आज कसोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मोठ्या कसोटीचा क्षण जवळ येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे आणि या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची भिस्त मुख्यत्वे मोदी सरकारची कामगिरी आणि स्वतः मोदी यांची प्रतिमा या दोन गोष्टींवर असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र तर मोदींनी पिंजून काढला. दहा दिवसांत त्यांच्या सत्तावीस सभा कानाकोपर्‍यात झाल्या. त्याच्या पाठबळावरच जेथे पक्षाची संघटनात्मक ताकदही नाही, अशा किमान दीडशे मतदारसंघांमध्ये भाजपाने पहिल्यांदाच आपले उमेदवार उभा केलेले आहेत आणि विविध मतदानपूर्व पाहण्या छातीठोकपणे सांगत आहेत, त्याप्रमाणे भाजप खरोखरच या विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवणार का हे आता पाहावे लागेल. भाजपाची या निवडणुकीतील कामगिरी खरोखरच या निवडणूकपूर्व पाहण्या दाखवत आहेत, त्याप्रमाणे चमकदार होऊ शकली, तर महाराष्ट्रातील आजवरची राजकीय समिकरणे उलटीपालटी होऊन जातील आणि विविध पक्षांचे बालेकिल्लेही नेस्तनाबूत होऊ शकतील. पण पक्षाचे संघटनात्मक बळ नसताना एवढे निर्विवाद यश मिळवणे निश्‍चितपणे आव्हानात्मक आहे. त्यात या निवडणुकीत महाराष्ट्रात अक्षरशः पैशाचा पाऊस पडताना दिसतो आहे. नोटांच्या थप्प्यांमागून थप्प्या सापडत आहेत. प्रचारामध्येही शिवराळ पातळी अनेकदा गाठली गेली आहे. या परिस्थितीत मतदारराजा कोणाला कौल देणार आणि चौरंगी, पंचरंगी निवडणुकांमुळे निकालाचे पारडे कस-कसे फिरणार याबाबत ठोसपणे काही सांगणे तसे धाडसाचेच ठरेल. शिवसेना राज्यात आपण भाजपाचे मोठे बंधू असल्याच्या थाटात आजवर वावरत आली. पण ती बाळासाहेबांची शिवसेना. सध्याची शिवसेना उद्धव यांची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत असो, अगर लोकसभा निवडणुकीत असो, भाजपाचे यश सेनेवर कुरघोडी करणारे ठरले आहे. त्या बळावरच तर त्यांनी सेनेकडे वाढीव जागा मागितल्या. शिवसेनेचा मतदार आपल्याकडे खेचून घेण्याची शर्थ भाजप यावेळी करील यात शंका नाही. त्यासाठी शिवछत्रपतींनाही वेठीस धरले गेले आहे. शिवसेनेच्या जाहिरातींमध्येही वेडात मराठी ‘साथ’ दौडविण्याची हाक देण्यात आली आहे. या धुमश्चक्रीतून कोण पुढे जाते ते येत्या १९ ला दिसेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. विशेषतः कॉंग्रेससाठी तर ही अस्तित्वाची लढाई आहे. एकेक राज्य हातून निसटत चालले असताना पोटनिवडणुकांमधून पक्षाला थोडाफार दिलासा मिळाला, परंतु आजच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा खरा कस लागेल. राष्ट्रवादीची भूमिका यावेळी संधिसाधूपणाची दिसते. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. राज ठाकरेंची मनसे यावेळी आपले उपद्रवमूल्य कितपत दाखवू शकेल, याबाबत शंका आहे. शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना भाजप किती खिंडार पाडू शकते हे यावेळी प्रथमच दिसून येणार असल्याने भाजपच्या महाराष्ट्रातील भविष्यातील वाटचालीची दिशा त्यातून स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या पारंपरिक शक्तिस्थानांमध्ये जर भाजपा मुसंडी मारू शकली, तर सेनेच्या र्‍हासपर्वाची ती सुरूवात ठरू शकते. अर्थात, भाजपा तळागाळातल्या वर्गात सेनेइतका झिरपला आहे का याचीही चाचपणी या निवडणुकीत होऊन जाईल. भाजपा हा या निवडणुकीत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरणार असल्याचे सगळ्या पाहण्यांचे अंदाज आहेत. स्पष्ट बहुमताचा दावा मात्र कोणी केलेला नाही. त्यामुळे सेना भाजप निकालानंतर एकत्र येऊ शकतात, पण त्यात सेनेची भूमिकाच निर्णायक असेल, कारण मोदींनी सेनेवर टीका टाळली असली, तरी उद्धव यांनी त्यांना फटकार लगावायला कमी केलेले नाही. भाजपाचे सरकार येणार असेल तर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वांत पुढे असेल. सेनेची मदत घ्यावी लागली, तर पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न डोके वर काढील. राष्ट्रवादीचे चाणक्य निकालानंतर आपले डावपेच खेळल्यावाचून राहणार नाहीत, परंतु त्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीसारखे त्यांचे पानीपत होऊन चालणार नाही. कॉंग्रेसचे अस्तित्व निकाली निघणार आहे का हेही पाहावे लागेल. एकंदरीत रणधुमाळी मोठी मौजेची आहे.

Leave a Reply