आयुष इस्पितळाच्या जागेतील माती रस्त्यासाठी

आयुष इस्पितळाच्या जागेतील माती रस्त्यासाठी

>> मंत्र्यांनी दखल घेत इस्पितळाचे काम सुरू करण्याची मागणी

केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी धारगळ येथील वादग्रस्त क्रीडा नगरीतील ३ लाख चौरस मीटर जागेत आयुर्वेदतर्ङ्गे पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपये खर्च करून आयुष इस्पितळ बांधण्याची योजना आखली व त्याचा शुभारंभ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आला. मात्र ङ्गलक लावण्यापलीकडे आजपर्यंत कोणतीच प्रगती या इस्पितळाबाबत झालेली दिसून येत नाही. परंतु याच जागेतील माती मात्र मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वापरली जात आहे. मात्र सरकारी जागेतील डोंगर कापले जातात आणि माती नेली जाते. तरीही महसूल विभाग गप्प आहे. सरकारने आणि केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी आता या इस्पितळासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विर्नोडाचे माजी सरपंच वकील सीताराम परब, नगरसेवक दीपक मांद्रेकर यांनी केली आहे.

प्रकरण न्यायालयात
२००८ साली बाबू आजगावकर हे क्रीडामंत्री असताना क्रीडा नगरी उभारण्यासाठी शेतकर्‍यांच्या जमीन संपादित करण्यासाठी विरोध असतानाही सुरुवातीला ११ लाख चौरस मीटर जागा संपादित केली. मात्र त्यांना त्याठिकाणी आजपर्यंत क्रीडानगरी उभारणे शक्य झाले नाही. शेतकर्‍यांच्या शेती बागायत जमिनीत क्रीडा नगरी उभारण्यास जमीन मालकांचा विरोध आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे. त्यामुळे या जमिनीविषयी अद्याप निवाडा लागलेला नाही. आता तर क्रीडामंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी क्रीडानगरी उभारण्याचा नाद सोडून दिला आहे.
मात्र आता या जागेतील ३ लाख चौरस मीटर जागा आयुर्वेदिक आयुष इस्पितळ उभारण्यासाठी केंद्र सरकारला जागा दिली आहे. २ लाखपेक्षा अधिक जागेत रवींद्र भवन उभारण्याचा प्रस्ताव आहे तर उर्वरित जागेत आंतराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्यात येईल असे उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी जाहीर केले आहे.
मात्र अद्याप यापेकी एकाही प्रकल्पाचा पत्ता नसल्यामुळे या सरकारी जागेत चिरे, खोदकाम करणे व माती नेण्याचे काम चालू आहे. याकडे पेडणेचे मामलेदार किंवा उपजिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे.

इस्पितळाचे काम सुरू करण्याची मागणी
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना पेडणे तालुक्यातून मोठी आघाडी पाचव्यांदा मिळवून त्यांना विजयी केले आहे. श्रीपाद नाईक यांनी इस्पितळाच्या कामाचा शुभारंभ करून सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र आजपर्यंत इस्पितळाचे काम सुरू झाले नाही. काम सुरू होत नसल्यानेच सरकारी जमातीतील माती चोरून नेली जात आहे. त्यामुळे आता मंत्री नाईक यांनी या इस्पितळाच्या कामाकडे पुन्हा लक्ष द्यावे अशी मागणी सीताराम परब यांनी केली आहे.
याबाबत श्री. परब म्हणाले की, सरकारी जागेत अतिक्रमण करणे गुन्हा आहे. महसूल विभाग जे जे संभाळते त्या विभागांनी आपली जागा सांभाळायला हवी होती. मात्र तेच आज दुर्लक्ष करीत असल्यामुळे सरकारी जागेतील डोंगर पोखरून माती, चिरे नेण्याचे काम सुरू आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर, मामलेदार राजेश आजगावकर यांनी लक्ष द्यायला हवे असे ते म्हणाले.

सरकारी डोंगर पोखरणी
क्रीडा नगरी आणि आयुष इस्पितळाच्या जागेत सध्या चिरे, लोंबर बेकायदा काढणे शिवाय राष्ट्रीय महामार्ग १७ साठी रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी माती या सरकारी जागेतून पोखरून नेली जाते, याकडेही सरकारचे दुर्लक्ष होत आहे. आयुष इस्पितळाच्या जागेत सध्या बेकायदा खोदकाम करून मोठ्या प्रमाणात माती नेली जात असल्याने इस्पितळ परिसरात मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या बेकायदा डोंगर कापणीकडे नगर नियोजन विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे आता मंत्री श्रीपाद नाईक तसेच उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी त्वरित हे प्रश्‍न हातात घेऊन आयुष इस्पितळाचे काम तसेच क्राडी नगरी व रवींद्र भवनाचे काम सुरू करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.