ब्रेकिंग न्यूज़

आरोग्य मंथन ॥ आरोग्याचं फळ काय? ॥

– प्रा. रमेश सप्रे

‘खळांची व्यंकटी (दुष्टांची वाकडी बुद्धी) सांडो, विश्‍व स्वधर्मसूर्ये पाहो, भूता परस्परें पडो मैत्र जीवांचे’ इ. गोष्टी शरीरमनानं आरोग्यवान असलेल्या माणसांकडूनच घडणं शक्य आहे. चांगले विचार-उच्चार-आचार या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. म्हणून आरोग्यमंथन करून आपली जीवनं आपणच घडवली पाहिजेत. धन्वंतरीला हेच अपेक्षित आहे.

ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही? – यावर अजून चर्चावादविवाद होतच असतात. ज्योतिर्विद्या किंवा फलज्योतिष असंही या ज्ञानशाखेला म्हणतात. ‘ज्योती’ म्हणजे केवळ दिव्याची ज्योत नव्हे तर आकाशातील तारे-ग्रह यांनाही ज्योती म्हणतात. त्यांचा अभ्यास करणार्‍या विज्ञानशाखेला अंतरीक्ष विज्ञान किंवा खगोलशास्त्र (ऍस्ट्रॉनॉमी) म्हणतात. त्याच्याच उपशाखांना ज्योतिर्गणित, ज्योतिर्भौतिकी (ऍस्ट्रोमॅथेमॅटिक्स, ऍस्ट्रॉफिजिक्स) असं म्हणतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे ज्याला सामान्यपणे ज्योतिष (ऍस्ट्रॉलॉजी) म्हटलं जातं. त्याला अनेकजण विज्ञान (सायन्स) मानत नाहीत.

ज्योतिषाचा आरोग्याशी काय संबंध? आरोग्य (वैद्यकशास्त्र) नि ज्योतिष दोघांनाही जीवनाशी संबंध आहे. विशेष म्हणजे वैद्यकशास्त्राच्या आयुर्वेदाच्या ग्रंथात ज्योतिषाचा वारंवार उल्लेख येतो. विशेषतः आयुर्वेद हा वेदांतापेक्षा (वेदांच्या ज्ञानापेक्षा) तसेच ज्योतिषशास्त्रापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे – हे सांगताना आयुर्वेद, अध्यात्म, ज्योतिष, व्याकरण किंवा मंत्रशास्त्र यांचा उल्लेख येतोच.
आरोग्याशी यांचा संबंध काय असं वाटणं साहजिक आहे. पण काही सूवचनांचा विचार केला तर हे आपल्याला सहज पटेल. काही सूभाषितं पाहू या….

* सद्यः फलति गांधर्वं, मासमेकं पुराणकम् |
वेदाः फलन्ति कालेषु, ज्योतिःवैद्यौ निरंतरम् ॥

कोणत्या ज्ञानाचं फळ म्हणजे परिणाम किंवा लाभ किती काळानंतर मिळतो याबद्दलचं हे मार्मिक सुभाषित आहे. याचा सरळ अर्थ असा –
गायनाचं (गांधर्वं) फळ ताबडतोब मिळतं. पुराणाचं (श्रवणाचं) फळ एका महिन्यात मिळतं. वेदाचं फळ मिळण्यासाठी दीर्घ काळ लागतो. पण ज्योतिष नि वैद्यकशास्त्र हे मात्र सदासर्वकाळ फलदायी असतात.

इथं ‘फळ’ याचा अर्थ उघडउघड प्रापंचिक लाभ हाच आहे. कोणत्याही अभ्यासाचा जीवनाच्या दृष्टीनं होणारा परिणाम महत्त्वाचा असतो. याला फळ म्हटलंय. गायन तसेच इतर कला साध्य करण्यासाठी कलाकाराला वर्षानुवर्षं रियाज – तपश्चर्या करावी लागते. पण त्यानं सादर केलेल्या गायनाचं (कोणत्याही कलेचं) रसिकांना तत्काळ फळ मिळतो. आनंद त्याचक्षणी लुटता येतो.

पुराणं किंवा इतर संतांचे ग्रंथ त्यांच्या पारायणाच्या कालावधीनंतर फळ देतात. ग्रंथात फलश्रुती सांगितलेली असते. साप्ताहिक, पाक्षिक (पंधरा दिवसांचं) किंवा मास पारायण विशिष्ट काळानंतर पारायण समाप्ती झाली की श्रवणाचं फळ देतात. अर्थात प्रत्यक्षातलं फळ मिळायला खूप काळ लागतो.

