(आरोग्य मंथन) ॥ वैद्य-महिमा ॥

  •  रमेश सप्रे

‘आपलं आरोग्य, आपल्याच हाती’- दुसर्‍याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या आत डोकावून पाहणं हा केवळ आरोग्याचाच नव्हे तर आनंदाचाही महामंत्र आहे.

शिक्षणाच्या कोणत्याही पद्धतीत महत्त्वाचा घटक असतो शिक्षक. बालक हे शिक्षणाचं नि शिक्षणक्रमातील सर्व उपक्रमांचं केंद्र असतो. त्याच्यासाठी तर सारे प्रयत्न नि प्रयोग सुरू असतात. त्याचप्रमाणे ‘रुग्ण’ हा वैद्यकीय सेवेचा, उपचारांचा मध्यबिंदू असतो. पण वैद्य किंवा डॉक्टर हा मात्र सर्वात महत्त्वाचा घटक असतो. उपचारपद्धती, औषधं उपलब्ध असली तरी रोगाचं निदान नि प्रत्यक्ष उपचार वैद्यच करत असतो.

वैद्य या शब्दात विद्- वेद- वेदवित्- विद्वान अशा सार्‍या अर्थछटा येतात. वेद म्हणजे आयुर्वेद समजलं तरी त्याला पंचमवेद म्हणून प्रतिष्ठा मिळालेली आहे. वैद्य हा नुसताच औषधांविषयीचा ज्ञानी असून भागत नाही, तर तो सेवाभावी, त्यागी, जीवनव्रती असावा लागतो. वैद्याचा हातगुण म्हणून एक प्रकार असतो. तो वैद्याची हुशारी, कौशल्य, निर्णयशक्ती यापेक्षा त्याची निरपेक्ष वृत्ती, आर्थिक बाजू लक्षात न घेता रोग्याचा रोग बरा व्हावा, त्याच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी आवश्यक ती सेवावृत्ती यावर वैद्याचा हातगुण अवलंबून असतो. आपल्यावर असलेलं माता- पिता- आचार्य- समाज- पूर्वज (ऋषीमुनी, साधुसंत) यांचं ऋण चुकवायची संधी जो देतो तो रुग्ण अशी रुग्णाबद्दल संस्कृतमध्ये कल्पना आहे.

वैद्यांबद्दल जशी आदराची, कृतज्ञतेची भावना असते, तशीच काहीशी तिरस्काराची, निषेधाची भावनाही असते. काही सुभाषितं पाहू या –
विद्यासमाप्तौ भिषजः तृतीया जातिरुच्यते |
अश्रुते वैद्यशब्दं हि, न वैद्य पूर्वजन्मना ॥
आयुर्वेदाचे महर्षी चरकाचार्यांचं हे सुवचन आहे.
अर्थ ः वैद्यकशास्त्राचा- त्यातील ज्ञानाचा, कौशल्यांचा- अभ्यास पुरा झाल्यावर वैद्याचा तिसरा जन्म झाला असं म्हणतात. अशा अभ्यासानंतरच त्याला वैद्य ही पदवी मिळते. पूर्वजन्मातील पुण्यकर्मांमुळे नव्हे.

इथं एक विशेष गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की मुलाची मुंज झाली की त्याला गुरुकडे शिकण्यासाठी नेले जायचे (उपनयन). त्यानंतर ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्याचा दुसरा जन्म होतो, म्हणून त्याला ‘द्विज’ म्हणतात. पण वैद्याच्या बाबतीत ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा तो ज्ञानाचा उपयोग रुग्णांसाठी वैद्य म्हणून करू लागतो तेव्हा त्याचा तिसरा जन्म होतो. म्हणून वैद्य असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबात जन्मल्यामुळे कुणी आपोआप वैद्य होत नाही तसंच पूर्वजन्मातल्या पुण्यकर्मांचा प्रभाव म्हणूनही कुणी वैद्य होत नाही. त्यासाठी वैद्यकीचं ज्ञान, त्याचं उपयोजन नित्यासाठी मनन, चिंतन आवश्यक आहे. म्हणून वैद्य बनून रुग्णसेवा करणं हे एक पवित्र व्रत मानलं गेलंय. ही सेवा विनामूल्य करावी ही अपेक्षा अर्थातच नाही. पण त्याचवेळी केवळ आर्थिक बाबींचा विचार करून नंतर रुग्णांची तपासणी नि औषधोपचार करणं हेही योग्य नाही. दुर्दैवानं हल्ली मोठ्या इस्पितळात आधी पैसे जमा केले तरच उपचार सुरू केले जातात. हे वैद्यकीय व्यवसायाला न शोभणारं आहे. असो.

