ब्रेकिंग न्यूज़

आता वाहनचालकांविरुद्ध नोंदवा वॉट्‌सऍपद्वारे तक्रार

>> पोलीस खात्याची जनतेसाठी वाहतूक पहारेकरी योजना

वाहतूक पोलिसांनी गोव्यातील जनतेसाठी वाहतूक पहारेकरी ही योजना सुरू केली आहे. राज्यातील वाढत्या अपघातांना आळा घालण्याबरोबरच वाहतुकीत शिस्त आणणे या योजनेचा उद्देश असल्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेखाली राज्यातील कोणतीही व्यक्ती वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध वॉट्‌सऍपद्वारे पोलिसांकडे तक्रार करू शकेल. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीला पोलिसांकडे वाहतूक पहारेदार म्हणून नोंदणी करावी लागणार आहे, असे चंदर यांनी स्पष्ट केले.

वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांवर खटले घालणे, वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणणे व त्यासाठी लोकांची मदत मिळवणे या उद्देशाने वरील योजना सुरू करण्यात आली असल्याचे चंदर म्हणाले. वरील योजनेत सहभागी होण्यासाठी लोकांना ७८७५७५६११० या वॉट्‌सऍप क्रमांकावर तक्रार करावी लागणार असल्याचे चंदर यांनी यावेळी सांगितले.

ज्यांना वाहतूक पहारेदार म्हणून नोंदणी करायची असेल त्यांना आपला वॉट्‌सऍप नंबर, नाव, पत्ता व ई-मेल आयडीची वरील योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना वाहतूक नियम भंग करणार्‍यांचे फोटो व माहिती वरील वॉट्‌सऍप क्रमांकावर पाठवता येतील. वाहतूक नियम भंगाची माहिती देताना सुस्पष्ट असे फोटो, व्हिडिओ क्लिप, दिनांक, वेळ, स्थळ व नेमका कोणत्या प्रकारचा वाहतूक भंग करण्यात आला आहे त्याची माहिती पुरवावी लागेल. अशी माहिती पुरवणार्‍यांना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुण देण्यात येणार असल्याचे चंदर यांनी स्पष्ट केले.

वाहतूक पहारेदाराने वाहतूक नियम भंगासंबंधी केलेल्या दर एका तक्रारीनुसार त्यांना गुण देण्यात येणार आहेत. त्यांच्या खात्यावर १०० गुण झाल्यानंतर त्यांना बक्षीस देण्यात येईल. त्याशिवाय एक बंपर ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्याला बक्षिसाच्या रुपात दुचाकी देण्यात येणार आहे. वाहतूक पहारेदारांना स्वतः सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे. ते न करणार्‍यांची वाहतूक पहारेदार म्हणून केलेली नोंदणी रद्द करण्यात येईल. पत्रकार परिषदेला वाहतूक पोलीस विभागाचे उपाधीक्षक धर्मेश आंगले हजर होते.