ब्रेकिंग न्यूज़
आयुष्याचा ‘सेतू’ अधांतरीच!

आयुष्याचा ‘सेतू’ अधांतरीच!

———————————————————————————-
खोतीगाव पंचायत क्षेत्रात अनेक समस्या : लोक जगताहेत हलाखीचे जीवन
————————————————————————————————
काणकोण (न. प्र.)
गोवा मुक्त होऊ अर्धे शतक उलटले. मात्र खोतीगाव पंचायत क्षेत्रातील कित्येक वाड्यांना आजही रस्ता, पूल नसल्यामुळे अन्य भागाशी संपर्क तुटलेला आहे. त्यातच अभयारण्याच्या जाचक नियमांमुळे मूळ भूमीपूत्र आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे दिसत आहे. या पंचायतीची स्थापना १९६९ साली म. गांधीजीच्या जन्मशताब्दीच्या काळात झाली. जयंती ग्राम म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गावाचा अर्धा भाग यापूर्वी पैंगीण पंचायत तर अर्धा भाग गावडोंगरी पंचायतीमध्ये मोडत होता. ज्यावेळी स्वतंत्र पंचायतीची स्थापना झाली त्यावेळी या गावाला गावचा सरपंच भेटला. जवळ जवळ ९० टक्के इतका भाग जंगलानी व्यापल्यामुळे शिक्षण, व्यापार आणि अन्य सुविधांपासून हा भाग वंचित राहिला. शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेल्या या भागात मागच्या वीस पंचवीस वर्षात काही ठिकाणी रस्ते झाले. शाळा सुरू झाल्या. माध्यमिक शाळा आली, वाचनालय आले, दाभेलचा पूल झाला, परंतू अजूनही नडके, आवळी, पणसुलेमळ, भूतपाल हे भाग विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.
आवळी वाड्यावर जायला रस्ता नाही
या पंचायतीच्या आवळी वाड्यावरील मुले पिशेमठ येथील सरकारी माध्यमिक शाळेत चालत येतात. कदंब बस वाड्यावर जात नाही. वाड्यावर ३० ते ४० घरे आहेत. बदलत्या परिस्थितीचा लाभ घेत वाड्यावरील युवकांनी दुचाक्या, चार चाकी वाहने घेतलेली आहेत. परंतु वाड्यापर्यंत जायला रस्ता नसल्यामुळे वाहने अर्ध्यावर ज्या ठिकाणी रस्ता संपतो त्या ठिकाणी ठेवावी लागतात.
वाचनालयाकडे दुर्लक्ष
गावातील लोकांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी कला आणि संस्कृती खात्याने याठिकाणी वाचनालय सुरु केले आहे. अपुरी जागा आणि असुविधांमुळे वर्तमानपत्रे आणि पुस्तके ठेवायलाही जागा पुरत नाही. त्यामुळे इच्छा असूनही वाचक वाचनालयाकडे पाठ फिरवितात, अशा या भागातील लोकांच्या तक्रारी आहेत.
पिण्याच्या पाण्याची समस्या
या भागातील लोकांवर अजूनही झर्‍याचे पाणी करवंटीने भरून उदरनिर्वाह करावा लागतो. उन्हाळ्यात टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा होत असतो. परंतू आठवड्यातील बरेच दिवस पाण्यासाठी या लोकांना वणवण फिरावे लागते. धार्मिक गोष्टींना चिकटून असलेल्या या भागातील लोकांना चोवीस तास पाणी मिळावे यासाठी अजूनही शासकीय स्तरावरुन प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.
भूतपालला जायला रस्ताच नाही
या पंचायतीमधील भूतपाल वाड्यावर जायला रस्ता नाही. या भागातून तळपण नदी वाहत असून प्राथमिक शिक्षणासाठी मुले पणसुलेमळ येथे तर माध्यमिक शिक्षणासाठी पिशेमठ येथे जात असतात. अष्टगाळ ते भूतपाल हा जवळचा भाग आहे. परंतु रस्त्याची सोय नसल्यामुळे अवें ते पणसुलेमळ हा लांबचा पल्ला लोकांना गाठावा लागतो. अवें ते पणसुले रस्ता व्हावा म्हणून माजी सरपंच महादेव गावकर यानी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यांना अद्याप यश मिळत नाही. भूतपाल येथे सध्या वास्तव्य करणारे बहुतेक लोक हे इंद्रावाडा गावडोंगरी येथील असून त्यांनी आपल्या बरोबर आपल्या घरवईना या ठिकाणी आणले. आजच्या घडीला या वाड्यावर जल्मी, पायक देव आणि भागेल पायक देव अशी तीन देवस्थानेआहेत. आमोणे मार्गे भूतपालला जाता येते. परंतु अभयारण्याच्या निर्बधामुळे रस्त्याचे डांबरीकरण होत नाही. जलस्रोत खात्याने या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा योजनेखाली बंधारा बांधलेला आहे. पावसाळ्यात या बंधार्‍यावरील फळी काढली जाते. परंतु गावच्या लोकांनी लाकडी काठ्यांचा वापर करुन या बंधार्‍यावर साकव तयार केला आहे. दर पावसाळ्यात गावचे लोक स्वखर्चाने हा साकव उभारतात. खोतीगाव पंचायत थोडी आर्थिक मदत करीत असते. परंतु ती अपुरी पडत असल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली. वाड्यावरील ग्रामस्थ आपल्या जनावरांना रानात चराईसाठी सोडायचे. कुमेरी करायचे. परंतू या सर्व गोष्टीवर मूळ आदिवासींवर वनखात्याचे निर्बंध घातले आहेत. अष्टगाळ येथे वनखात्याचे गेट बसवून या लोकांची अडवणूक केली आहे. त्यांना विचारणारा कोणीच नाही. वनखात्याचे कर्मचारी अरेरावी करतात. कुमेरीला अडवणूक करतात. असे प्रकार या ठिकाणी दरवर्षी घडत आहेत. मुक्तीनंतर याभागातील लोकांचे हाल कमी होणार अशी अपेक्षा होती. परंतू त्यात दिवसेदिवस वाढ होत असल्याची कैफियत या लोकांनी मांडली. दर वर्षी निवडणुकीच्या वेळ नवनवीन आमिषे दाखविली जातात. पदरी मात्र काहीच पडत नसल्याची खंत या लोकांनी व्यक्त केली.