त्याचप्रमाणे वेदाध्ययनाचं फळ त्यांच्या वर्षानुवर्षं चालणार्‍या अध्ययनानंतर मिळतं. एक वेद शिकायला – आत्मसात करायला किमान बारा वर्षं (एक तप) लागतात. यावरून वेदांच्या फलदायी होण्याची कल्पना करता येईल.
पू. गोंदवलेकर महाराजांनी मुंजीनंतर गुरुजींना कुतुहलानं विचारलं, ‘गुरुजी, वेद शिकायला किती वेळ लागेल?’ त्यावर कौतुकानं गुरुजी उद्गारले, ‘एका वेदावर प्रभुत्व मिळवायला किमान बारा वर्षं लागतात.’ हे ऐकून श्रीमहाराज म्हणाले, ‘राहू दे. एवढा वेळ आहे कोणाला?’ – द्विवेदी – त्रिवेदी – चतुर्वेदी विद्वान मंडळी आयुष्यभर वेदांचं अध्ययन करतच असतात. तरीही त्यांना शब्दार्थ – मथितार्थ – गूढार्थ असा शाब्दिक परिचयच होतो. तुकोबांसारखे संत मात्र प्रत्यक्ष अनुभवानं ठासून सांगतात –

वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा |
येरांनी वहावा भार माथा ॥

असो. एकूण काय वेदांचं फळ दीर्घ कालावधीनंतर मिळतं. अशा अभ्यासाबद्दल गंमतीनं म्हटलं जातं – दात असतात, तेव्हा चणे मिळत नाहीत; अन् चणे मिळतात तेव्हा तोंडात दात नसतात. किंवा डोक्यावर दाट केस असतात, तेव्हा फणी (कंगवा) मिळत नाही आणि फणी मिळते तेव्हा डोक्यावर केस उरलेले नसतात. तरुणपणी वेदाध्ययन अर्धवट असतं. जेव्हा ते पूर्ण होतं तेव्हा जीवनात उमेद-उत्साह उरलेला नसतो. असा प्रकार थोड्याफार प्रमाणात सर्व शास्त्रांच्या अभ्यासाबद्दल आहे.
पण ज्योतिष नि वैद्यकशास्त्र मात्र सर्वकाळ, नित्यफलदायी असतात.

ज्योतिषाला फलज्योतिष असं म्हणतात. आपल्या कर्मांची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. कदाचित कर्मानुसार त्याचं फळ वेगवेगळ्या वेळी मिळेल. पण ते कर्माला चिकटलेलं असतं म्हणजे कर्म करत असताना फळाची तयारीही होत असते. कर्माला बीज म्हणतात नि त्याच्या परिणामाला फळ म्हणतात. कर्म करून फळ टाकताच येत नाही. ते ज्याचे त्याला स्वीकारावंच लागतं. नि फळ भोगल्याशिवाय केलेलं कर्म नष्ट होत नाही. म्हणून कर्माचं फळ हे अटळ असतं. कोणतंही कर्म हे नित्यफलदायी असतं. म्हणून म्हटलंय – ज्योतिः वैद्यो निरंतरम्‌|
ज्योतिषाप्रमाणेच वैद्यकशास्त्राचं फळही नित्यनिरंतर मिळत राहतं. औषध घेतलं की परिणाम सुरू होतो. कोणतीही उपचारपद्धती असली तरी तिचं योग्य-अयोग्य, हितकारी – अहितकारी फळ मिळतंच. योगासनं, विविध व्यायामप्रकार हेही आरोग्यविज्ञानाचा भाग मानले जातात. आजकाल औषधं नि ध्यान (मेडिकेशन अँड मेडिटेशन) दोन्हींची गरज आहे. म्हणून आरोग्यशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र जीवनाच्या (जगण्याच्या) दृष्टीनं सर्वश्रेष्ठ आहेत. याचं महत्त्व हळुहळू अधिकाधिक व्यक्तींना पटू लागलंय, त्यानुसार त्यांच्या जीवनपद्धतीत परिवर्तन होतंय ही आनंदाची गोष्ट आहे.

* अन्यानि शास्त्राणि विनोदमात्रं प्राप्तेषु वा तेषु नश्च तै किंचित् |
चिकित्सितज्यौतिषमंत्रवादाः पदे पदे प्रत्ययमावहन्ति ॥

इतर शास्त्रांच्या अध्ययनातून मनोरंजन मात्र (विनोद मात्रं) होतं. म्हणून त्यांचं अध्ययन केलं काय किंवा न केलं काय जीवनाच्या दृष्टीनं विशेष फरक पडत नाही. पण वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र नि मंत्रशास्त्र यांचा अभ्यास केला तर त्याचा प्रत्यय वा फळ वा आनंद पावलोपावली (नि त्वरित) मिळतो. याचा जीवनात मोठा लाभ मिळतो. जीवन समृद्ध होण्यास मदत होते.

