आता मी स्वतंत्र व्हायचे ठरवले आहे….

– विष्णू सूर्या वाघ
प्रतिभा आणि बुद्धिमत्ता यांना राजकारणात काडीचेही स्थान नाही. विशेषतः ही प्रतिभा बहुजन समाजातून आलेली असेल तर तिला पुढे आणण्यापेक्षा चिरडण्याचेच प्रयत्न अधिक प्रमाणात होतात. एका परीने हुशार असणे हा राजकारणातला अवगुण आहे याचा प्रत्यय मी घेतो आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या प्रश्‍नावरून मी तत्कालीन कॉंग्रेस सरकारशी संघर्ष केला. दिगंबर कामत यांच्याशी मित्रत्वाचे संबंध असतानाही तत्त्वप्रणाली महत्त्वाची मानून कॉंग्रेसच्या विरोधात उभा ठाकलो. आंदोलनात उतरलो. हातात असलेल्या सरकारी पदांचा त्याग केला. या लढाईत भाजपाने पाठिंबा दिला म्हणून भाजपात आलो. भारतीय जनता पक्ष सत्तेवर यावा म्हणून मी काय केले नाही? भाषणे केली, गाणी लिहिली, जनमत तापवले. सांत आंद्रेसारख्या भाजपाला स्वप्नातही जिंकणे अशक्य असलेल्या मतदारसंघातून भाजपाला एकविसावा आमदार मिळवून दिला. निवडणूक होईपर्यंत मनोहर पर्रीकर माझे कौतुक करीत होते. ‘‘मला सांत आंद्रे जिंकून द्या, माझ्या केबिनमधील पहिला मंत्री ठरला’’ असे सांगत होते. ‘‘विष्णू वाघ यांच्या रूपाने आमच्या भात्यात लखलखीत बाण दाखल झाला आहे.’’ या शब्दांत प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी माझे स्वागत केले होते. पण निवडणूक झाली, बहुमत मिळाले, सरकार घडले आणि त्याक्षणी विष्णू वाघांची उपयुक्तता संपली. ‘ज्येष्ठते’चा निकष लावून आमचा पत्ता कट करण्यात आला. भरपाई म्हणून कला अकादमी आणि नंतर ईएसजी बहाल केली. पण तिथेही काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. वाघ काय करतो, कुणाला भेटतो या बातम्या पुरविण्यासाठी खास मर्जीतील माणसे नेमण्यात आली. ईएसजीत मी घेतलेला प्रत्येक निर्णय फिरवण्यात आला. कलाकारांची पैशांसाठी अडवणूक करण्यात आली. हेतू केवळ मला बदनाम करण्याचा होता. गेल्या वर्षी इफ्फीला उद्घाटना आदल्या दिवशी मला ईएसजीचा अध्यक्ष केल्याची बातमी माहिती खात्यातून पेरण्यात आली. प्रत्यक्ष फाईलवर कोणतेच सोपस्कार केले नव्हते. कोणतेही अधिकार दिले नव्हते. मी दुखावून उद्घाटनाला उपस्थित राहिलो नाही, तर ‘वाघ सुबेज! तो चड करता! आमी ताका दाखयतले!’ ही भाषा.
भाषा माध्यम प्रश्‍न हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न. मी मुळात लेखक-कलाकार. राजकारणी नव्हे. त्यामुळे या प्रश्‍नावर माझ्या भावना तीव्र व सच्च्या होत्या. पण पर्रीकरांना फक्त सत्तेवर येण्यासाठी या प्रश्‍नाचे भांडवल करायला हवे होते. ते त्यांनी केले. माध्यमप्रश्‍नी ‘यू टर्न’ केला आणि बिचार्‍या दिगंबर कामतांनीही केले नव्हते असे अघोरी पाप इंग्रजी शाळांचा मक्ता अल्पसंख्यकांच्या शाळांना देऊन केले. पण त्यांना जाब विचारण्याचे धाडस कोणीही दाखवले नाही, कारण ते पडले भाई! इंटेलिजंट, आयआयटीयन राजकारणी! भाई म्हणतील ते ब्रह्मवाक्य! ते दाखवतील ती पूर्वदिशा! भाईंनी सांगितले की आंब्याच्या झाडाला फणस लागतात तर आंब्याला फणसच लागणार! माध्यमप्रश्‍नी भाईंनी टोपी फिरवल्यानंतर दिगंबरच्या काळात संघर्ष करणारे भाषाप्रेमी पायांत शेपट्या घालून गप्प बसले. काही जणांच्या समोर चघळण्यासाठी अधिकारपदांची हाडे फेकण्यात आली. माध्यमप्रश्‍न अशा प्रकारे निकालात काढण्यात आला. एकट्या वाघाने डरकाळी फोडली. परिणती काय? त्याच्या हातून कला अकादमी व ईएसजी दोन्ही काढण्यात आली! भाषाप्रेमींच्या कंपूतील एकानेही याविरुद्ध आवाज काढला नाही. कला अकादमीत कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मी अनेक योजना आखल्या, बक्षिसांची रक्कम दुप्पट केली. गावोगावी नाटक-तियात्र-कार्यक्रमांचा सपाटा लावला. पण कला अकादमीचे अध्यक्षपद काढून घेतल्यानंतर सगळ्या कलाकारांनी निमूटपणे नव्या व्यवस्थेशी जुळवून घेतले.
