आढावा बैठकीत मंत्री डावलतात

>> विरोधी पक्षाच्या आमदारांच्या तक्रारी

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध तालुक्यांतील स्थितीची पाहणी करून सरकारला अहवाल देण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे ते मंत्री घेत असलेल्या बैठकांना आम्हांला आमंत्रित केले जात नाही, अशा विरोधी पक्षांच्या आमदारांच्या तक्रारी आहेत.

ज्या ज्या मंत्र्यांना ज्या ज्या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, ते मंत्री तालुक्यातील अधिकार्‍यांबरोबर बैठका घेऊ लागलेले असून आम्हांला मात्र या बैठकांना बोलावले जात नाही, असा आरोप विरोधी आमदारांनी केला आहे. तालुक्यातील सत्ताधारी आमदारांना या बैठकांना आमंत्रण असते. मात्र, विरोधी आमदारांना बोलावले जात नसल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ज्या ‘प्लॅन बी’ ची घोषणा केली आहे त्या गूढ अशा प्लॅनसंबंधी या बैठकांतून चर्चा होत आहे की काय, आणि विरोधी आमदारांना हा ‘प्लॅन बी’ काय आहे ते कळू नये, यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येत नाही? असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी नुकतीच दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांबरोबर त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. आपल्या फातोर्डा मतदारसंघात झालेल्या या बैठकीला आपणाला आमंत्रण न देता डावलण्यात आले. हे योग्य नसून हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याचे सरदेसाई म्हणाले.

खंवटे यांचीही तक्रार
दरम्यान, अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनीही यासंबंधी तक्रार करताना विरोधी आमदारांना बैठकांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप केला. आपला अजेंडा पुढे नेता यावा यासाठी अशा महामारीच्या काळातही विरोधकांना डावलण्याचे राजकारण खेळले जावे हे अशोभनीय असल्याचे खंवटे म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा
दरम्यान, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सदर आरोपांचे खंडन केले असून त्या त्या तालुक्यातील नेमकी स्थिती संबंधीत अधिकार्‍यांकडून समजून घेण्यासाठी या बैठकांचे आयोजन केले जात असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री व आमदार यांची भेट होतच असते व त्यावेळी आमदारांकडून आवश्यक ती माहिती मुख्यमंत्र्यांना मिळतच असते, असा खुलासाही कवळेकर यांनी केला.