एकूण ङ्गार पूर्वीपासून मानवाला आरोग्याच्या अडचणी सतावत आल्या आहेत. कारण वैद्याला नेहमी चांगले दिवस असतात. या अर्थाची सुभाषितं आहेत.
न प्राणिरहितो देशो, न च प्राणी निरामयः|
तस्मात् सर्वत्र भिषजां कल्पिता एव वृत्तयः॥
माणसांशिवाय कोणताही देश नसतो, त्याचप्रमाणे संपूर्ण आरोग्यवान असा कुणीही माणूस नसतो. त्यामुळे नेहमी आणि सगळीकडे वैद्यांचा व्यवसाय चांगला चालतो. आजचा विचार केला तर हे अधिकच पटतं. कारण वातावरणातील बदल, अनियमित हवामान, यातून निर्माण होणारे असंख्य विषाणू आणि त्यांच्यामुळे होणारे नवनवे रोग या चक्रात सारी मानवजात गुरङ्गटलीय. प्रगत, श्रीमंत देशही याला अपवाद नाहीत.
स्वस्थैः असाध्यरोगैश्च जन्तुभिः नास्ति किंचन|
कातरा दीर्घरोगाश्च भिषजां भाग्यहेतवः॥
ङ्गार अर्थपूर्ण विचार या सुभाषितात व्यक्त झालाय. निरोगी माणसाकडून वैद्याला काहीही लाभ होत नसतो. तसाच असाध्य रोग झालेला रुग्ण हताश होऊन, औषधाचा काहीही उपयोग होत नाही हे लक्षात आल्यामुळे वैद्याकडे जाणं, औषधोपचार करून घेणं बंद करतो म्हणून वैद्याला त्याच्यापासूनही अर्थप्राप्ती होत नाही. याउलट रोगाला उगीचच भिणारे (कातरा) आणि दीर्घकाळ औषधोपचार करून घेणारे रोगी हे खरं वैद्यांचं भाग्य असतं. यात रुग्णांचा अगतिक झाल्यामुळे नाइलाज असतो. म्हणून ते वैद्याकडे इलाज करून घेत राहतात.