गेल्या वर्षी १९ डिसेंबरला माझ्यावर एका जमावाने प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने मी बचावलो. हल्ल्यामागे राजकारण होते आणि पक्षाच्या एका बड्या पदाधिकार्‍याच्या मेंदूतून हे सर्व कारस्थान शिजले होते. सत्तारूढ पक्षाच्या आमदारावर हल्ला होऊन देखील या प्रकरणाची चौकशी सुरू झाली नाही. हल्लेखोरांना ताब्यात घेतले गेले नाही. तरुण तेजपालच्या मागे पोलिसांनी जसा ससेमिरा लावला, त्याच्या एक शतांशानेही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. एका वरिष्ठ अधिकार्‍याला मी विचारले असता तो म्हणाला, ‘वरचा आदेश!’
फेब्रुवारी ते ऑक्टोबर या काळात मी अत्यंत वाईट परिस्थितीतून गेलो. तब्येत बिघडली. पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. सहा महिने व्हिल चेअरवर बसून किंवा लंगडत चालून काढले. या काळात पक्षातील कुणीही धीर द्यायला आले नाहीत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असतानाही तो धुडकावून प्रचारकार्यात सहभागी झालो. परवा महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीही प्रचार केला. अधिवेशनात सरकारच्या, पक्षाच्या बाजूने बोललो. एवढे होऊनही मनोहरभाईंनी काही दिले नाही. दिले काय तर ‘तारीख पे तारीख! आयज करतां- चवथ जावंनी, मागीर करतां- दिवाळेउप्रांत दितां’ ही आश्‍वासने! आता नवे मुख्यमंत्री काही देतील असे वाटत नाही. मला अपेक्षाही नाही. काल एक सहकारी आमदार म्हणाला,‘भाई दिल्लीक वोयच्या पोयली तेका मेवोन किदेंय दी म्हुणोन सांगोया मुरे!’ मी म्हणालो,‘विष्णू वाघ गरीब आहे, पण लाचार नाही. भिकारी होऊन कोणाच्या दारात मी उभा राहणार नाही. काही मागायचे दिवस आता गेले. आता काही दिले तरी घ्यायचे की नाही याचा विचार करावा लागेल.
पार्सेकर आता गोव्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांची नेमणूक पक्षाने केली आहे व सर्व आमदारांना ती मान्य आहे. पार्सेकर सरांना लागेल ते सर्व सहकार्य आम्ही देऊ. ते नवीन असल्यामुळे विनाकारण त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आमच्यातील कोणीच करणार नाही. मात्र सरकार एखादा जनहितविरोधी निर्णय घेतेय असे वाटले तर मी गप्प बसणार नाही. मी बिनदिक्कत त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करीन, तसेच मनोहर पर्रीकर सरकारने घेतलेले काही निर्णयही फिरवण्याची आज गरज आहे. उदाहरणार्थ कूळ मुंडकार कायदा दुरुस्ती विधेयक पर्रीकरांनी विधानसभेत संमत केले. या कायद्याचे संभाव्य धोके आता दिसू लागले आहेत. बहुजन समाजातली अस्वस्थता वाढली आहे. बहुजन समाजाचा एक घटक या नात्याने या चळवळीत आम्हालाही सहभागी व्हावे लागेल. निदान माझ्यापुरता तरी निर्णय मी घेतला आहे.
एक गोष्ट मला समजत नाही, फ्रान्सिस डिसोझांना मुख्यमंत्री करा असे आम्ही म्हटले, त्यावेळी ‘मेजॉरिटी-मायनॉरिटी हा विचार भाजपात केला जात नाही’ असे आम्हाला सांगण्यात आले. मग मिकी व आवेर्तानची नावे घोषित केल्यावर ‘अल्पसंख्य समाजाला मंत्रिमंडळात आम्ही ३३ टक्के प्रतिनिधित्व दिले आहे’ असे मुख्यमंत्री का म्हणाले? अल्पसंख्यकांसाठी ही नवी ‘कोटा सिस्टम’ तर नव्हे? ‘विष्णू वाघ आता काय करणार?’ असा एक प्रश्‍न सगळीकडे विचारला जातोय. अनेक कयास वर्तविले जातात. पण मी शांत आहे. मी कोणासमोर झुकणार नाही. आजवरचे माझे आयुष्य रोखठोक बोलण्यात व बेधडक वागण्यात गेले. मागची अडीच वर्षे या स्वभावाला मी मुरड घातली. आता मी स्वतंत्र व्हायचे ठरविले आहे. जे मला सत्य, लोकहितवादी व चांगले वाटेल ते मी बोलत जाईन. कुठे अन्याय होताना दिसला तर त्या विरोधात आवाज उठविन. त्याचे जे काही परिणाम होतील ते सहन करण्याची तयारी मी ठेवली आहे.
शेवटी, माझ्याच एका कवितेत माझी मनोभूमिका मी मांडली होती. त्या कवितेच्या ओळी उद्धृत करतो आणि मी थांबतो-
या कठोर नियतीपुढती मी झुकलो नाही
म्हणूनच बहुधा एका जागी टिकलो नाही.
फुले तोडली कळ्याही खुडल्या उजाड केला बगीचा
तरी कुणाच्या पायी काटा होऊन रुतलो नाही.
क्षितीजाने हे चोरून नेले सर्व किनारे माझे
अगस्ती होऊन सागर प्यालो म्हणूनच सुकलो नाही.
बस्स एवढाच विश्‍वास घेऊन आता पुढची वाटचाल….. धन्यवाद!

Leave a Reply