ब्रेकिंग न्यूज़

आयारामांची आयात

आपले आमदार फोडण्यासाठी भाजपाने पॅकेज तयार ठेवल्याचा कॉंग्रेसचा दावा, कॉंग्रेसचे दहा आमदार भाजपास येण्यास उत्सुक असल्याचा भाजपचा प्रतिदावा हा सगळाच प्रकार उबगवाणा आहे. विकाऊ वृत्तीचे हे जे प्रदर्शन संबंधितांनी मांडले आहे, ते अतिशय लाजीरवाणे आणि गोमंतकीय मतदारांची मान शरमेने खाली घालायला लावणारे आहे. विरोधी पक्षात गेली सात वर्षे बसूनही सत्ता दृष्टिपथात नसल्याने घायकुतीला आलेले कॉंग्रेसचे आमदार आणि एकेका आयारामाला आपल्याकडे घेताना नैतिक तत्त्वांना तिलांजली देत चाललेले भाजप नेते यांनी मांडलेल्या या सार्‍या खेळाकडे हताशपणे पाहण्याखेरीज मतदारांच्या हाती तूर्त तरी काही नाही. आमदारकीच्या खरेदी – विक्रीचे हे जे काही संकेत दिले जात आहेत, ती निलाजरेपणाची हद्द आहे. तत्त्वे, विचारधारा, पक्षनिष्ठा, समर्पणभाव याला काडीचीही किंमत आजच्या या राजकारणामध्ये राहिलेली नाही असाच संदेश या सार्‍यातून जनतेमध्ये जातो आहे. प्राधान्य आहे ते केवळ सत्तेला. सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी काहीही करायची, कोणत्याही थराला जायची सगळ्यांचीच तयारी दिसते आहे. पन्नास वर्षांपूर्वी हरयाणातले हसनपूरचे आमदार गयालाल कॉंग्रेसमधून रातोरात जनता पक्षात गेले, दुसर्‍या दिवशी पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले आणि काही तासांत पुन्हा पक्ष सोडून गेले आणि निर्लज्ज पक्षांतरांची एक परंपरा भारतीय राजकारणात रुजवून गेले. गयालाल कॉंग्रेसमध्ये परतले तेव्हा त्यांना उद्देशून प्रदेशाध्यक्षांनी ‘गयाराम अब आयाराम’ असे उद्गार काढले होते. तेव्हापासून अशा ये – जा करणार्‍यांना ‘आयाराम – गयाराम’ असे नाव पडले आहे. गोव्यात अशा आयाराम – गयारामांची कमी कधीच नव्हती. पक्ष, तत्त्व, विचारधारा कशाकशाचेही सोयरसुतक येथील राजकारण्यांना दिसत नाही. जो तो फक्त संधीसाठी टपलेला आहे आणि ही गोव्याच्या राजकारणाची शोकांतिका आहे. कॉंग्रेसचा हा आमदार भाजपात जाणार, तो जाणार अशा बातम्या गेले कित्येक महिने येत आहेत. त्या सगळ्याच बिनबुडाच्या आहेत असेही दिसत नाही, कारण कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांनी तर आपण पक्षांतर करावे का, याबाबत आपल्या कार्यकर्त्यांचेही मत आजमावले. सांत आंद्रेच्या कॉंग्रेस आमदारांना भाजपात घेण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांना धारेवर धरले. मांद्रे आणि शिरोड्याच्या पोटनिवडणुकांत दोघे आयाराम निवडून आल्याने सत्तेच्या उबेअभावी गारठलेल्या विरोधी पक्षातल्या पक्ष्यांना पंख फुटलेले असू शकतात. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तर आपल्या पक्षाच्या आमदारांवरच स्वतःचा विश्वास उरलेला नाही याची जाहीर कबुली अत्यंत हतबलपणे देऊन टाकली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस पक्षापाशी आज ना कर्तृत्व, ना नेतृत्व. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा असा काही धसका घेतला की काहीही झाले तरी पक्षाध्यक्षपद पुन्हा स्वीकारायला ते अजूनही तयार नाहीत. पक्षश्रेष्ठींची ही गलितगात्र स्थिती पाहून आपल्याला आता या पक्षात भवितव्य नाही असे कॉंग्रेसच्या राज्याराज्यातील आमदारांना वाटू लागले तर नवल नाही! तेलंगणातील कॉंग्रेसचे अठरातले बारा आमदार तेलंगणा राष्ट्र समितीला जाऊन मिळाले. अशा परिस्थितीत गोव्यातील कॉंग्रेस आमदारांचा धीर सुटला तर नवल नाही. राज्यातील सरकारपाशी भक्कम संख्याबळ आहे. तरीही खातेवाटवापरून काही मंत्री चुळबूळ करू लागताच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी फोडलेल्या या बॉम्बगोळ्यानंतर कोणाची ब्र काढण्याची प्राज्ञाच राहिलेली नाही. कोणाची ‘घुसमट’ होत असेल तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असाच या सूतोवाचातून दिला गेलेला गर्भीत इशारा आहे. कॉंग्रेसचे दहाजण यायला तयार होते, परंतु आमच्या पक्षश्रेष्ठींनीच लाल बावटा दाखवल्याचे ते म्हणाले. अर्थात, ही काही शेखी मिरवण्याची बाब नाही. आणखी दहा आले तर खरोखरच्या निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांची स्थिती काय होईल आणि त्याचा पुढील निवडणुकीत काय परिणाम होईल याचा फक्त विचार भाजपा नेतृत्वाने दोन क्षण थांबून जरूर करावा! खरे तर या सरकारमध्ये रा. स्व. संघातून घडलेले, भाजपाच्या विचारधारेवर श्रद्धा असलेले कोणीही नाही. सगळाच आयात माल आहे. नावापुरते सरकार भाजपचे असले तरी सगळी मूळची अन्य पक्षीय मंडळीच राज्यात भाजपचा उपरा टिळा लावून सत्तेवर आहेत. हिंदुत्व, अयोध्येतील राममंदिर वगैरे भाजपच्या मूलभूत मुद्द्यांवर या सार्‍या मंडळींची भूमिका ऐकायला जनता खरोखर उत्सुक आहे! एक काळ होता जेव्हा जनता सरकारमध्ये असताना संघ की सत्ता असा दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा सत्तेवर लाथ मारून जनसंघाची स्थापना झालेली होती. आज निवड करायची झाली तर केवळ सत्ताच निवडली गेली असती हे वेगळे सांगायची गरज नसावी. भाजपाचा वैचारिक पाया असलेला ‘एकात्म मानवतावाद’ आज समस्त विरोधकांना आपलेसे करून अशा रीतीने साकारला जातो आहे हे पाहून दीनदयाळ उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरोखरच धन्यता वाटत असेल!