आता माघार नाही!

  •  डॉ. मधू घोडकीरेकर
    (सहयोगी प्राध्यापक, न्याय वैद्यक विभाग, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी)

भरतीलाही एक मर्यादा असतेच. तिथे पोहोचली की ओहोटीला सुरुवात होते. या कोरोनाच्या लाटेलाही अशी मर्यादारेखा असणार व तेथूनच तिची ओहोटी सुरू होणार. तोपर्यंत आम्हाला रेतीत घट्ट पाय रोवून राहायचे आहे. कोरोनाला सांगून टाकायचे आहे, आता आमची माघार नाही!

यंदाचा पावसाळा कधी आला अन् श्रावण कधी सुरू झाला कळलेच नाही. एरव्ही उन्हाळी सुट्टी संपली की शाळा सुरू व्हायच्या. पावसाळ्यात स्वतःला सावरायला थोडा वेळ जायचा अन् त्यातच श्रावण यायचा. मोठी सुट्टी संपून एका-एका दिवसाची सुट्टी कधी मिळेल याची मुले वाट पाहायची. सहामाही परीक्षा व्हायच्या; पण सहा महिने मुलांना सुट्टी असेल अशी कुणी कल्पनाही केलेली नसेल. पण ती आज आम्ही अनुभवतोय. या सुटीत घरातच शाळा भरतेय. आईबाबा शिक्षक बनतात. मोबाईलवरच शाळेचा काळा फळा येतो. शाळा बंद पण शिक्षण चालू. प्रवाह थांबणे नाही. म्हणूनच म्हणतो, कोरोनाला काय करायचं ते करू दे, पण आमची माघार नाही!

तिकडच्या बातम्या
वुहानाच्या बातम्या जानेवारीच्या सुरुवातीला येऊ लागल्या. सुरुवातीला मुख्य बातमीपत्रात शेवटी ‘आंतरराष्ट्रीय घडामोडी’त एखादा उल्लेख व्हायचा. गणती वाढू लागली तशी बातमी हळूहळू मोठी होऊ लागली व पुढे पुढे येऊ लागली. फेब्रुवारीपर्यंत हेडलाईन होऊ लागली. तोपर्यंत तो चीनचा प्रश्‍न होता. तोपर्यंत ‘कोरोना’, ‘कोविड’ ही नावं थोडी परिचयाची होऊ लागली होती. एवढेसे बुटके चिनी काय काय करामती करत होते हेच त्यावेळी उत्सुकतेचे वाटत होते. यावेळी मला त्यांच्याकडे झालेल्या ऑलिंपिकच्या उद्घाटनाची आठवण होत होती. त्यांचा उद्घाटन सोहळा आजपर्यंतचा भव्यदिव्य होता. साध्या-साध्या गोष्टींचा वापर करून त्यांनी भव्यतेचा आभास आणला होता. उदाहरणार्थ, खेळाडूंचा मार्चपास होताना मध्ये एक लांब कारपेट टाकले होते. त्या कारपेटच्या सुरुवातीच्या टोकाला ओळीने वेगवेगळ्या रंगाचे गुलालासारखे पदार्थ ठेवले होते. खेळाडूंनी त्या पदार्थांवरून चालत जाऊन पुढे कारपेटवर चालायचे. पाहायला साधे वाटत होते. संचलन संपले तसे खेळाडूंच्या पाऊलखुणा उमटलेले कारपेट उभे केले. प्रत्यक्षात रंगीबेरंगी पाऊलखुणांचे मोठे पेंटिंग उभे झाले. यात खरे तर खर्च काही नव्हता; पण मोठी निर्मिती झाली. यावेळी याची आठवण व्हायचे कारण हे की, थर्मलगन, पीपीई यांसारख्या वस्तू काही दिवसांतच तयार केल्या. रुग्णशोध पद्धत, रुग्णचाचणी पद्धत, उपचार पद्धत हे त्यांनी काही दिवसांतच जमवले. शेकडोचे हजारो रुग्ण झाले; पण हजारोचे लाखावर गेले नाहीत. कमीत कमी तसे जगाला भासवण्यात त्यांना यश मिळाले. तोच व्हायरस आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघाला तेव्हा अलेक्झांडरसारखी मर्दुमकी दाखवू लागला. आता जेथे शिरतो तेथे लाखोच्या संख्येखाली राहातच नाही. बुटक्या शरीरात वाढलेला हा विषाणू त्याच्यासारखाच विस्तारवादी व विश्‍वासघातकी बनला आहे. कधी शिरतो अन् कधी निसटतो हे कळतच नाही. साखळी तोडायची भाषा मध्यंतरी होती. आता कळतंय, ही साखळी नव्हे दोरखंड आहे.

