आजपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

आजपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज दि. १५ जुलैपासून सुरू होत असून ते ९ ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवरच विरोधी कॉंग्रेस पक्षातील १५ आमदारांपैकी १० आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन करून तो सत्ताधारी भाजप पक्षात विलीन केल्याने विरोधी कॉंग्रेस पक्षाची स्थिती दयनीय झालेली आहे. ह्या फुटीचे पडसाद या अधिवेशनात उमटणार आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर असलेले चंद्रकांत कवळेकर यानी त्यांच्यासह दहा कॉंग्रेसी आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता कॉंग्रेसला आपल्या विधीमंडळ नेत्याची निवड करावी लागणार आहे.

दरम्यान, काल यासंबंधी कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना विचारले असता आमचा नेता कोण हे अजून ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना विचारले असता त्यानीही अजून आमचा नेता ठरलेला नाही. आज रविवार असून मी आराम करीत आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिगंबर कामत यांना विचारले असता ते म्हणाले की, शनिवारी चेल्लाकुमार यानी आमच्या पाचही जणांची भेट घेऊन चर्चा केली. पण नेता अजून ठरला नसल्याचे ते म्हणाले.

विरोधी नेता आज जाहीर होणे शक्य
मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेस विधीमंडळ गटातर्फे आपल्या नेत्याची निवड आज दि. १५ रोजीही जाहीर केली जाऊ शकते. सभापती राजेश पाटणेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी कॉंगे्रस दावा करू शकतो असे याआधीच स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसजवळ तेवढ्या संख्येने आमदार असल्याचे त्यानी म्हटले आहे. दहा आमदार सोडून गेल्यानंतर कॉंग्रेसमध्ये आता प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत या चार माजी मुख्यमंत्र्यांसह आतापर्यंत विधानसभेत प्रभावी कामगिरी करणारे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स असे पाच आमदार आहेत.

गोवा फॉरवर्ड पुन्हा एकदा विरोधी बाकांवर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई, जयेश साळगावकर व विनोद पालयेकर या तिन्ही आमदारांना मंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर त्यांनी विरोधकांची भूमिका बजावणार असल्याचे जाहीर सभेत घोषित केले आहे.
त्यामुळे २०१७च्या निवडणुकीनंतर भाजपप्रणित सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विरोधी बाकांवर बसणार आहेत.

तीन मतदारसंघांच्या
प्रश्‍नांबाबत ‘प्रश्‍नचिन्ह’
ताज्या नाट्यमय व धक्कादायक राजकीय घडामोडीनंतर चंद्रकांत कवळेकर, जेनिफर मोन्सेर्रात व फिलीप नेरी रॉड्रिग्स हे कॉंग्रेसचे तीन आमदार भाजपवासी होऊन मंत्री बनल्याने त्यांच्या मतदारसंघांच्या प्रश्‍नांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. हे तिघेही मंत्री बनल्याने केपे, ताळगाव व वेळ्ळी या मतदारसंघांचे प्रश्‍न त्यांना विचारता येणार नाहीत.