ब्रेकिंग न्यूज़
‘आयएसएल’चा दिमाखात शुभारंभ
आयएसएल किक ऑफ ः१)‘आयएसएल’ उद्घाटन प्रसंगी दारुकामाची आतषबाजी. २)आयएसएलच्या उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. बाजूला नीता अंबानी, प्रफुल्ल पटेल व अन्य. ३) आयएसलचे उद्घाटन झाल्याची घोषणा करताना नीता अंबानी. बाजूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व प्रियांका चोप्रा. ४) तर प्रियांका चोप्राने नीता अंबानी, सचिन तेंडुलकरव इतरांना असा ताल धरायला लावला.

‘आयएसएल’चा दिमाखात शुभारंभ

बहुप्रतिक्षित इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ कालपासून झाला. स्पर्धेला साजेसा दिमाखदार सोहळा येथील विवेकानंद युवा भारती क्रिरंगनमध्ये ७० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने पार पडला. बॉलीवूड, क्रिकेट व कॉर्पोरेट जगतातील तारकांच्या मांदियाळीत फुटबॉल स्पोर्टस् डेव्हलपमेंट (आयएसएल)च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा केली. यावेळी उपस्थित मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तेंडुलकर हा केरळच्या संघाचा मालक आहे. सर्व स्टेडियमवर त्याच्या आगमनानंतर एकच जल्लोष ऐकायला मिळाला. सुमारे ४५ मिनीटांच्या उद्घाटनाच्या सादरीकरणात बॉलीवूड तारका प्रियांका चोप्रा हिने हिट गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केले.दरम्यान, ७० दिवस चालणार्‍या या स्पर्धेत देशभरातील आठ संघ सहभागी होत आहेत. यात गोव्याच्या एफ सी गोवा संघाचाही समावेश आहे. परदेशी फुटबॉलपटूंचा सहभाग हे या स्पर्धेचे एक आकर्षण आहे.
इंडियन सुपर लीगचे दिमाखदार उद्घाटन
ऍटलेटिको डी कोलकाताची विजयी सलामी; २० डिसेंबरपर्यंत रंगणार स्पर्धा; आठ संघांचा समावेश
कोलकाता
बहुप्रतिक्षित अशा पहिल्या इंयिडन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा काल कोलकाताच्या सॉल्ट लेक स्डेडियममध्ये एका भव्य अशा सोहळ्यात शुभारंभ झाला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली.
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा स्पर्धा २० डिसेंबरपर्यंत अशी ७० दिवस चालणार असून एकूण ६१ सामन्यांची मेजवानी फुटबॉलप्रेमींना मिळणार आहे.
ममता बॅनर्जी या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन, माजी केंद्रीयमंत्री तथा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना कोलकाताची उद्घाटन सोहळ्यासाठी निवड केल्याने आयोजकांचे आभार व्यक्त केले. आपण सर्वजण फुटबॉलमय होऊया असे त्या म्हणाल्या.
प्रफुल्ल पटेल यांनी नीता अंबानी आणि आयएमजी-रिलायन्स ग्रूपचे ही स्पर्धा सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले. हे एक स्वप्न सत्यात आल्यासारखे आहे. शहरांतील प्रत्येक कोन्यात हा खेळ नेण्याची एक संधी आम्हाला प्राप्त झाली आहे, असे ते म्हणाले.
उद्घाटन सोहळ्यानंतर ४५ मिनिटांचा डोळे दीपवून टाकणारा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या अदाकारिने उपस्थितांची मने जिंकली. तर स्पर्धेत सहभागी संघाची ओळखपरेड करण्याआधी मुंबई, पुणे, कोलकाता, गोवा, केरळ, दिल्ली, चेन्नई, ईशान्य भारतातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम झाला.
या शुभारंभी सोहळ्याला मुकेश अंबानी, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, सचिन तेंडलकर, सौरभ गांगुली तसेच बॉलीवूड, क्रीडा आणि उद्योजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती होती.
विशेषकरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव पुकारताच स्टेडियमवरील फुटबॉलप्रेमींनी ‘सचिनऽऽऽ सचिनऽऽऽ’चा घोष करीत स्टेडियममध्ये जल्लोष केला.
आजपासून शुभारंभ झालेल्या या आयएसएल स्पर्धेची सांगता २० डिसेंबरला होणार आहे. प्रत्येक संघात सात परदेशी खेळाडू, १४ भारतीय खेळाडू आणि चार स्थानिक खेळाडूंचा संघात समावेश असेल. विजेत्या संघाला ८ कोटी, उपविजेत्याला ४ कोटी. उपांत्य फेरीतील संघाला प्रत्येकी १.५ कोटी रुपये. प्रत्येक संघ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन सामने खेळेल.
घरच्या मैदानावर एक आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर एक लढत. आठ संघांमधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीतही प्रत्येक संघाला प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन सामने खेळावे लागतील. यानंतर अव्वल दोन संघ अंतिम फेरीत.
कोलकाताची विजयी सलामी; मुंबई सिटीवर एफसी ३-० मात
ऍटलेटिको डी कोलकाताने मुंबई सिटी एफसीचा ३-० असा एकतर्फी पराभव करीत खचाखच भरलेल्या सॉल्ट लेक स्टेडियमवरील आपल्या फुटबॉलप्रेमींना विजयी आनंद दिला.
फिक्रू तेफेर्रा लेमेस्सा (२७वे मिनिट), बोर्जा फर्नांडेझ (६९वे मिनिट) आणि आर्नल लिबर्ट (९०+) यांनी गोल नोंदवित कोलकाताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
२७व्या मिनिटाला गार्सियाच्या अचूक पाससव फिक्रू तेफेर्राने गोलरक्षक सुब्रतो पॉलला चकविक कोलकाताला आघाडीवर नेणारा गोल नोंदविला. पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत कोलकाताने आपली आघाडी राखली.
दुसर्‍या सत्रात कोलकाताने आक्रमक खेळ करीत आणखी दोन गोल नोंदवित शुभारंभी लढत जिंकली. ६९व्या मिनिटाला स्पेनचा मध्यपटू बोर्जा फर्नांडेझने लांब पल्ल्यावरून घेतलेल्या जोरकस फटक्यावरील चेंडू पॉल थोपवू शकला नाही व कोलकाताने २-० अशी आघाडी घेतली. तर सामन्याच्या अंतिम क्षणात इंज्युरी वेळेत आर्नल लिबर्टने विजयावर शिक्कामोर्तब करणारा संघाचा तिसरा गोल नोंदविला. मुंबई एफसी संघानेही दुसर्‍या सत्रात काही धोकादायक चाली रचल्या होत्या. परंतु प्रतिस्पर्धी गोलरक्षाक व बचावपटूंनी त्या उधळून लावण्यात यश मिळविले.
आज या स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध केरला ब्लास्टर्स एफसी यांच्यात गुवाहाटीला लढत होणार आहे.

Leave a Reply