ब्रेकिंग न्यूज़

आठव स्वराधीशाचा…

श्रीधर ङ्गडके (प्रसिद्ध संगीतकार)

 

प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, कडवी सावरकरनिष्ठा आदी गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे आमचे अण्णा… त्यांचं पितृप्रेम मी भरभरून अनुभवलं. त्यांच्या शिस्तीमुळे माझ्या कामाला वेगळी ओळख मिळाली. आई आणि अण्णांकडून मिळालेल्या संगीताच्या बाळकडूमुळे माझ्या आयुष्यालाही सुरांचं अधिष्ठान लाभलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभाच्या निमित्ताने…

प्रत्येकाच्या आयुष्यात माता-पित्याचं वेगळं स्थान असतं. बाबूजी म्हणजे आमचे अण्णा आणि त्यांना समर्थपणे साथ देणारी माझी आई, यांचं माझ्या आयुष्यातील स्थानही असंच महत्त्वपूर्ण आहे. या दोघांच्या आठवणी मला त्या मंतरलेल्या काळात घेऊन जातात. माझी आई म्हणजे पूर्वाश्रमीची ललिता देऊळकर. माझे आजी-आजोबा खारला राहात असत. आईच्या घरी संगीताचं थोडंङ्गार वातावरण होतं. तिचे काका चांगलं गायचे. त्यामुळे आईलाही गाण्याची आवड होती. त्यांच्या शेजारच्या घरी श्री. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं जाणं-येणं होतं. त्यांनी तिचं गाणं ऐकलं आणि त्यांना मनापासून आवडलं. म्हणूनच त्यांनी आजोबांना ‘ती चित्रपटात गाऊ शकेल का?’ असं विचारलं आणि त्यांच्यामार्ङ्गतच तिच्या चित्रपटातील पार्श्‍वगायनाच्या प्रवासाचा प्रारंभ झाला.

आईच्या घरची स्थिती उत्तम होती असं नाही. घराला हातभार लागावा म्हणून ती शक्य ते सर्व करत होती. लग्नाआधी तिने अनेक हिंदी चित्रपटांत, विविध नामांकित संगीत दिग्दर्शकांकडे पार्श्‍वगायनाचं काम केलं होतं. मुख्यत: हिंदीत सी. रामचंद्र यांच्याकडे ती जास्त गायली. शिवाय गुलाम हैदर, शंकरराव कुलकर्णी, सचिनदेव बर्मन यांच्याकडेदेखील ती गायली. ‘रुक्मिणी स्वयंवर’ या हिंदी आणि मराठी चित्रपटासाठी सुधीर ङ्गडके यांच्याकडे प्रथम ती गायली. या निमित्ताने त्यांच्या भेटी होऊ लागल्या. एक दिवस माझ्या काकांनी आजीला म्हणजेच आईच्या आईला बाबूजी आणि ललिता यांचं लग्न जमू शकेल का? असं विचारलं आणि तिने होकार दिल्यानंतर ते दोघेे विवाहबद्ध झाले.

लग्नानंतर आई शास्त्रीय संगीत शिकू लागली. श्री. दत्तोबा तावडे यांच्याकडे तिचं शिक्षण सुरू झालं. ते ङ्गार चांगले गायक होते. गिरगावात राहायचे. आईला गाणं शिकवण्यासाठी ते आमच्या घरी यायचे. त्यामुळे तिची शास्त्रीय संगीताची तयारी अत्यंत चांगल्या प्रकारे झाली होती. तिचा रियाजही खूप चांगला होता. पण सायनसचा त्रास सुरू झाल्यामुळे मधूनमधून तिच्या गायनात खंड पडायचा. दत्तोबा तावडेंनंतर ती काही दिवस हार्मोनिअम वादक आणि उत्तम गायक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पुरुषोत्तम वालावलकर त्यांच्याकडे गाणं शिकली.

अण्णा आणि आईच्या लग्नात प्रख्यात गायक महंमद रङ्गी यांनी मंगलाष्टकं म्हटली होती याचं खरंच कौतुक वाटतं. मध्यंतरी गोव्याला गेलो असता मी भालजी पेंढारकरांची कन्या आणि प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांना भेटलो होतो. त्या माझ्या आईला ‘ललीताई’ म्हणून साद घालत. कारण भालजी माझ्या आईला मुलगी मानायचे. माधवीमावशी म्हणाल्या, ‘‘आम्ही सर्वजण सुधीरभावोजी आणि ललीताईच्या लग्नासाठी पुण्याला आलो होतो.’’ रङ्गीसाहेब लग्नाला आले याचं सर्वांना अप्रूप वाटलं. ‘‘रङ्गीसाहेबांनी हिंदीत मंगलाष्टकं लिहून आणली होती. त्यातील ‘ललिता और सुधीर की जोडी जैसे चांद चकोर’ अशा अर्थाची एक ओळ मला आठवते,’’ असं त्यांनी सांगितलं.