चोरट्या पावलांनी आगमन
कोलंबसला अमेरिकेचा शोध घेण्यासाठी वर्षे लागली; पण अणुरेणूसारखा व्हायरस शंभर दिवसांत जग फिरून मोकळा झाला. सुरुवातीला चोरपावलांनी घुसला तोही विमानातून. विमानावर कडक नजर ठेवली, बंदुका रोखाव्या तशा थर्मलगन कपाळावर रोखल्या गेल्या. पण चिनी चोर कोठून व कसा निसटला कळलेच नाही. कधी रेल्वेतून धावला, बसमधून पळाला, तर कधी ट्रकच्या केबिनमध्ये बसून त्याने प्रवास केला. त्याला पकडूच म्हणून लॉकडाऊन केलं. प्रवासाचा वेग कमी झाला. पण बर्‍याच जागी तो पोहोचलाच! जेथे आधी पोहोचला तिथे लॉकडाऊनमध्येही हैदोस घातला. उरलेल्यांकडे मुंग्यांनी वारुळ बांधावे तसा रुजत आहे.

जैविक आपत्ती
जैविक आपत्ती म्हणजे बायलॉजिकल डिसिज. एखाद्या जिवाने, जनावराने, जिवाणूने वा विषाणूने थैमान घालावे, जीवहानी व्हावी याला जैविक आपत्ती म्हणतात. एखाद्या महामारीमुळे आपत्ती येते ती अशी. जगाच्या इतिहासात महामारीची आपत्ती आली. ही महामारी बराच काळ चालली. पण आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात खतरनाक महामारी मानली जाते. आता जो महामारी कायदा अमलात आहे त्याचा जन्म शंभर वर्षांपूर्वी झाला होता. कोरोनाच्या नायनाटासाठी महामारी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन्ही लागू केले आहेत. महामारी कायद्याद्वारे आरोग्य खात्याकडे अंमलबजावणी करण्याचे कायदे आहेत. यात पंचायत व नगरपालिका यांचाही सहयोगी सहभाग असतो. याच्या सोबत असलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा यात नागरी खात्याकडून करण्यात येणार्‍या कारवाई व उपाय-योजना यांचा समावेश असतो. येथे आरोग्य खात्याचा सहयोगी सहभाग असतो.

गोव्यातील व्यवस्थापन
गोव्यात आधी महामारी कायदा लागू केला व नंतर केंद्राबरोबर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. महामारी कायदा लागताच प्रतिबंधात्मक उपाय सुरू झाले. सुरुवातीला शाळा बंद झाल्या. त्यानंतर प्रदीर्घ लॉकडाऊनमध्ये आधी सगळेच बंद व नंतर क्रमाक्रमाने बाकीची दुकाने, प्रस्थापने उघडी झाली. नंतर जिल्हानिहाय रेड झोन, यल्लो झोन व ग्रीन झोन तयार झाले. आता चाळीनिहाय कन्टेन्मेंट झोन वगैरे चालू आहेत. यासोबत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली येणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली. तात्पुरते निवारे, इस्पितळे यांची व्यवस्था याच कायद्याखाली झाली. या कायद्याचे खास आकर्षण हे की, आपत्तीसाठी बराच निधी असतो अन् तो वापरण्यासाठी जास्त किचकट प्रक्रिया नसते.

सद्याच्या परिस्थितीत महामारी कायद्याच्या तरतुदीचा बर्‍यापैकी वापर होतो, पण आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या बर्‍याच तरतुदींचा वापर होतच नाही. जे भूकंप, प्रलय वारंवार होतात तेथे आपत्ती व्यवस्थापनाखाली बर्‍यापैकी कामे करतात. भूकंप, प्रलय होतो तेव्हा आरोग्य खात्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी राखून ठेवलेला निधी असतो तो वापरला जातो. इतरकडे हा निधी कसा व कोणत्या कारणासाठी असतो याची माहिती नसते. अशावेळी निधी विनावापर म्हणून पुढच्या वर्षी केंद्राकडून कमी निधी मिळतो. गोव्यात यावेळी असा निधी कोविडसाठी बराच वापरला गेला. पूर्वी असा निधी विनावापर केंद्रात परत पाठविल्याचीही उदाहरणे आहेत.
संपूर्ण लॉकडाऊनमध्ये बरीच सरकारी कार्यालये बंद होती, पण आरोग्य खात्याची व जिल्हाधिकारी खात्याची आपत्ती व्यवस्थापनसंबंधीची सगळी कार्यालये कार्यरत होती. यातूनच त्याचे कार्य व योगदान लक्षात येते.

