ब्रेकिंग न्यूज़

आणखी १५ दिवस पणजीतील कचरा साळगावात स्वीकारणार

>> तात्पुरता तोडगा : लोबो

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील ओला कचरा विल्हेवाटीवर तात्पुरता तोडगा काल काढण्यात आला आहे. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणखीन १५ दिवस पणजीतील ओला कचरा स्वीकारण्यात येईल, अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
पणजी महानगरपालिका क्षेत्रातील ओला कचरा साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात न स्वीकारल्यास उत्तर गोव्यातील किनारी भागातील मैलावाहू टँकर रोखण्याचा इशारा महापौर उदय मडकईकर यांनी सोमवारी दिला होता.

बायंगिणी, ओल्ड गोवा येथे कचरा प्रक्रिया उभारणीसाठी सार्वजनिक सुनावणी १७ जुलै रोजी घेतली जाणार आहे, असेही लोबो यांनी सांगितले. बायंगिणी येथे २०० टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्याची योजना आहे. तिसवाडी तालुक्यातील पाच मतदारसंघांतील कचर्‍यावर या ठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे. येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या कामाला पर्यावरण दाखला मिळाल्यानंतर गती मिळणार आहे, असेही उपसभापती लोबो यांनी सांगितले.