माझ्या आईचा आवाज मुळातच गोड होता. त्यातून तिनं शास्त्रीय संगीताचं योग्य शिक्षण घेऊन आणि नियमित रियाज करून गळा गाता ठेवला होता. अण्णांनी संगीत दिलेल्या आणि आईनं गायलेल्या काही गाण्यांबद्दल मला मुद्दाम सांगावसं वाटतं. १९५० मधील ‘वंशाचा दिवा’ या चित्रपटातील ‘रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या’ आणि ‘पावनं येव्हढं ऐकाजी’ ही पं. वसंतराव देशपांडेसह गायलेली दोन्ही गाणी चालीच्या दृष्टीनं सरस होतीच, पण आईनंही ती भलत्याच ठसक्यात म्हटली होती. त्यावेळच्या तरुणवर्गात ‘रंगू बाजाराला जाते’ हे गाणं ङ्गारच लोकप्रिय होतं. आईच्या शास्त्रीय गायनाला वाव मिळाला तो १९६१ च्या ‘सुवासिनी’ या चित्रपटात. यात अण्णांच्या खास आग्रहाखातर पं. भीमसेन जोशी यांच्यासह तोडी रागातली ‘आज मोरे मन लागो लंगरवा’ ही चीज तानांसह तिनं गायली आहे. ते गाणं ङ्गार सुंदर आहे. मुख्य म्हणजे पंडितजींच्या बरोबर गायला मिळालं याला जास्त महत्त्व. आईने त्या चीजेमध्ये ङ्गार सुंदर ताना घेतल्या आहेत. तिने ‘सुवासिनी’मध्ये आणखी एक गाणं गायलं आहे ते म्हणजे ‘मी तर प्रेमदिवाणी.’ अण्णांनी हे गाणं दोन वेगळ्या चालीत बांधलं आहे. एक आशा भोसले यांनी म्हटलं जे भजनी ठेक्यात आहे तर दुसरी चाल ठुमरी ढंगाची आहे, ती आईने गायली आहे. ‘चिमण्यांची शाळा’मधलं ‘तिन्हीसांज होते तुझी याद येते| नयन बाहुल्यांची जोडी आसवात न्हाते,’ हे गाणं आईने ङ्गार छान म्हटलं आहे. असं सगळं असलं तरी आईनं एक गोष्ट ठरवली होती, ती म्हणजे, लग्नानंतर जास्त गाणार नाही. लग्नाआधी खूप कष्ट घेतले असल्याने आपण सिनेमात गावं असं नंतर तिला कधीच वाटलं नाही. त्यापेक्षा संसार उत्तम करणं तिला जास्त योग्य वाटलं. माझ्या अभ्यासाकडेे आईच लक्ष द्यायची. अण्णा कामात व्यस्त असल्याने जास्त वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे आईच माझा अभ्यास घ्यायची. लहानपणी मी तिच्या हातचे ङ्गटकेही खाल्ले आहेत. पण तेच माझ्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे होते.