आभाळ कोसळतंय
कोणावरही आपत्तीची आफत येणं म्हणजे त्याला आभाळ कोसळल्यासारखं होतं. आभाळ कोसळतं असं म्हणतो खरं, पण असं कधी होणारच नाही हे आपल्याला माहीत असतं. कारण आभाळ म्हणून खरं काही नसतं. एक मोठी पोकळी, त्यात ग्रह आणि तारे. आम्ही पूर्वीच्या प्लेग, देवी, कॉलरा याच्या महामारीत हजारो लोक प्राण गमावून बसले असल्याचे वाचत होतो. जसे आभाळ प्रत्यक्षात कधी पडत नसते तसे प्रत्यक्षात असे रोग आजच्या काळात येतील असे कोणाला वाटले नव्हते. चीनमध्ये होता तेव्हा भारतात येणार असे वाटत नव्हते. पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचला. तरीही आपल्याला वाटतं की आपल्या गावात येणार नाही. गावात आला तरी आपल्या वाड्यावर येणार नाही, आलाच तर घरात येणार नाही. घरात नव्हे, आपल्या घश्यात शिरला तरी विश्‍वास बसत नाही की तो आपल्यात पोचलाय म्हणून. परदेशात तर सुरुवातीच्या पहिल्या दोन महिन्यांत घराघरांत मृतांचा खच पडला. अशा घरात जिवंत असलेल्यांची वरून आकाश कोसळते तर खालून जमीन घसरते अशीच परिस्थिती झाली असेल.

पहिले रुग्ण
पहिलं पुस्तक, पहिलं पाडस, पहिलं प्रेम अशा पहिल्यावहिल्या गोष्टीना एक अप्रूप असतं. गोव्यात पहिल्या रुग्णाची बातमी ब्रेक सकाळी सकाळी झाली, तर दुपारपर्यंत त्या बातमीची बातमी झाली. कुणीतरी चेष्टा करण्यासाठी उगाच वॉर्डमध्ये फोन केला व आपण पुण्याच्या प्रयोगशाळेतून बोलत आहोत व अमुक अमुक रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. याच्या कानातून त्याच्या कानात जात जात ती ब्रेकिंग न्यूजवाल्यांकडे पोचली अन् व्हायरसच्या सारखी व्हायरल झाली. पुढे चेष्टा करणार्‍यावर पोलीस केस वगैरे होणार होती, पण काय झाले कोण जाणे!

अतिरेक्यांनी यावे तसे हातावर मोजण्याइतके विमानप्रवासी कोविड घेऊन आले. उपचार घेऊन घरी गेले. यांना नव्यानेच उघडलेल्या हॉटेलात पहिल्या काही पाहुण्यांना शाही पाहुणचार मिळावा तसा उपचारमान मिळाला. ते घरी गेले तेव्हाही प्रसिद्धी मिळाली. पुढे ग्रीन झोन नावाचा मधल्या सुट्टीचा काळ निघाला. मधली सुट्टी संपून मुलांनी वर्गात यावं नि वर्गशिक्षिकेनं जाहीर करावं, आज उजळणी वर्ग आहे, संध्याकाळीही शाळेत राहावं लागेल. हे कसं? शाळा सुटली पण घरी जाता येत नाही. या व्हायरसने आम्हा सगळ्यांना असलीच मुलं करून ठेवली आहेत.

पहिले हॉस्पिटल
सुरुवातीचे शाही रुग्ण तसे लक्षणहीन होते म्हणून गोमेकॉमध्येच उपचार केले. जसे आमच्या सिटीबसमध्ये चढावे अन् बसायला जागा नाही म्हणून खाली उतरावे लागावे तसे खालावलेल्या प्रकृतीचे रुग्ण येऊ लागले. अशा रुग्णाला घेऊन गोमेकॉच्या डॉक्टरांचा एक थवा पहाटे दोन वाजता मडगावच्या इएसआय म्हणजे कर्मचारी इस्पितळात पोचला. सूर्योदय होईपर्यंत या इएसआय हॉस्पिटलचे केविड इस्पितळात रूपांतर झाले. सुरुवातीचे दिवस सुगीचे होते. डॉ. एडविन गोम्स यांच्यासोबत यादगार आठवणी घेऊन आलेले रुग्ण परत आपल्या घरी गेले. पाऊस कधी आला, कधी जून सुरू झाला यावर्षी कळलं नाही. जूनच्या दुसर्‍या आठवड्यानंतर एकदुकटा घरी न जाता देवाघरी गेले. एकाने दुसर्‍याला बोलावले तसे. एक एक दिवस तर दिवसभर एक-दोन-तीन-चार अशी गणती चालू राहू लागली आहे. आता दिवसाला किती यापेक्षा या दिवसाकाठी एकूण किती एवढंच पाहिलं जातं, कारण हे रोजचंच होऊ लागलं आहे.

