ब्रेकिंग न्यूज़

आरोग्य मंथन बुद्धी आणि दृष्टी

  •  प्रा. रमेश सप्रे

डोळ्यांवर घडणार्‍या संस्कारातून नि बुद्धीनं केलेल्या चिंतनातूनच दृष्टी निर्माण होते. जनावरांना, पक्षांना जी सृष्टी किंवा निसर्गसौंदर्य दिसतं तेच मानवाला दिसतं. पण इतर प्राण्यांना फक्त ‘दिसतं’ मानव मात्र त्याच्या चिंतनातून त्याचा रसास्वाद घेऊ शकतो.

 

एक फार सोपं पण अर्थपूर्ण वाक्य आहे.
डोळ्यांचे डॉक्टर आपली ‘नजर (साइट)’ सुधारतात पण संतसद्गुरू आपला ‘नजरिया (व्हिजन)’ सुधारतात.
दृष्टी शब्द जरी वापरला तरी डॉक्टर दृष्टी सुधारतात तर संत दृष्टिकोनात परिवर्तन करतात. वाल्याचा वाल्मीकी, सैतानाचा साधू हे याचं उत्तम उदाहरण आहे. जीवनात दृष्टीला महत्त्व आहेच. पण ज्यावेळी ‘दृष्टी तशी सृष्टी’ असं म्हटलं जातं त्यावेळी केवळ डोळ्यांपेक्षा पाहून विचार करणं, विचार करून निर्णय घेणं, योग्यायोग्य विचार करणं या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात.

अर्जुनाला गीतेत भगवान (श्रीकृष्ण) अनेकदा म्हणतात ‘पश्य … पश्य .. पश्य..’ दोन महत्त्वाचे संदर्भ पाहू या. अगदी आरंभी ज्यावेळी युद्धोत्सुक अर्जुन कृष्णाला (सारथ्याला) सांगतो- ‘दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. माझ्याशी लढण्यासाठी (खरं तर लढून मरण्यासाठी) शत्रुपक्षात कोणकोण शूरवीर आलेले आहेत ते एकदा पाहून घेतो (निरीक्षेऽहं). नंतर म्हणतो दुर्योधनाचं युद्धात प्रिय करण्यासाठी जे योद्धे आले आहेत त्यांना नीट बघतो (अवेक्षेऽहं). यावर भगवान (श्रीकृष्ण) दोन्ही सेनांच्या मध्ये भीष्म- द्रोण- कृप आदी आचार्यांसमोर रथ उभा करून अर्जुनाला सांगतात… ‘दोन्ही सैन्यात (एकमेकाविरुद्ध लढण्यासाठी, मरण्यासाठी) समोरासमोर आलेल्या सर्व कुरुवंशातील वीरांना नीट (विचारपूर्वक) पाहून घे. (पश्य एतान् समवेतान् कुरुन्)’. भगवंताच्या या वाक्याबरोबर अर्जुनाची ‘दृष्टी’ बदलली. ज्यावेळी तो स्वतः पाहत होता त्या ‘शत्रुजनां’च्या ठिकाणी त्याला भगवंतानं विचारपूर्वक पाहायला सांगितल्यावर सारे ‘स्वजन’ दिसू लागले. नि त्याची अवस्था गोंधळल्यासारखी झाली. युद्ध करू नये अशा मतापर्यंत तो पोचला. इतका की धनुष्यबाण घेऊन युद्धासाठी सज्ज असलेला उभा अर्जुन धनुष्य-बाण फेकून देतो नि रथात मटकन् बसून राहतो.
भगवंतांनी अर्जुनाचा दृष्टिकोन बदलला. नंतर गीता सांगून, योग्य ते समुपदेशन करून योग्य दृष्टी देऊन त्याला युद्धसज्ज करून युद्ध जिंकूनही घेतलं.