हल्ली काही उपचारपद्धतीचं वैद्य आपण असाध्य रोग (अगदी वरच्या पातळीवर पोचलेला कर्करोगही) बरा करतो, अशी जाहिरात करतात. पण असं नसतं.
व्याधेस्तत्वपरिज्ञानं वेदनायाश्च निग्रहः|
एतद् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः॥
म्हणजे – रोगाची योग्य परीक्षा करणं, निदान करणं त्यानुसार औषधयोजना वा अन्य उपचार करून रुग्णाला बरं करणं यातच वैद्याचं ज्ञान, कौशल्य, अनुभव दिसून येतो. वैद्याचा वैद्यपणा (वैद्यस्य वैद्यत्वं), त्याचं कर्तृत्व दिसून येतं. तो कुणाच्याही जीवनाचा स्वामी (प्रभुरायुषः) नसतो. यालाच समांतर असं आणखी एक सुभाषित आहे.
अपि धन्वंतरिवैद्यः किं करोति गतायुषि |
धन्वंतरी हा देवांचा वैद्य. समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचा कुंभ घेऊन तो सागरातून वर येतो. कुंभातील अमृत अर्थातच आरोग्याचं, दीर्घजीवनाचं औषध असतं. अशा कुशल धन्वंतरीसारखा जरी एखादा विद्वान वैद्य असला तरी ज्याचं आयुष्य संपत चाललंय, ज्याचे दिवस भरत आलेयत त्याला तो वाचवू शकत नाही. चांगल्या वैद्यांच्या जीवनरक्षणाच्या संदर्भात एक सुभाषित आहे-
मंत्रिणा भिन्नसंधाने, भिषजां सांनिपातिके |
कर्मणि व्यज्यते प्रज्ञा, सुस्थे को वा न पंडितः ॥
समजा एखाद्या देशाचे दुसर्‍या देशाबरोबर असलेले मित्रत्वाचे संबंध नष्ट झाले तर ते पुन्हा जोडून कार्यक्षम करण्यात खर्‍या मंत्र्याच्या बुद्धीची कसोटी असते. त्याचप्रमाणे ज्या रोगांचं निदान आणि उपचार करणं अवघड आहे अशा रोगांचं सुयोग्य निदान करून रोग्याला बरं करण्यात वैद्याच्या बुद्धीची कसोटी लागते. ज्यावेळी सर्वकाही ठाकठीक आहे, आरोग्य व्यवस्थित आहे तेव्हा सारेचजण विद्वान असतात.
अनेक वर्षांच्या चिंतनशील अनुभवातून, रुग्णांबद्दलच्या आस्थेतून जे साध्य होतं ते केवळ उपाययोजना करून, औषधं देऊन नामानिराळे होणार्‍या वैद्यांना जमत नाही. वैद्याला एक अंतर्दृष्टी (इनसाइट), सहावं इंद्रिय (सिक्स्थ सेन्स) किंवा अंतःप्रेरणा (इंटयूशन) असणं हे रोग्यांसाठी एक वरदानच असतं. असे वैद्य आजकाल दुर्मीळ होत चाललेत.

वैद्यांच्या एकापेक्षा एक सरस अशा श्रेणी (ग्रेड्‌स) सांगितल्या आहेत.
राक्षसी मानुषी दैवी चिकित्सा त्रिविधा मता|
शस्त्रैः कषायैः लाहायैः, क्रमेणान्त्या सुपूजिता॥
विविध उपचारपद्धती वापरणार्‍या वैद्यांचे तीन प्रकार असतात- राक्षणी, मानवी अन् दैवी. शस्त्रक्रिया करणारे शल्यवैद्य (सर्जन्स) हे राक्षसी असतात. त्याकाळी वेदनाशामक औषधं (पेनकिलर्स) न वापरता शस्त्रक्रिया केल्या जात. साहजिकच होणार्‍या नरक-वेदनांमुळे रोग्यांना असे शल्यक्रिया करणारे वैद्य राक्षस वाटले नाहीत तरच नवल!
त्यांच्यापेक्षा जडीबुटी, काढे (बर्‍याच वेळा अगदी कडू) देऊन बरे करणारे वैद्य मध्यम मानले जायचे. पण श्रेष्ठ वैद्य असायचे ते निरनिराळ्या धातूंची भस्मं (सुवर्णभस्म, ताम्रभस्म, लोहभस्म इ.) आणि रस यांचा प्रयोग करणारे. रुग्णांना या प्रकारचे वैद्य आवडायचे. पण याहीपेक्षा मंत्रांचा प्रयोग करणारा वैद्य हा सिद्ध वैद्य मानला जात असे. सर्पदंशाचं विष उतरवणारे मांत्रिक; भुतानं पछाडलेल्या व्यक्तीला मंत्रविद्येचा वापर करून बरे करणारे वैद्य हे सर्वश्रेष्ठ मानले जात.