पहिली नोकरी, पहिला दिवस
पदव्युत्तर पदवीनंतर माझी पहिली नियमित नोकरी याच राज्य कर्मचारी हॉस्पिटलातून सुरू झाली. केवळ अठ्ठावीस दिवस मी येथे नोकरी केली होती. कारण तोपर्यंत विद्यमान विभागात मला नोकरी लागली होती. माझा इथला पहिला दिवस माझ्या स्मरणात आहे. जेवणानंतर संपूर्ण हॉस्पिटल पाहावं म्हणून मी खाली आलो. जिन्याच्या डाव्या बाजूला प्रयोगशाळा होती. आत पाहतो तर माझ्या एका डॉक्टर मित्राची बहीण तिथे तंत्रज्ञ म्हणून उभी होती व बेसिनमध्ये थुंकत होती. मी विचारलं काय झालं तर म्हणाली, तपासणीचे रक्त पिपेटमध्ये ओढताना रक्ताचा थेंब जिभेला लागला. तेव्हाच एचआयव्हीच्या तात्काळ तपासणी किट्‌स आल्या होत्या. तपासणी केली तर ते रक्त पॉझिटिव्ह निघालं. त्यातच ही गरोदर होती. गोंधळ उडाला. यावेळी आमच्या शेजारच्या गावचे श्री. रत्नाकर म्हार्दोळकर रोजगार आयुक्त होते. मी त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की भारताच्या कोणत्याही कोपर्‍यातून औषध आणावे लागले तरी चालेल, चोवीस तासांच्या आत एचआयव्हीचे औषध आणून तिला देऊ. इतकेच नव्हे तर प्रयोगशाळा अद्ययावत करून टाकू. त्यांनी तसे केले. तेव्हाचे बरेच मित्र अजूनही येथे आहेत. आजचे अधीक्षक डॉ. विश्‍वजित फळदेसाई त्यांतील एक. येथे नवीन इमारत झाली तेव्हा नवे छोटेखानी शवागर बांधले होते. सुरुवातीला शवागर केलं नव्हतं कारण तेथे मृत्यू होण्यासारखे रुग्ण ठेवले जात नव्हते. कोविड इस्पितळ झाल्यावर डॉ. विश्‍वजितनी हे शवागर कार्यान्वित केले. येथे कोविडचा गोव्यातला पहिला कोविड मृतदेह ठेवण्यात आला. पहिल्या दोन मृतदेहांच्या अंतिमक्रिया कराव्या लागल्या. मी पहिल्यांदाच येथे नोकरीसाठी रूजू झालो व २९व्या दिवशी नोकरी सोडून परत गोमेकॉत गेलो. या हॉस्पिटलमध्ये परत कधीतरी येणार व अशा परिस्थितीला सामोरा जाणार असा स्वप्नातदेखील मी विचार केला नव्हता. आता स्वप्ने सोडा, एका मागून एक जातो हे पाहून झोपही येत नाही.

आता माघार नाही!
थोडं थोडं पोहायला यायचं. कुणीतरी पाण्यात ढकलावे आणि जीव वाचवण्यासाठी हातपाय मारावे हे पाहून आपल्याला पोहायला जमतेय याची जाणीव व्हायची. असं करता करता तलावाच्या मध्ये पोहोचायचं. आता उपाय नाही. पोहत जाऊन काठ गाठायचा. नाही जमलं तर तलावाचा तळ पाहायचा. आज आपल्या सर्वांची हीच गत झाली आहे. बरे झालेले रुग्ण पाहून आपणही तग धरू असे वाटू लागले आहे. भरतीचे पाणी प्रत्येक लाटेबरोबर थोड्या थोड्या किनार्‍याच्या वरती येऊ लागले आहे. लाट छोटी असते तेव्हा पायाला फक्त गुदगुल्या होतात. मोठी आली तर याच पायांना ओढून समुद्रात नेते. हा कोरोना आपल्याला खाली ओढतोय की काय असे सगळ्यांनाच वाटू लागले आहे. भरतीलाही एक मर्यादा असतेच. तिथे पोहोचली की ओहोटीला सुरुवात होते. या कोरोनाच्या लाटेलाही अशी मर्यादारेखा असणार व तेथूनच तिची ओहोटी सुरू होणार. तोपर्यंत आम्हाला रेतीत घट्ट पाय रोवून राहायचे आहे. कोरोनाला सांगून टाकायचे आहे, आता आमची माघार नाही!