आतड्यांचा कर्करोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

आतड्यांचा कर्करोग बहुतांशी प्रौढपणी होतो. कर्करोगाची अवस्था, रुग्णाचे वय, बल इत्यादीवरून चिकित्सा ठरवावी लागते. गाठीचे शस्त्रक्रियेद्वारे निर्हरण (काढून टाकणे) करणे ही प्रमुख चिकित्सा होय. किमोथेरपी व रेडिओथेरपी सुद्धा द्यावी लागते.

आयुष्याच्या कोणत्याही कालखंडांमध्ये कर्करोग होऊ शकतो. आतड्यांचा कर्करोग बहुतांशी प्रौढपणी होतो. निर्व्यसनी कर्करोगग्रस्त रुग्णांची नेहमी तक्रार असते- मला तंबाखू, मद्यपानाचे कुठलेच व्यसन नाही तरीपण मला कॅन्सर कसा झाला?… व्यसनाबरोबर अयोग्य आहार-विहार रोगाला निमंत्रण देत असते. कधी कधी अयोग्य वर्षानुवर्षे चालत आलेली सवय रोगाचे कोणते रूप धारण करेल सांगता येत नाही. एखाद्या रुग्णामध्ये निर्व्यसनी असूनसुद्धा अवेळी जेवणे, मलमूत्राचा वेग आला असता न जाणे, धारण करून राहणे अशी कारणे जर वारंवार व रोज घडत असेल, तर ती दुर्लक्षून चालणार नाही. ही कारणे अगदी किरकोळ वाटली तरी, प्रौढ वयात आतड्याच्या कर्करोगासारखा रोग उत्पन्न करू शकतात. म्हणूनच आधुनिक बदलत्या फास्ट लाइफचा मोह सोडून उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या दिनचर्या व ऋतुचर्येचा अवलंब करा.
पूर्वीपेक्षा आता कॅन्सरने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. त्यातही थोडीशी जागरुकता ठेवली तर हे प्रमाण अजूनही आटोक्यात येऊ शकते. आता कर्करोगाचे निदान होण्याला विविध चाचण्यांची मदत मिळते. या चपासण्यांद्वारा प्राथमिक अवस्थेत निदान झाले तर अर्बुदाचे (गाठ) निर्हरण शस्त्रकर्माद्वारे (ऑपरेशन) करून योग्य ती उपचारपद्धती अवलंबिल्यास कर्करोगाचा प्रसार थांबवता येतो व रुग्ण एक चांगले आयुष्य जगू शकतो.
आतड्याच्या कर्करोगाची कारणे –
* अतिप्रमाणात मद्यपान व तंबाखुसेवन हे आतड्यांच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
* आहाराचा व आतड्याच्या कर्करोगाचा जवळचा संबंध आहे. चरबीयुक्त व कॅलरीयुक्त आहाराचे अति मात्रेत सेवन, अधिक प्रमाणात उष्ण, तीक्ष्ण, विदारी पदार्थांचे सेवन उदा. मिरची, भेळ, रगडापॅटीस, पावभाजी इ. फळे, पालेभाज्या यांचे कमी प्रमाणात सेवन. तंतुमय पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन.
* योग्य वेळी भोजन न घेणे.
* अजीर्ण झाले असता पुन्हा भोजन घेणे.
* अधिक मात्रेत आहार सेवन.
* मल-मूत्र आदी अधारणीय वेगांचे धारण करणे.
* पूर्वी झालेले आतड्यांचे विशिष्ट आजार. उदा. ग्रहणी, प्रवाहिका, अल्सरेटीव्ह कोलायटीस (अल्सर किंवा दाह).
* आनुवंशिकता.
काही कुटुंबामध्ये हा कॅन्सर अधिक प्रमाणात आढळतो कारण जनुकीय वारसा, इतर कौटुंबिक वातावरण व खाण्यापिण्याच्या सवयी. चिकन, मटण, चरबीयुक्त खाद्य खाणार्‍यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
वरील कारणे वारंवार घडत राहिल्यास पुरीषवहस्रोतसाची दुष्टी होते. याचे अधिष्ठान बृहदांत्र असल्याने, तिथे वातप्रकोप होऊन हळूहळू ग्रंथीची उत्पत्ती होते. निःसृज मांसांकूर ही बृहदात्रामध्ये आढळणारी ही जवळजवळ एकमेव ग्रंथी आहे. संख्येने या अनेक असून त्याचा वर्ण काळसर लाल असतो. ग्रंथीच्या आरंभी देठाप्रमाणे भाग असतो. लक्षणांमध्ये काही वेळा अतिसार व नवीनपणा सापडतो.
आतड्याच्या कोशामध्ये ही गाठ तयार होते. याचे चार प्रकार पडतात. वलयाकृती-नलिकाकृती-व्रणाकृती व कॉलीफ्लॉवरसदृश.मांसांकुराचे चवथ्या प्रकारात रुपांतर होते. गाठीची वाढ सावकाश होते. त्यामुळे प्रसार होण्यापूर्वी निदान झाल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो.