या सुवचनात पुन्हा वैद्यक-ज्योतिष अन् मंत्रशास्त्राचा एकत्रित उल्लेख आहे. आजकाल या तिन्ही ज्ञानशाखांची खूप चलती आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात चालू आहे. वृत्तपत्रं, दूरदर्शन यांच्या माध्यमातून यांच्या माहात्म्याचा वाढता उदो उदो (जयजयकार) होतोय. यापैकी वैद्यकशास्त्राचा उल्लेख योग्यच आहे. पण आज या क्षेत्रातही अनेक अपप्रवृत्ती अनुभवाला येत आहेत.

ज्योतिषाची भविष्य सांगण्याची क्षमता व लोकांना येणारी प्रचीती याविषयी प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. आरोग्याशी ज्योतिषाची सांगड कर्मफलाच्या अंगानंच विचारात घेतली पाहिजे. कारण कोणतीही व्याधी हे आधी केलेल्या कर्माचं फळ असतं. व्याधी दुर्धर किंवा असाध्य असेल तर ज्योतिषशास्त्र, त्यांची भाकितं, कर्मकांडं, सुचवले जाणारे उपाय यातून अंधश्रद्धा वाढीस लागण्याचा संभव अधिक. विशेषतः ग्रहबाधा, त्यांची वक्री गती, साडे साती यासाठी केले जाणारे उपाय यात विज्ञान किती, शुद्ध श्रद्धा किती हे ज्याचं त्यानं विचार करून ठरवावं. पण विचार मात्र निश्चित करावा. फसवणुकीची, आत्मवंचनेची शक्यता अधिक असते.
मंत्रशास्त्राचा मात्र उपचारपद्धती म्हणून उपयोग होऊ लागलाय. अजून ही गोष्ट प्रयोगावस्थेत आहे. पण मंत्रपठण – श्रवण – चिंतन याचा मानसिक आरोग्यावर होणारा सुपरिणाम अनेकांच्या अनुभवाला येऊ लागलाय. डोळस व शोधक वृत्तीनं, फक्त चिकित्साच करत न बसता ‘मंत्रथेरपी’चा प्रयोग केला जातोय. निदान मनाचं आरोग्य, मनाच्या शक्तीत वाढ, रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती यांचा विकास मंत्र – स्तोत्र पठणातून होऊ शकतो. पण याचंही कर्मकांड होता कामा नये. यातूनच आध्यात्मिक उपासनेची पार्श्‍वभूमी तयार होते. या संदर्भात म्हटलंय ….

* एकं शास्त्रं वैद्यमध्यात्मकं वा सौख्यं चैकं यत्सुखं वा तपं वा |
वन्द्यश्चको भूपतिर्वा यतिर्वा ह्येकं कर्मं श्रेयसं वा यशो वा ॥

म्हणजे – वैद्यकशास्त्र हे सर्व शास्त्रात श्रेष्ठ आहे. वैद्यकशास्त्र व त्याच्या जोडीला आध्यात्मिक उपासना आपल्याला आरोग्य, समाधान व तपाचं फळ यांचा लाभ करून देतात. राजा किंवा साधू (यति) हे वैद्यकशास्त्र व अध्यात्म यांना मान देतात. कर्म अर्थातच श्रेयस्कर म्हणजे – कल्याणकारी किंवा मुक्तिदायक हवं. यश मिळवून देणारी, इतरांना वंदनीय वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी आरोग्य व अध्यात्म यांचा संगम आपल्या जीवनशैलीत हवा. आजकाल डॉक्टर – वैद्यसुद्धा हृदयविकार, मानसिक विकृती यांच्यावर उपचार करताना औषधांबरोबरच सद्ग्रंथाचं वाचन, सद्विचार, सत्संग, उपासना (ध्यान, नामस्मरण इ.) यांचा सल्ला देतात. ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. मानसविकार तज्ज्ञ डॉक्टर मंडळी तर ज्ञानेश्‍वरी, दासबोध, गीता, उपनिषदं इ. ग्रंथांचा पद्धतशीर अभ्यास करून आपले उपचार करू लागलेयत तसेच दूरचित्रवाणीवरील चर्चासंवाद, परिसंवाद परिषदा, ग्रंथलेखन अशा समाजमाध्यमातून वैद्यकशास्त्र विशेषतः मनोवैद्यक नि आध्यात्मिक उपासना यांचे संयुक्त उपचार सुचवू लागलेयत.

