आजपासून रेस्टॉरंट, मॉल्स सुरू

>> बार, स्पा, मसाज पार्लर, जलपर्यटन, मनोरंजन पार्क, कॅसिनो बंद

केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार राज्यातील दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी १४४ कलमांमध्ये थोडी शिथिलता दिल्याने आज दि. ८ जूनपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, धार्मिक स्थळे सुरू केली जाणार आहेत.

या संबंधीचा आदेश उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी काल जारी केला आहे. नवीन नियमावलीनुसार, रात्री ९ ते सकाळी ५ यावेळेत नागरिकांना फिरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकानेसुध्दा वरील वेळात बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

राज्यातील दारूची (बार) दुकाने, कॅसिनो, जलपर्यटन, स्पा, मसाज पार्लर, मनोरंजन पार्क, विद्यालय, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, सामाजिक सभागृहे, सिनेमागृहे, थिएटर, स्वीमिंग पूल, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम, मल्टीप्लेक्स यांना बंदी घालण्यात आलेली आहे.

राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, पान, गुटखा विक्री व खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. राज्यातील हॉटेल सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याकडून आवश्यक अर्जांचे वितरण केले जात आहे. हॉटेल सुरू करण्यासाठी विविध अटी घातल्या जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेल सुरू करण्यासाठी परवाना दिला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली.