आणखी दोघे कोरोनामुक्त

>> एक नवीन बाधित, रुग्णसंख्या २७

राज्यात कोरोना विषाणू बाधित नवीन १ रुग्ण आढळून आला आहे. तर, २ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने बाधित रुग्णांची संख्या २७ झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

महाराष्ट्रातून आलेल्या एक प्रवाशाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीमध्ये आढळून आले. त्याला मडगाव इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ झाली आहे. त्यातील ४४ रुग्ण बरे झाले आहेत. दाबोळी येथे विमानातून ११६ प्रवासी काल दाखल झाले आहेत. आंतरराज्य प्रवास केलेल्या दोन प्रवाशांना होम क्वारंटाईऩ करण्यात आले आहे. तर, १० प्रवाशांना सरकारी क्वारंटाईनखाली आणण्यात आले आहे. सरकारी क्वारंटाईऩखालील प्रवाशांची संख्या २९२ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

आज दोन विमाने येणार
दाबोळी विमानतळावर सोमवारी दुबई आणि इटली येथून गोमंतकीय नागरिकांना घेऊन दोन खास विमाने दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महसूल सचिव संजय कुमार यांनी दिली. विदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोव्यात येणार्‍या दोन विमानाबाबत सविस्तर माहिती मिळविली जात आहे.