ब्रेकिंग न्यूज़

आणखी फुटीर आमदार भाजपात नको

>> सांतआंद्रेचे भाजप कार्यकर्ते आक्रमक

दुसर्‍या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर सांतआंद्रे मतदारसंघातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून काल रामराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांची भाजप कार्यालयात जाऊन भेट घेऊन सांतआंद्रे मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी केली. यावेळी सांतआंद्रेतील भाजप कार्यकर्त्यांनी फ्रान्सिस सिल्वेरा यांना पक्षात घेतले जाणार नाही, अशी ग्वाही देण्यास भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांना भाग पाडले.
रामराव वाघ यांनी यावेळी विनय तेंडुलकर यांना फ्रान्सिस सिल्वेरा हे सांतआंद्रे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना फोन करून आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगू लागले असून भाजपने त्यांना तसे आश्‍वासन दिले आहे काय, असा प्रश्‍न केला. तसे असेल तर पक्षाने त्याबाबत फेरविचार करावा, अशी विनंती त्यांनी तेंडुलकर यांना केली.

नंतर पत्रकारांशी बोलताना रामराव वाघ म्हणाले की, सांतआंद्रे मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे भाजप कार्यकर्त्यांना फोन करून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांना सांगू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आम्ही प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबत विचारले. मात्र, त्यांनी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले असल्याचे वाघ म्हणाले.

सांतआंद्रे मतदारसंघात भाजपचे काम चांगल्या प्रकारे चालू असून पक्षाच्या कार्यकर्त्यांची फळीही मजबूत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाच्या आमदाराला भाजपमध्ये प्रवेश देण्याची कोणतीही गरज नसल्याचे वाघ यांनी नमूद केले.
दरम्यान, पत्रकारांनी यासंबंधी विनय तेंडुलकर यांना छेडले असता ते म्हणाले की, सरकारला २३ आमदारांचा पाठिंबा असून सरकार स्थिर आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याची आम्हांला गरज नाही.