असा हा दृष्टिमहिमा. यात बुद्धीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. रथाला जुंपलेल्या इंद्रियांच्या घोड्यांचे लगाम म्हणजे मन हे बुद्धी या सारथ्याच्या हातात असतात. ही बुद्धी एका बाजूनं मन- इंद्रियांवर नियंत्रण ठेवत असते तर दुसर्‍या बाजूनं रथीला म्हणजे रथाच्या मालकाला (इथं कृष्ण सारथी अर्जुन रथीला) मार्गदर्शन करते. म्हणून इंद्रियांच्या ज्या नानाविध शक्ती आहेत त्यांचं कार्य बुद्धीमुळेच- बुद्धीच्या नियंत्रणाखाली, बुद्धीनं दिलेल्या आदेशांनुसारच चालतं. म्हणून बुद्धीच सर्वांत महत्त्वाची आहे नि विकसित बुद्धी हे मानवाला निसर्गाकडून मिळालेलं दिव्य वरदान आहे. असो.
गीतेत अनेक ठिकाणी सखा अर्जुनाला भगवंतांनी विचार करत पहा नि पाहून विचार कर असं सांगून (पश्य) महत्त्वाचा सल्ला दिलाय. त्यातला योग्य दृष्टी, खरं तर ‘दिव्य दृष्टी’ देणारा प्रसंग म्हणजे ‘विश्‍वरूपदर्शन’. याप्रसंगी अर्जुनानं, तुझं ईश्‍वरी रूप (रूपमैश्‍वरं) बघण्याची इच्छा व्यक्त केल्याबरोबर विश्‍वरूपाचे एकेक पैलू दाखवणं भगवंतानं सुरू केलं अन् प्रत्येक वेळी पश्य – पश्य – पश्य – पश्य असं पुनःपुन्हा सांगू लागल्यावर अर्जुन म्हणतो, ‘मला काहीही दिसत नाही. असं का?’ यावर भगवंत म्हणतात- ‘दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्‍वरम्‌| (गीता११/८)’ याचा अर्थ देहाच्या डोळ्यांनी (चर्मचक्षूंनी) विश्‍वरूपदर्शन घडत नाही त्यासाठी हवी दिव्य दृष्टी (दिव्यं चक्षुः). अशा दृष्टीमुळे बाहेरचं रूप तर दिसतंच पण चिंतनामुळे आतलं स्वरूपही कळतं. मगच जीवनात टिकाऊ परिवर्तन – वाल्या कोळ्याचे वाल्मीकी ऋषी) घडतं. हे काम गुरुशिवाय कोणीही करू शकत नाही. अशी किमया फक्त सद्गुरूच घडवू शकतात.

बुद्धी आणि दृष्टी ज्यावेळी म्हटलं जातं त्याचवेळी बुद्धी आणि श्रुती (ऐकणं) बुद्धी आणि रूची, बुद्धी आणि गंधज्ञान, स्पर्शज्ञान असंही म्हणावं लागतं. कारण तीन परिस्थितीत ही इंद्रियं मानवी देहाला असतात पण ती योग्य कार्य करू शकत नाहीत-

* गाढ झोपेत, बेशुद्ध अवस्थेत, गुंगी दिलेल्या परिस्थितीत डोळे असूनही पाहू शकत नाहीत, कान असूनही ऐकू शकत नाहीत. इ. इ.

* प्रेताला सर्व इंद्रियं असतात पण प्राण (चेतना) गेल्यामुळे असून नसल्यासारखी निष्प्रभ बनलेली असतात. निष्प्राण, अचेतन झालेली असतात.

* आणखी एक तिसरी अवस्था आहे जिचा आपल्यापैकी प्रत्येकाला अनुभव आलेला असतो. एखाद्या खोल, गंभीर विचारात जर मनबुद्धी गढून गेली असेल, एखाद्या तीव्र भावनेच्या आवेगामुळेही इंद्रियं असूनही नसल्यासारखी बनून जातात. जेवताना जर वाईट बातमी कळली तर अन्नातली रूची निघून जाते, अन्न बेचव लागतं किंवा अगदी गाढ (निर्विकल्प) समाधी अवस्थेत सारी इंद्रियं काम करू शकत नाहीत कारण बुद्धी समाधी अवस्थेत (बाहेरच्या परिस्थितीची जाणीव नसलेल्या स्थितीत) देहभावाच्या पलीकडे गेलेली असते. अनेकदा संत तुकाराम, रामकृष्ण परमहंस अशा विदेही अवस्थेत असायचे.
हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्यानं जरा विस्तारानं पाहिला.
या संदर्भात अनेक अर्थपूर्ण आरोग्य- सुभाषितं आहेत-

* किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकम्
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्या हि मे॥
चक्षुःस्तस्य निमीलनादि समये किं धीर्धियो दर्शने
किं तत्राहमतो भवान् परमकं ज्योतिस्तदस्मिप्रभो॥
आद्य शंकराचार्य काही महत्त्वाचे प्रश्‍न या सुवचनात विचारताहेत. प्रश्‍नांची उत्तरं चिंतनासाठी अत्यंत उपयोगी आहेत.

* तुम्ही कोणत्या ज्योतीने (म्हणजे तेजाने किंवा प्रकाशाने) जग पाहू शकता?

* दिवसा तुम्ही (म्हणजे आपण सर्व) सूर्यप्रकाशात जग पाहता आणि रात्री दिव्यांच्या प्रकाशात पाहता. * पण सूर्य किंवा दिवा पाहणारे तेज कोणते आहे?
ते तेज तुमच्या डोळ्यांचेच आहे. * डोळे मिटून घेतल्यावर कोणते तेज दिसू शकेल?

* बुद्धीला तेज कोठून मिळते? बुद्धीला पाहणारी ज्योती (आत्मज्योत) कोणती असते?
हे प्रश्‍न वरवर सोपे वाटले आणि आपणा सर्वांच्या अनुभवाचे असले तरी त्यांच्यावर केलेलं चिंतन बाहेरच्या जगापेक्षा आत नेणारं आहे.
एकदा समर्थ रामदास एका गुहेत ध्यान- चिंतन करत बसले असताना एक मोठा दगड गडगडत आला आणि गुहेच्या तोंडावर झाकणासारखा बसला. आधीच कमी प्रकाश असलेल्या गुहेत त्यामुळे अंधारच झाला. याप्रसंगी समर्थांच्या मनात पहिला प्रश्‍न हा दगड जर आपल्याला हलवता आला नाही तर आपण बाहेर कसं पडणार असा आला नाही; तर या अंधारात आपल्याला दिसणार कसं हा आला?
त्यांनी विचार करायला सुरवात केली तेव्हा त्यांना बुद्धीच्या प्रकाशात असंच उत्तर मिळालं. – चंद्रापेक्षा सूर्य तेजस्वी, या हिर्‍यापेक्षा त्या हिर्‍याचं तेज अधिक हे ठरवणारे माणसाचे डोळे सर्वांत तेजस्वी असले पाहिजेत. पण प्रत्यक्षात हे ठरवण्याचं कार्य बुद्धीच करते. कारण डोळ्यांची रचना सर्वांची समानच असते. पण पाहण्याची क्षमता, परखण्याची शक्ती, बुद्धीचा विकास मात्र वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्यक्षात डोळे- कान- नाक- जीभ- त्वचा ही इंद्रियं स्वतः ज्ञान मिळवू शकत नाहीत नि – करूनही देऊ शकत नाहीत. हे काम बुद्धी करते त्यासाठी आपल्या मेंदूत या विविध अनुभवांची केंद्रं असतात. खरं शिक्षण या केंद्रातून होतं.
उदा. आधी मसाल्याच्या पदार्थांचा परिचय करून दिला तर डोळे बंद करून स्पर्श- गंध- रुची यांच्या द्वारे लवंगा, मिरे, जायफळ, वेलची, केशर इ. ओळखता येतात. तसेच जाई- जुई- मोगरा- प्राजक्त- गुलाब इ. फुलांनाही अचूक ओळखता येतं. कांदा, लसूण, तेल-तूप यासारख्या वस्तूही जाणता येतात. शिशुवर्गातील अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या शिक्षण- प्रशिक्षणाचा समावेश असतो. डोळ्यांनी रंग पाहता येतात पण लाल- हिरवा- पिवळा- निळा हे रंग ओळखता येतात ते बुद्धीमुळेच.
आपण जे रोज असंख्य अनुभव घेतो त्यातील सर्वांत जास्त अनुभव कान नि डोळे यांच्या माध्यमातून घेतलेले दृक्‌श्राव्य असतात. सु.९० टक्क्याहून अधिक अनुभव कान- डोळे (ऑडियो-व्हिज्युअल) यातून मिळवलेले असतात. म्हणून या इंद्रियांना सर्वात महत्त्वाची इंद्रियं मानली जातात. त्यातही अधिक प्रभावी असतात डोळे.

