आनंदची पराभवानेच सांगता

भारतीय ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या लिजंडस् ऑफ दी चेस स्पर्धेच्या नवव्या व शेवटच्या फेरीतही पराभव पत्करला. दीर्घकाळापासूनचा पारंपरिक प्रतिस्पर्धी वासिल इव्हानचुक याने आनंदला धूळ चारली. दहा खेळाडूंमध्ये आनंदला नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. पीटर लेको शेवटच्या स्थानी राहिला.

चारही सामने बरोबरीत सुटल्यानंतर आर्मगेडोन टायब्रेकरचा वापर करावा लागला. टायब्रेकरवरदेखील निकाल लागू शकला नाही. त्यामुळे काळ्या मोहर्‍यांनिशी टायब्रेकर लढत खेळलेल्या इव्हानचुकला विजयी घोषित करण्यात आले. आनंदने पहिला सामना ५७ चालींत बरोबरीत सोडवल्यानंतर पुढील तिन्ही लढती बरोबरीत राहिल्या. टायब्रेकरवर ५९ चालींनंतर उभय खेळाडूंनी गुण विभागून घेण्याचे मान्य केले.

कार्लसन चेस टूरचा भाग असलेल्या या स्पर्धेत आनंदने ७ गुणांची कमाई केली. बोरिस गेलफंडवरील विजय वगळता आनंदला उर्वरित आठही फेरीत पराजित व्हावे लागले. मॅग्सन कार्लसन याने व्लादिमीर क्रामनिकला ३-१ असे हरवून आपली अपराजित मालिका कायम राखली. कार्लसन व पीटर स्विडलर तसेच अनीश गिरी व इयान नेपोमनियाच्ची यांच्यात उपांत्य फेरी खेळविली जाणार आहे.
‘लिजंड्‌स ऑफ चेस’ ही कार्लसन चेस टूरमधील अनोख्या पद्धतीची स्पर्धा असून या स्पर्धेसाठी चेसेबल मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम चारमधील कार्लसन, लिरेन, नेमोपनियाच्ची व गिरी हे खेळाडू थेट पात्र ठरले होते. आपल्या बुद्धिबळ कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर राहिलेल्या व सध्या ४० ते ५२ वर्षे वयोगटात असलेल्या दिग्गजांबरोबर थेट पात्र ठरलेले हे खेळाडू झुंजत आहेत. या स्पर्धेचा विजेता ९ ते २० ऑगस्ट या कालावधीत होणार्‍या ३००,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ग्रँड फिनालेसाठी पात्र ठरेल.

नवव्या फेरीचे निकाल ः वासिल इव्हानचुक (युक्रेन) वि. वि. विश्‍वनाथन आनंद (भारत) २.५-२.५, मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) वि. वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) ३-१, बोरिस गेलफंड (इस्त्रायल) वि. वि. इयान नेपोमनियाच्ची (रशिया) ३-२, अनीश गिरी (नेदरलँडस्) वि. वि. पीटर स्विडलर (रशिया) २.५-१.५, डिंग लिरेन (चीन) वि. वि. पीटर लेको (हंगेरी) २.५-१.५
अंतिम गुणतक्ता ः १. कार्लसन २५, २. नेपोमनियाच्ची २०, ३. अनीश गिरी १८, ४. स्विडलर १४, ५. इव्हानचुक १३, ६. क्रामनिक १२, ७. गेलफंड ११, ८. लिरेन ७, ९. आनंद ७, १०. लेको ६