ब्रेकिंग न्यूज़

आणखी कॉंग्रेस आमदारांना भाजपात न घेण्याचा निर्णय

>> विनय तेंडुलकर ः तीन कॉंग्रेस आमदार अजून संपर्कात

पणजी, म्हापसा, मांद्रे व शिरोडा या चार मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपचा विजय झाल्याने राज्यातील भाजप नेतृत्वाखालील आघाडी सरकार बळकट झालेले आहे. त्यामुळे विरोधी कॉंग्रेस पक्षातील काही आमदार भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असले तरी त्यांना पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल सांगितले.
म्हापसा, मांद्रे व शिरोडा मतदारसंघांतून आमचे उमेदवार विजयी झाल्याने आता आमच्या आमदारांची संख्या १७ वर गेली आहे. आघाडी सरकारातील ‘गोवा फॉरवर्ड’ या पक्षाचे ३ आमदार आहेत. त्याशिवाय ३ अपक्षांसाठी आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आमचे संख्याबळ २३ वर गेले आहे. आम्हाला आणखी आमदारांची गरज नाही. कॉंग्रेस पक्षातील दोन-तीन आमदार अजून आमच्या संपर्कात आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, आमच्याकडे आता आवश्यक तेवढे संख्याबळ असल्याने आम्ही विरोधी पक्षातील आणखी आमदारांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय घेतला आहे, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.