पुढे मी चाली बांधायला लागलो तेव्हा वडील एवढे मोठे, त्यांचं कार्य एवढं मोठं, या सगळ्याचा दबदबा आणि मनावर मोठं दडपण असायचं. माझे अण्णा प्रेमळ पण कडक शिस्तीचे… त्यामुळे थोडी भीतीही वाटायची. चाल बांधल्यावर त्यांना सांगताना दडपण यायचं. ‘अण्णा, मी चाल बांधलीय’ हे सांगताना ते जाणवायचं. ते काय म्हणतील असं वाटत राहायचं. पण ‘छान, ऐकव…’ असं ते म्हणायचे आणि आधार द्यायचे. पुष्कळदा मी ती चाल आधी आईला ऐकवत असे. ती कसं वाटतीये हे मी तिच्या डोळ्यात बघायचो. काम चांगलं आहे की नाही हे तिच्या डोळ्यात कळायचं. चांगलं नाही असं जाणवलं की बदल केला पाहिजे, हे जाणवायचं. अण्णाही छान प्रोत्साहन द्यायचे. संगीत दिग्दर्शन, गायन, सामाजिक विषयातलं भान आणि कळकळ; देशाविषयी अपार प्रेम, प्रामाणिकपणा या सर्व बाबतीत अण्णा एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. संगीत रचनेबद्दल सांगायचं तर त्यांच्या चाली प्रथम खूप सोप्या वाटतात पण म्हणायला गेलो की किती अवघड आहेत ते कळतं. शब्दोच्चार, स्वरांवरचा ठेहराव आणि गाण्यातली भावना ते इतक्या उत्तम पद्धतीने सादर करायचे, की गीत डोळ्यासमोर उभं राहायचं. दोन कडव्यातले म्युझिक पीसेसदेखील गाण्याला पोषक असावेत असा त्यांचा कटाक्ष असे. एक प्रसंग आठवतो. अण्णांनी ३०-३५ वर्षांपूवी एक चाल बांधली होती. नंतर बर्‍याच काळानंतर ते गाणं चित्रपटात आलं. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, ‘म्युझिक पीसेस मी तयार करतो.’ ते म्हणाले, ‘‘ठीक आहे.’’ नंतर मी, राजन साठे आणि अप्पा वढावकर यांनी तयार केलेले म्युझिक पीसेस त्यांनी ऐकले आणि म्हणाले, ‘‘चांगले आहेत. पण यात गाणं कुठंय? म्युझिक पीस म्हणजे मुखडा आणि कडव्यांना जोडणारा सेतू असतो. त्यामुळेच गाणं खुलतं.’’ त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे लक्षात घेऊन मग ते पीसेस बदलले, तेव्हा कुठे ते त्यांच्या पसंतीस पडले. माझ्या दृष्टीने हा एक वास्तुपाठ होता.
आई आणि अण्णांच्या गाण्यामुळे माझ्यावर संगीताचे संस्कार झाले. घरी नेहमी गाण्याचं काम चालत असल्यामुळेे अतिशय उत्तम संगीत कानावर पडत गेलं. अण्णांमुळेच मला ‘लक्ष्मीची पाऊले’ हा चित्रपट मिळाला. त्याचे दिग्दर्शक श्री. जी. जी. भोसले अण्णांकडे आले होते. त्यांची बोलणी झाली आणि अण्णांनी संगीत दिग्दर्शन करायला मान्यता दिली. त्याचवेळी मी सुधीर मोघे यांनी दिलेल्या ‘ङ्गिटे अंधाराचे जाळे’ या कवितेला चाल लावत होतो. त्याचा सिनेमाशी काही संबंध नव्हता. भोसलेसाहेबांनी ते गाणे ऐकलं आणि अण्णांना म्हणाले, ‘‘हे गाणं आपल्या चित्रपटात घेता येईल का?’’ अण्णा म्हणाले, ‘‘ते कसं शक्य आहे? त्याची चाल श्रीधरची आहे. तुम्ही श्रीधरकडेच हे काम द्या.’’ अशा प्रकारे अण्णांमुळे मला तो चित्रपट मिळाला. तो माझा पहिला चित्रपट आणि अण्णाही त्यात गायले. पहिलाच चित्रपट असल्यामुळेे चित्रपटातलं गाणं कसं असायला पाहिजे यासंबंधीच्या काही चांगल्या टिप्स अण्णांनी दिल्या. त्यावेळी ऍरेंजर कोण घ्यावा हे कळत नव्हतं. अण्णांकडे श्री. शामराव कांबळे, श्री. प्रभाकर जोग असत. परंतु श्री. शामराव कांबळे हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे व्यस्त असायचे म्हणून अण्णांनी श्री. बाळ पार्टे यांना बोलावलं. बाळ पार्टे ङ्गार मोठे ऍरेंजर. या चित्रपटातील गाण्यांच्या यशामध्ये पार्टेसाहेबांचा मोठा हात आहे. माझा पहिला चित्रपट असल्यामुळे श्रीमती आशा भोसले यांनी स्वत: त्यामध्ये गाणी म्हटली. ‘ऋतू हिरवा’ या कॅसेटचं प्रकाशन अण्णांच्या हस्ते झालं. नंतर काही दिवसांनी बोलताना ते म्हणाले, ‘‘तुझ्या चाली छान असतात. पण तू त्या कठीण का करतोस? ठराविक गायकच तुझी गाणी म्हणतील. तुझी गाणी सगळ्यांना म्हणता आली पाहिजेत.’’ आपली दोन गाणी त्यांनी म्हणावीत अशी माझी इच्छा होती. एक गाणं म्हणजे श्री. सुधीर मोघे यांचे ‘मन मनास उमगत नाही’ आणि दुसरं म्हणजे श्री. ना. धों. महानोर यांंचं ‘अवेळीच केव्हा दाटला अंधार.’ ही दोन्ही गाणी मी म्हणतो, असे ते म्हणालेही होते. पण ते झालंच नाही याची खंत कायम मनात आहे.