आयटीच्या सर्वांगिण विकासासाठी साधनसुविधा पुरवण्याची तयारी
????????????????????????????????????

आयटीच्या सर्वांगिण विकासासाठी साधनसुविधा पुरवण्याची तयारी

>> मीवो प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

सरकारची राज्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारच्या साधन सुविधा पुरविण्याची तयारी आहे. स्टार्टअप्समध्ये नवनवीन संकल्पनांचा वापर करणार्‍या परराज्यातील कंपन्यांचा गोवा स्टार्टअप्स धोरणांमध्ये समावेश करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाटो पणजी येथे काल केले.

धेंपो उद्योग समूह आणि मीवो – पॉवर्ड बाय बिझ नेस्ट यांच्यातील संयुक्त धोरणात्मक मीवो या राज्यातील पहिल्या खासगी उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात, धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा उद्योगपती श्रीनिवास धेंपो, अब्रार शेख व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
स्टार्टअप्समध्ये परराज्यातील काही व्यक्ती नवनवीन वेगळ्या संकल्पना घेऊन पुढे येत असतील त्यांचा आमच्या स्टार्टअप्स धोरणामध्ये समावेश करण्याची तयारी आहे. यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदार गोव्याकडे आकर्षित होऊ शकतात, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आर्थिक विकास महामंडळाकडून को-वर्किंग जागेची सुविधा उपलब्ध केली आहे. तथापि, मीवो या उपक्रमाअर्तंगत को-वर्किगमध्ये काम करणार्‍यांना अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील आयटी क्षेत्राच्या विकासाला सुध्दा गती मिळण्यास मदत होणार आहे. स्टार्टअपमध्ये काम करणार्‍यासाठी परराज्यात जाणार्‍यांना आता येथेच अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात मीवोच्या धर्तीवर आणखी केंद्रे सुरू होतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.

धेंपो उद्योग समूहाचे खाण, रियल इस्टेट, शेती, शिक्षण आदी अनेक क्षेत्रात मोठे योगदान असून सरकारला विकासासाठी साहाय्य करीत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मीवो स्टार्टअप्स या नवीन उपक्रमातून स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या नवीन स्टार्टअप्स प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी काळात राज्यातील प्रमुख शहरात अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याबाबत विचार केला जाणार आहे, असे धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले.

राजधानीतील पाटो पणजी येथे व्यावसायिक दृष्टया महत्त्वपूर्ण जागेत स्टार्टअप्स व कॉर्पेरेट्‌ससाठी उच्च तंत्रज्ञानाची युक्त साधन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पणजी व्यतिरिक्त राज्यातील पणजी, मडगाव, म्हापसा सारख्या भागात स्टार्टअप्ससाठी अशा प्रकारच्या साधनसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे, असेही धेंपो यांनी सांगितले.
राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी योग्य साधनसुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले.

मीवो स्टॉर्टअप्स व कॉर्पेरेट्‌ससाठी देखण्या व उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी को-वर्किग वातावरणाची निर्मिती केली आहे. भारतभरातील स्टार्टअप्स व कॉर्पेरट्‌सना गोव्यात त्यांचे स्वतःचे वर्क नेस्ट तयार करता येईल, अशी माहिती अब्रार शेख यांनी दिली.
को-वर्किंग परिसंस्थेच्या सीमा ओलांडण्यासाठी एखाद्या स्टार्टअपने असा उपक्रम सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोव्यातील परिसंस्थेच्या सीमाही यामुळे अधिक रुंदावतील, या उपक्रमामुळे गोव्यातील लोकांना अधिक संधी व रोजगार उपलब्ध होतील, असेही शेख यांनी सांगितले.