली दिसते- चिकन, मटण जास्त खाऊन पालेभाजी कमी खाणारेही कित्येक जण आढळतात. काहींना फक्त तेलकट जेवणच आढळते तर काही गोड पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात करतात.

– काहींना पाण्याच्या जागी थंड पेय पिण्याची आवड असते.
अशा वाईट सवयींमुळे त्यांचं वजन वाढायला लागतं. शरीरात चरबी वाढते. त्यामुळे आरोग्य बिघडते. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, एकान्थोसिस नायग्रीकानस, ओबेसिटी सिंड्रोम, डायबिटीज, ब्लड प्रेशर, आर्थ्रायटीस, स्ट्रोक, हृदय विकार यांसारखे रोग त्यांना एकदम कोवळ्या वयात होताना दिसतात.
– ज्यांच्या शरीरात जास्त चरबी असते त्यांची गळ्याभोवतालची, काखेतली व जांघेमधील त्वचा काळी व जाडसर बनते. चामखीळ येतात. चेहर्‍यावरची त्वचा जाड होते. फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
– स्थूल लोकांना घाम जास्त येतो. तसेच जाड्या मुलींना मासिक पाळीचा त्रास जास्त होतो.

– त्याचबरोबर चेहर्‍यावर मुरुमं येणं, चेहर्‍यावर दाट केस येणं अशा प्रकारच्या समस्या पण दिसायला लागतात.
आपल्या आहाराचा परिणाम आपल्या शरीरावर होतो त्यासाठी चांगला पौष्टीक व समतोल आहार घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यायामही करणं तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहू शकतं आणि आपण आपलं आरोग्य निरोेगी ठेवण्यास समर्थ ठरतो.