प्रसार –
स्थानिक प्रसार – आतड्याच्या भिंतीतून जवळच्या भागामध्ये.
लसिका प्रसार – आतड्यांशी संबंधित पेशीच्या ग्रंथीमध्ये प्रसार होतो.
आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे –
– रुग्णाचे वय बहुदा ५० च्या वर असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण अधिक असते. आतड्याच्या कोणत्या भागात गाठ असेल त्यानुसार लक्षणे वेगवेगळी असतात.
– या ठिकाणी आतड्याचा भाग संकुचित होतो व तेथील मलाचे स्वरूप घन असते. त्यामुळे २५ टक्के रुग्णांमध्ये आंत्रावरोध उत्पन्न होतो.
– वेदना (कोलिक पेन) असते.
– अनियमित मलवेग – नियमित मलप्रवृत्ती असणार्‍या रुग्णांमध्ये अचानक अनियमितता हे लक्षण सुरू होणे ही गोष्ट या गाठीचे सूचक लक्षण असू शकते.
– मलप्रवृत्तीत रक्त पडणे.
– मलविबंध किंवा द्रवमलप्रवृत्ती (लूज मोशन).
– उलट्या होणे.
– वजन कमी होणे
– दौर्बल्य, पाण्डूरोग
– पोट दुखणे, जड वाटणे, सूज जाणवणे.
प्रथमावस्थेत ही व्याधी लक्षणविरहित असू शकते. पण जसजसा प्रसार व्हायला लागतो तसतशी लक्षणे दिसू लागतात. याचा प्रकार बहुतेकवेळा यकृतामध्ये होण्याची शक्यता जास्त असते.
परीक्षण – एक्स-रे, कोलोनोस्कोपी, बेरिअम एनिमासह याचे निदान करता येते.
चिकित्सा व उपचार –
कर्करोगाची अवस्था, रुग्णाचे वय, बल इत्यादीवरून चिकित्सा ठरवावी लागते. गाठीचे शस्त्रक्रियेद्वारे निर्हरण (काढून टाकणे) करणे ही प्रमुख चिकित्सा होय. किमोथेरपी व रेडिओथेरपी सुद्धा द्यावी लागते.
शस्त्रकर्म – पूर्वकर्म ः आंत्रावरोधासारखी गंभीर लक्षणे नसल्यास रक्तपूरण करून पांडू या लक्षणाची चिकित्सा करावी. निरुहबस्ती देऊन गुदमार्ग स्वच्छ ठेवावा. मलभाग कमी उत्पन्न होईल असा आहार द्यावा. आंत्रावरोध असल्यास अवरोधाच्या पूर्वभागी छोटे शस्त्रकर्म करून आतड्यातील मलभाग काढून टाकावा.
प्रधानकर्म ः पोटाची स्पर्शपरीक्षा करून गाठी निर्हरणयोग्य आहे की नाही ते पाहणे. यकृताची स्पर्शपरीक्षा करून तेथे गाठीचा प्रसार झाला आहे का हे पहावे. तसेच कटिप्रदेशातील आंत्रावरणावर प्रसार आहे काय ते पहावे. उदरातील लसिकाग्रंथींमध्ये प्रसार झाल्यास लसिकाग्रंथीसुद्धा काढून टाकाव्यात.
पश्‍चात् कर्म ः गुदमार्गे अपान निस्सरण सुरू होईपर्यंत मुखावाटे काहीही देऊ नये. कृमी उपसर्ग होऊ नये म्हणून योग्य चिकित्सा द्यावी.
किमोथेरपी व रेडिओथेरपीने कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचे कार्य करता येते. योग्य वेळी निदान झाल्यास या कर्करोगाचा प्रसार थांबवता येतो.
पथ्यापथ्य –
आहारद्रव्यांपैकी दूध, ताक, मध, लोणी, मूग, गायीचे बिनसाईचे दही, साळीच्या लाह्या विशेष पथ्यकर.
द्रवाहार, फळे, फळांचा रस, भाज्या व कडधान्यांचा वापर करणे.
चरबीयुक्त, उष्ण, तीक्ष्ण आहार वर्ज्य करणे.
व्यायाम व वजनावर नियंत्रण ठेवणे, मद्यपान व तंबाखूसेवन यांसारख्या व्यसनांपासून परावृत्त होणे.
चिकित्सेमध्ये अग्नीदीपन करणार्‍या औषधांचा उपयोग व शस्त्रकर्म व किमोथेरपी व रेडिओथेरपीनंतर रसायन द्रव्यांचा उपयोग करणे.
प्रतिबंधक उपाय –
– दिनचर्या पालन
– ऋतुचर्या पालन
– ऋतू व अवस्थासापेक्ष आयुर्वेदोक्त पंचकर्म चिकित्सा
– आहारविधी नियमांचे पालन.