‘शरीरं आद्यं खलु धर्मसाधनम्’ म्हणताना शरीराचं तसंच मनाचंही आरोग्य राखणं हेच इतर धर्म तसेच अर्थ व काम यांची प्राप्ती करण्यासाठी आवश्यक आहे असं सुचवलंय. चार पुरुषार्थ किंवा जीवनध्येयं (गोल्स ऑफ लाइफ) आपल्या संस्कृतीत सुचवली आहेत. जीवनाला सर्वांगांनी स्पर्श करणारी ही चार ध्येयं म्हणजे धर्म-अर्थ-काम-मोक्ष. यापैकी आध्यात्मिक साधनेवर मोक्षलाभाची जबाबदारी सोपवली तरी धर्म-अर्थ-काम म्हणजे पूर्ण प्रापंचिक किंवा सांसारिक (ऐहिक) जीवन संपन्न करण्यासाठी शरीराचं आरोग्य व मनःस्वास्थ्य हवंच.
‘स्वास्थ्य’ हा आरोग्याला पर्यायवाचक असा शब्द वापरला जातो. याचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. गृहात राहणारा, प्रपंच चालवणारा ज्याप्रमाणे ‘गृहस्थ’ तसाच देहात (देहाच्या घरात) राहणारा व देहाच्या माध्यमातून जीवनाचा आनंद घेणारा ‘स्व-स्थ’ असतो. खरा स्वस्थ तोच जो तनामनाचं स्वास्थ्य उपभोगतो. हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. आरोग्य व अध्यात्म यांच्या संयुक्त प्रयोगातून अशा घटकांचं पोषण केलं जातं. नि अशी व्यक्ती आनंदाचा (जीवनानंदाचा) उपभोग घेऊ शकते. या घटकांचा विचार जीवनातील तसेच शरीरातील विविध अवस्थांची उदाहरणं देऊन आपण करणारच आहोत.
शेवटी, अनेक शास्त्रांबद्दल, ज्ञानशाखांबद्दल जे म्हटलं जातं ते वैद्यकशास्त्राबद्दलही म्हटलं जातं.

* यस्मिन् ज्ञाते सर्वमिदं ज्ञातं भवति निश्चितम् |
तस्मिन् परिश्रमः कार्यः किमन्यत् शास्त्रभाषितम् ॥

अर्थ ः आयुर्वेदाचं ज्ञान मिळवल्यावर इतर शास्त्रांचं अध्ययन केलं नाही तरी चालतं. म्हणून वैद्यकशास्त्राचा अभ्यास करावा. इतर शास्त्र जीवनाच्या दृष्टीनं विशेष उपयोगाची नाहीत. योगशास्त्र, व्यायामशास्त्र, आहारशास्त्र, विहारशास्त्र (हो, विहाराचं म्हणजे फिरणं, भ्रमण करणं यांचंसुद्धा शास्त्र आहे), तसेच त्यांचे तंत्र नि मंत्र सांगणारे ग्रंथ अलीकडे लिहिले जाऊ लागलेयत.

चालणं, फिरायला जाणं हा सहजसोपा सर्वांगसुंदर व्यायामाचा प्रकार आहे. सकाळी-संध्याकाळी असंख्य लोक सर्वत्र फिरताना आढळून येतात. त्यांच्यासाठी सार्वजनिक उद्यानात खास चालण्यासाठी मार्ग (जॉगिंग ट्रॅक्स) बनवलेले असतात. चालताना शरीराची विशिष्ट अवस्था, दृष्टी, हाता-पायांची हालचाल, एवढंच काय पण योग्य अशी पादत्राणं यांचाही अभ्यास होऊ लागलाय. अवतीभवतीचं वातावरण कसं असावं, फिरताना मानसिक स्थिती किंवा मनोवृत्ती कशी ठेवावी याचा विचार होऊ लागलाय.
या सार्‍याचा आरोग्याशी – वैद्यकशास्त्राशी संबंध आहे.

ज्ञानदेवांच्या पसायदानातील मागण्याचे अनेक पैलू आरोग्याशी संबंधित आहेत. ‘खळांची व्यंकटी (दुष्टांची वाकडी बुद्धी) सांडो, विश्‍व स्वधर्मसूर्ये पाहो, भूता परस्परें पडो मैत्र जीवांचे’ इ. गोष्टी शरीरमनानं आरोग्यवान असलेल्या माणसांकडूनच घडणं शक्य आहे. चांगले विचार-उच्चार-आचार या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. म्हणून आरोग्यमंथन करून आपली जीवनं आपणच घडवली पाहिजेत. धन्वंतरीला हेच अपेक्षित आहे.