आयसीसीचे वेळकाढू धोरण ः बीसीसीआय

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने यंदाची टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा भरवणे कठीण असल्याचे सांगूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मावळते अध्यक्ष शशांक मनोहर स्पर्धेच्या भवितव्याबाबत ठोस निर्णय घेण्याबाबत वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल बुधवारी केला. आयसीसीचे आडमुठे धोरण इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीला खिळ घालण्यासाठी आहे, असे बीसीसीआयला वाटते. आयसीसीने या महिन्याच्या सुरुवातीला बैठक घेतली होती. परंतु, निर्णय मात्र पुढील महिन्यापर्यंत राखून ठेवला होता.

आयसीसीने लवकर निर्णय जाहीर केला असता तर सर्व देशांना आपल्या द्विपक्षीय मालिकांचा निर्णय घेणे सोपे झाले असते, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सर्व देशांचे खेळाडू आयपीएलचा भाग नाहीत. काही मोजकेच विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. त्यामुळे आयसीसीचा वेळकाढूपणा आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट मंडळांसाठी अधिक मारक ठरणार असल्याची भीती या अधिकार्‍याने व्यक्त केली. बीसीसीआय व मनोहर यांच्यातील वाद क्रिकेट जगताला नवीन नाही. नागपूरस्थित शशांक मनोहर व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यातील वादाची किंमत बीसीसीआयला मोजावी लागत आहे.

शशांक मनोहर यांच्या कार्यकाळातच आयसीसीने बीसीसीआयला आयसीसीकडून मिळणार्‍या वाट्यात कपात केली होती. त्यामुळे बीसीसीआय व मनोहर यांच्यातील संबंध अधिक ताणले होते. मनोहर यांचा कार्यकाळ संपत आला असून जाताजाता त्यांनी बीसीसीआयला अजून एकदा इंगा दाखवण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. नूतन अध्यक्षपदासाठी कॉलिन ग्रीव्हस यांचे नाव आघाडीवर असून सौरव गांगुली यांनी आपली दावेदारी उपस्थित केली नाही तर बीसीसीआयदेखील ग्रीव्हस यांना पाठिंबा देणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेबी हॉकली यांचे नावदेखील चर्चेत आहे.