आला परिक्षांचा काळ…

आला परिक्षांचा काळ…

  •  प्रा. नागेश सु. सरदेसाई

यावर्षी २६ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याचे शालांत मंडळाने नमूद केले आहे. त्यासाठी मुलांना तयारीची फार आवश्यकता आहे. पद्धतशीर अभ्यास केला तर निश्‍चितपणे मुलांना त्याचे फळ मिळणार आहे.
आजच्या २१व्या शतकात देशातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षांना सामोरे जावे. त्यासाठी अनेक शुभेच्छा!!

प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या पद्धतीने अभ्यास करत असतो. फेब्रुवारी महिना सुरू झाला की परीक्षांचे वेध लागतात. गोवा राज्यात शालांत मंडळाच्या बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा असतात. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा मानल्या जातात. बारावीची परीक्षा तर विद्यार्थ्याच्या जीवनातील विशिष्ट ध्येय गाठण्यास उपयोगी ठरते.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये घेतल्या जाणार्‍या या परिक्षांमध्ये जवळ जवळ १८,००० ते २०,००० विद्यार्थी असतात. यावर्षी २६ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याचे शालांत मंडळाने नमूद केले आहे. त्यासाठी मुलांना तयारीची फार आवश्यकता आहे. पद्धतशीर अभ्यास केला तर निश्‍चितपणे मुलांना त्याचे फळ मिळणार आहे. हा अभ्यास कसा करावा, यावर अनेक संशोधने केली जात आहेत. अभ्यास करण्याकरिता एक प्रकारच्या कौशल्याची गरज असते, हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. ते कौशल्य अंगी बाणवायला हवे. वारंवार त्याची उजळणी व्हायला पाहिजे.

आज केवळ एका जागेवर बसून अभ्यास करणारे नाही तर अंथरुणावर झोपून अभ्यास करणारे विद्यार्थीसुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. ते अत्यंत चुकीचे आहे. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी तो मन लावून, संपूर्ण एकाग्रतेने करायला हवा. तसा अभ्यास केल्यानंतर यश हे निश्‍चित समजावे. म्हणूनच अभ्यास चांगला कसा करता येईल यासाठी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे….
– आम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे गरजेचे आहे. तसेच अभ्यास करण्याचा कंटाळा करु नये किंवा टाळाटाळ करु नये.
– रिकाम्या वेळेचा अभ्यासासाठी सदुपयोग करावा किंवा अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे. आपल्याला कोणता विषय सोपा किंवा कठीण आहे, त्यानुसार त्या त्या विषयाच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे फार महत्त्वाचे आहे.
– परीक्षेचे पेपर्स सोडवणे, वेळेचे भान ठेवून उत्तरे लिहिणे ही गोष्ट सर्व मुलांनी लक्षात ठेवायला हवी.
– परीक्षा जवळ आल्यावर आपल्या आहार-विहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. वेळोवेळी गरजेनुसार शरीराला आराम देणे व कोणताही ताण-तणाव मनावर येऊ न देणे या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

अशाप्रकारे काही गोष्टींचे पालन केल्यास परीक्षा सहजरीत्या देण्यास मदत होईल. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्झाम वॉरीयर्स’ नावाचे पुस्तक प्रकाशित करून संपूर्ण भारतामध्ये क्रांती घडवून आणण्याचा ध्यास घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ‘परिक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम दिल्ली शहरात राबवून भारताच्या कानाकोपर्‍यातून जवळजवळ २००० विद्यार्थ्यांना बोलावून कार्यक्रम यशस्वी करताहेत. आमच्या देशात परीक्षा आणि परीक्षांच्या निकालाच्या काळात घडणार्‍या आत्महत्या आणि नैराश्य यांना हद्दपार करण्यासाठीच हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. परिक्षांना आपल्या जीवनातील एक सण-उत्सव समजावे, असे मोदीजींचे ठाम मत आहे.
जीवनात आम्हाला काय बनायचे आहे, आमचे ध्येय काय आहे, हे प्रथम समजणे किंवा ठरवणे फार महत्त्वाचे आहे. त्यातूनच मग अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते व अभ्यासाकरिता लागणाची ऊर्जाही त्या ध्येयामुळेच आम्हाला मिळत असते. त्यासाठी मुळात शिक्षणाची आवड असणे, शिकण्याची इच्छा असणे फार गरजेचे आहे. अन्यथा ते शिक्षण फक्त वर्गापुरते सिमित राहते.