* चक्षुः प्रधानं सर्वेषामिन्द्रियाणाम् विदुर्बुधाः|
घननीहारयुक्तानां ज्योतिषामिव भास्करः ॥
– ज्याप्रमाणे आकाशातील तारेतारकाग्रह यांच्यामध्ये सर्वांत तेजोमय सूर्य त्याप्रमाणे शरीराच्या सर्व इंद्रियांमध्ये डोळे श्रेष्ठ असे बुद्धिमान लोक मानतात. इथं एक लक्षात ठेवायला हवं की डोळ्यांवर घडणार्‍या संस्कारातून नि बुद्धीनं केलेल्या चिंतनातूनच दृष्टी निर्माण होते. जनावरांना, पक्षांना जी सृष्टी किंवा निसर्गसौंदर्य दिसतं तेच मानवाला दिसतं. पण इतर प्राण्यांना फक्त ‘दिसतं’ मानव मात्र त्याच्या चिंतनातून त्याचा रसास्वाद घेऊ शकतो.
डोळ्यांचं आधुनिक काळात आणखी एक महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे वाचनाचं. तसं तर ब्रेल लिपीच्या साह्यानं अंध माणसंही वाचू शकतात. पण वाचन म्हणजे अक्षरं, शब्द, वाक्य वाचणं नव्हे. तर वाचन म्हणजे अक्षरांच्या (लिपीच्या) साहाय्यानं विचार करणं, अर्थाचं आकलन करून घेणं. (रीडिंग इज् थिंकिंग अंडर द स्टिम्युलस ऑफ प्रिंट.)
वाचताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन एका सुभाषितात आहे.

* न अधीयात् अश्‍वमारूढो न वृक्षं न च हस्तिन्‌|
न नावं न खरं न ऊंष्ट्रं नेरिणस्थो न यानगः॥
म्हणजे घोडा, वृक्ष, हत्ती, होडी, गाढव, उंट अशा प्रकारच्या वाहनातून प्रवास करताना वाचू नये. उंचसखल भूमीवरच्या प्रवासातही वाचन टाळावं. कारण ही वाहनं सतत हालत असतात. वर-खाली होत असतात त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याला हानी पोचते. वाचन नीट होत नाहीच पण डोळे मात्र खराब होतात. पण एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे ती श्रवण- वाचन यावर मनन- चिंतन केल्याशिवाय योग्य दृष्टी प्राप्त होणार नाही.

* चक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैः यत्नः कर्तव्योजीविते यावदिच्छा|
व्यर्थो लोकोऽयं तुल्यरात्रिं दिवानां पुंसां अंधानां विद्यमानेऽपि वित्ते॥
जोपर्यंत जिवंत राहण्याची इच्छा आहे तोपर्यंत माणसानं डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण धनसंपत्ती विपुल असूनही अंध व्यक्तीला रात्र- दिवस समानच वाटतात. तसं सारं असूनही सारं जीवन व्यर्थ असल्याचा अनुभव येतो. यासाठी सुधारायला हवी दृष्टी, त्यातून बदलेल वृत्ती नि मग पालटेल कृती! कृती- प्रकृती- विकृती- संस्कृती हे सारं दृष्टीवर अवलंबून असतं. बुद्धीवर अवलंबून असतं. सकारात्मक जीवनशैली, त्याग- सेवेवर आधारलेली यज्ञ- जीवनपद्धती ही सारी जीवनदृष्टीच नाही का? धृतराष्ट्राला ‘दृष्टी’च नाही हे म्हणणं कितपत् योग्य आहे. बघा विचार करून.