आजकाल असे ‘मांत्रिक’ आढळत नाहीत आणि जे भोंदू मांत्रिक असतात ते अडाणी लोकांच्या अंधश्रद्धांचा ङ्गायदा घेऊन त्यांना लुबाडत असतात. एका दृष्टीनं पाहिलं तर मंत्र देणारा हा चांगला समुपदेशक असू शकतो. तो रुग्णाला मनाची शक्ती वाढवून, त्याला स्वतःला सकारात्मक सूचना (पॉझिटिव्ह ऑटोसजेशन्) द्यायला लावून बरा करत असतो. कारण ऐंशी टक्क्यांहून सर्प हे विषारी नसतात. पण सर्पदंश झाला या मानसिक धक्क्यानंच रोगी दगावतात. तसेच अशक्त मनोवृत्तीच्या, आपल्यावर अन्याय होतोय, कुणाचं आपल्याकडे लक्ष नाहीये या कल्पनेनं जे मनोविकार निर्माण होतात त्यालाच अज्ञानानं, अंधश्रद्धेनं भुतानं पछाडलं असं म्हटलं जातं. अशा रुग्णांच्या बाबतीतही मंत्र म्हणून, मंत्रणा म्हणजे समुपदेशन (काऊन्सेलिंग) करून त्यांची मानसिक स्थिती सुधारली जाते. हे काम अर्थातच शारीरिक रोगांना बरं करणार्‍या वैद्यांपेक्षा अधिक अवघड नि आव्हानात्मक असते.

एकदा पू. गोंदवलेकर महाराज एका उच्चविद्याविभूषित वैद्यराजांना म्हणाले, ‘तुम्ही मंडळी जडीबुटी, निरनिराळे क्षार इ.चे गुणधर्म शोधून त्याप्रमाणे औषधं तयार करता हे चांगलंच आहे. पण रोग प्रत्यक्ष बरा करतात ते तुमच्या औषधातले मूळ घटक, तुम्ही नाही काही. तुम्ही वैद्य मंडळी औषधोपचार किंवा इलाज करून रोग्यांना बरं करता एवढंच!
अशाच अर्थाचं एक सुभाषित आहे.
कषायैः उपवासैश्‍च कृतासुल्लाघतां नृणाम् |
निज औषधकृतां वैद्यो निवेष हरते धनम् ॥
रोगी रोगातून बरे होतात ते काढे, पथ्य, उपवास यामुळे. पण वैद्याला वाटतं आपल्यामुळे हे रोगमुक्त झालेयत. असं नुसतं वाटत नाही तर ते या रोगमुक्तीचं द्रव्य (पैसे) रोग्याकडून वसूल करतात.
हल्ली अनेक मोठ्या रुग्णालयांच्या भव्य वास्तूसमोर दर्शनी भागात धन्वंतरीची एक भव्य मूर्ती असते. अनेक डॉक्टरांच्या दवाखान्यातही अशा छोट्या मूर्ती वा चित्रं असतात. मुख्य डॉक्टरांचा किंवा हॉस्पिटलच्या मालकाचा जर कुणी साईबाबा, स्वामी समर्थ यांच्यासारखा गुरू असेल तर त्यांच्याही भव्य प्रतिमा असतात. त्यात गुरुदेवांच्या पायाकडे लिहिलेलं असतं ‘वुइ केअर’ (म्हणजे आम्ही रुग्णांची काळजी घेतो, सेवा शुश्रुषा करतो.) पण प्रत्यक्षात रोग्यांना बरं करतात ते गुरुदेवच! म्हणून त्यांच्या डोक्याकडे लिहिलेलं असतं ‘ही क्युअर्स’, म्हणजे हे गुरुदेव रोगमुक्त करता इथं येणार्‍या रुग्णांना!
विचार केला तर वाटतं अशी नम्र भूमिका खरोखर किती डॉक्टरांची किंवा रुग्णालयांची असेल? असो.
एरवी वैद्यांना असंही म्हटलंय-
वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर |
यमस्तु हरते प्राणान् वैद्यः प्राणान् धनानिच ॥
इथं वैद्याला ‘यमराजाचा भाऊ’ म्हणून नमस्कार केलाय. यम ङ्गक्त प्राण हरण करतो पण वैद्य मात्र प्राणाधनाचंही हरण करतात. हे अतिशयोक्त वाटेल. स्वामी विवेकानंद हलवायालाही ‘यमराज सहोदर’ म्हणत. कारण अति मिठाई सेवनामुळे अनेक रोग होतात. पण शेवटी अतिरेक हा कशाचाही वाईटच.
एक मात्र खरं- ‘आपलं आरोग्य, आपल्याच हाती’- दुसर्‍याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या आत डोकावून पाहणं हा केवळ आरोग्याचाच नव्हे तर आनंदाचाही महामंत्र आहे.