आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कारांसाठी चौघाजणांची निवड जाहीर

मोले-धारबांदोडा येथील रवींद्र के. गांवकर (शिक्षण), माशेल येथील जयंती वेळीप मयेकर (क्रीडा), केरी-फोंडा येथील दत्ताराम शाणू जल्मी (शेती) आणि केपे येथील श्रीमती आलेमिया डायस ( कला व संस्कृती) यांची राज्य् सरकारच्या आदिवासी कल्याण खात्याच्या आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी एका पत्रकार परिषदेत पुरस्कार विजेत्यांची घोषणा काल केली.

कुडचडे येथील रवींद्र भवनामध्ये आज शनिवार २५ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित प्रेरणा दिन कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वीज मंत्री नीलेश काब्राल यांची उपस्थिती लाभणार आहे, असेही गावडे यांनी सांगितले.
आदिवासी कल्याण खाते आणि युनायटेड ट्रायबल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रेरणा दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमात शिक्षण, क्रीडा, शेती आणि कला व संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या आदिवासी समाजातील नागरिकांचा सत्कार केला जातो. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.