ब्रेकिंग न्यूज़

आचारसंहिता उल्लंघन : मोदींना निवडणूक आयोगाची ‘क्लीन चिट’

भारतीय लष्कराच्या शौर्याच्या नावाने मते मागितल्याच्या आरोपावर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथील जाहीर सभेत केलेल्या भाषणातून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. वर्धा येथील मोदींच्या भाषणाची तपासणी केली असता, त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा आचारसंहितेचा भंग करणारी गोष्ट आढळली नाही, असेही आयोगाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने मोदींच्या भाषणासंदर्भात वरील निर्णय दिला. वर्धा येथे १ एप्रिल रोजी झालेल्या सभेत मोदींनी पुलवामातील शहिदांच्या नावाने मते मागितल्याचा आरोप करून कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. याप्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने आयोगाला नोटीस बजावली होती.