आम्हाला जर सुखी जीवन जगायचे असेल तर परीक्षेत प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे, ज्यामुळेच मोठे पद मिळण्याची आशा पल्लवीत होते. समाजात नावलौकिक, आदरसन्मान मिळून जीवनात समाधान मिळते. हे सर्व शिक्षणाद्वारे आम्ही मिळवू शकतो.

विल्यम शेक्सपियर म्हणत असत, ‘‘अभ्यास विद्यार्थ्यांकडे असलेली, स्वर्गातल्या तेजवंत सूर्यासारखी मोठी शक्ती आणि क्षमता होय.’’
स्वामी विवेकानंद म्हणत, ‘‘प्रत्येक माणूस हा ईश्‍वरच’’. त्याच्या अंगी फार बळ असते. आपल्याकडून अभ्यास होणार नाही असा नकारात्मक विचार कोणीच करू नये. शहरात काय किंवा गावात काय, अभ्यास हा कुणालाही करणे जमण्यासारखे आहे. मुलांमध्ये अडथळ्यांवर मात करण्याची किंवा अचडणींवर मार्ग काढण्याची क्षमता असतेच. फक्त महत्त्वाची आहे तर विद्यार्थ्यांच्या मनाची धारणा आणि शिकण्याचा दृढनिश्‍चय! आम्ही परिक्षेत यश मिळवले नाही तर आमची आणि आमच्या घरची परिस्थिती काय होईल, याची जाणीव विद्यार्थ्यांना असावी. परीक्षेत मिळालेले उत्तम यशच विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात कारणीभूत ठरते, हे समजणे गरजेचे आहे.

परीक्षांच्या वेळी शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करून अभ्यासाची तयारी करावी. अभ्यास करताना विद्यार्थ्यांची शोध घेण्याची भूमिका असावी. प्रत्येक विषय शिकणे हे एक आव्हान असल्यामुळे प्रत्येक विषय बारकाईने समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच दोन किंवा तीन मित्रांनी एकत्र बसून चर्चात्मक पद्धतीने अभ्यास जर केला तर त्याचा निश्‍चितच फायदा मिळतो. कारण त्यात एखाद्याला न समजणारी गोष्ट दुसरा चांगल्या पद्धतीने समजावून देईल आणि एकदुसर्‍याकडे पाहून विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता निश्‍चितपणे वाढते. त्यामुळे सर्वांगीण यश संपादन करणे शक्य होते. ‘पियर कल्चर’ ही आजच्या समाजातली एक चांगली गोष्ट आहे. शिवाय त्यामुळे मैत्री घट्ट होण्यास मदत होते. एका चांगल्या वातावरणात, चांगल्या मित्रांच्या सहकार्याने गोव्यातल्या तरुणांनी अभ्यास करून आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात चांगले यश संपादन करणे सहज शक्य आहे. तसेच आजच्या कौशल्य-शिक्षणाच्या युगात स्टार्ट-अप, मेक-इन्-इंडिया अशा उपक्रमांमध्ये भाग घेऊन त्या अनुषंगाने टीम वर्क फार महत्त्वाचे ठरू शकेल.

आज वेगवेगळ्या ऍप्सचा जमाना आहे आणि आम्ही टीव्हीवर निरनिराळे हेकाथॉन पाहतो. यामध्ये देशातील तरुण मंडळी एकीकडे बसून वेगवेगळ्या ऍप्सची निर्मिती कण्यात मग्न आहे. जर १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये यश संपादन करायचे असेल तर सर्व तरुणांनी एकाग्र होऊन आपल्या ध्येयावरती लक्ष ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी गोव्यातील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना एक गोष्ट सांगाविशी वाटते की सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ठिकाणावर ३० मिनिटे अगोदर पोहचून आपल्याला तणावापासून मुक्त ठेवावे. तसेच परीक्षा हा एक उत्सव समजून त्याच्या तयारीला लागावे. आजच्या २१व्या शतकात देशातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षांना सामोरे जावे. आमचा देश हा सर्वांत जास्त तरुणांचा देश असल्यामुळे बदल घडवून आणण्याची क्षमता आमच्यात आहे. त्यासाठी अनेक शुभेच्छा!!