आई उधे ग अंबे उधे !!!!

आई उधे ग अंबे उधे !!!!

  •  दीपा जयंत मिरींगकर

रोज रोज नवे रूप, निर्मितीची पूजा
उत्पती स्थिती लयकारी, नाही भाव दुजा/नाही भाव दुजा

शारदीय नवरात्रीचा हा कालावधी आदिशक्तीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे. देवीच्या मूर्तीचे तेज आणि रोज चढत्या माळा, देवीचे अलंकारांनी सजलेले रुपडे पाहून नास्तिकालासुद्धा भजावे वाटेल.

नवरात्रीतील नऊ रात्री जागर, देवीचा गोंधळ सगळीकडे अगदी भक्तिमय वातावरण असते. मंदिरात भक्तांच्या रांगा लागलेल्या दिसतात. देवीच्या मूर्तीचे तेज आणि रोज चढत्या माळा, देवीचे अलंकारांनी सजलेले रुपडे पाहून नास्तिकालासुद्धा भजावे वाटेल.
शारदीय नवरात्रीचा हा कालावधी आदिशक्तीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे. घरोघरी, देवळात घटाची स्थापना पहिल्या दिवशी केली जाते. या घटात किंवा बाजूला माती व नऊ प्रकारची धान्ये घालतात. एक प्रकारे ही भूमीची किंवा मातीची सुद्धा पूजा मानली जाते. नऊ दिवस हे असे पेरलेले धान्य रुजून आले की ते रुजवण दसर्‍याला प्रसाद म्हणून देतात. आपल्या घरातील समृद्धीचे प्रतीक म्हणजे हे रुजून फुलून आलेले रुजवण. या सार्‍यामध्ये शुचिता सोवळे पणा आणि अखंड तेवता नंदादीप महत्त्वाचा .

अश्विन शुद्ध प्रतिपदा हा घटस्थापनेचा दिवस. त्या दिवसापासून करायची उपासना ती शक्तीची. ही शक्ती उपासना आपण कोणत्या स्वरूपात करू इच्छितो हे आपणच ठरवले पाहिजे. ही शक्ती आंतरिक म्हणजे मनाची, विचारांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवणारी असू शकेल किंवा नैतिक अधिष्ठान असलेली शारीरिक असू शकेल. एकूणच काय स्वत:ची शक्ती वाढवणे महत्त्वाचे. मग ती मनाची असो वा शरीराची. स्त्री ही उपेक्षित नाही हे आपल्या कर्तृत्वाने तिने केव्हाच सिद्ध केले आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठते तेव्हा ती दुर्गा बनते. तिच्यातील स्त्रीत्व म्हणजे न्यूनता नाही तर ती एक शक्ती आहे याची जाणीव ठेवून नवरात्र पूजले तर ती खरी पूजा असेल. महाकाली महादेवी महासरस्वती यांची पूजा म्हणजे उत्पती स्थिती आणि लय यांची जाणीव आणि पूजन. महिषासुरमर्दिनी दुर्गा हिने हे नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि शेवटी त्याचा वध केला. जग भयमुक्त केले म्हणून विजयादशमी साजरी करतात. ही आदिमाया महिषासुराशी लढली तेव्हा तिला सर्व देवांनी आपल्या शक्ती देऊन मदत केली. प्रत्येकाचे अस्त्र शस्त्र जेव्हा मिळाले तेव्हाच तिचे बळ वाढले आणि महिषासुरासारख्या बलाढ्य राक्षसाशी ती लढू शकली.

आज स्त्रीला गरज आहे ती समाजाकडून घरातून अशाच अस्त्र शस्त्र मिळण्याची. आजही अनेक असुर जागोजागी दिसताहेत. त्यांचा सामना ती करते आहे. पण बर्‍याच प्रसंगी अशावेळी दोषी ठरते ती बाई. समाज तिला नाकारतो. तिच्या कोणत्याही चुकीशिवाय जर तिच्यावर अन्याय होत असेल तर समाज त्या गुन्हेगारावर पेटून उठला पाहिजे. फक्त मेणबत्त्या लावून काहीच साध्य होणार नाही. आता खरी गरज आहे ती पुढच्या पिढीला असे संस्कार देण्याची की ज्यातून मुलगा वा मुलगी खर्‍या अर्थाने समान असतील. केवळ शिक्षणाने हे साध्य होत नाही ही एक वस्तुस्थिती आहे. एक माणूस म्हणून तिला योग्य वागणूक असलीच पाहिजे. मुलींनी उगीच सहानुभूतीचीसुद्धा अपेक्षा करू नये. जेव्हा मुली हे समजून घेतील तेव्हा यातून खर्‍या अर्थाची समानता असेल.
एक आई ही मुलासाठी कितीतरी परिश्रम घेते, कष्ट करते. म्हणूनच म्हणतात ‘कुपुत्रो जायेत, क्वचितपि कुमाता न भवती! अनेक वेळा मांजरी आपल्या दातात पिल्लू धरून उंचावरून उडी मारते, पण पिल्लाला काही इजा होऊ देत नाही. रस्त्यावर कुत्री आपल्या पिल्लाला प्रेमाने चाटते. अलीकडे एक गाय एका गाडीभोवती फिरताना पहिली. ती त्या गाडीला हलवू देत नव्हती. पुष्कळ जणांनी हा विडीओ पहिला, आश्चर्य व्यक्त केले पण त्यातील गोम कोणीतरी सांगितली की काही दिवसांपूर्वी याच गाडीचा धक्का बसून त्या गायीचे पाडकु मेले होते. तिला आपल्या वासराचा गंध तिथे येत होता … ती त्यावेळी गाय/जनावर नव्हती तर होती एक आई.

आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण वातावरणात तिच्यासाठी एक सपोर्ट म्हणजे आधार देणारी व्यवस्था असली तर तिला आपली व्यवधाने सांभाळताना आनंद वाटेल. भारतीय समाजमन आणि स्वत: स्त्री मग ती कोणत्याही स्तरावरची शिकलेली, अशिक्षित, नोकरदार, व्यावसायिक अगदी शेतात कामाला जाणारी बाई असली तरी आपले घर- मुले याला प्राधान्य देत असते. यापुढेही देईल. पण या सार्‍यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक आधार मिळतो का? जिथे तो मिळतो तिथे ती स्त्री आपले काम पुढे नेऊ शकते. आपले कर्तृत्व सिद्ध करू शकते.
आपल्या समोर कितीतरी उदाहरणे आहेत- अगदी इतिहासातील राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नमा, अहिल्याबाई होळकर, येसूबाई, राजकारणातील इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, कल्पना चावला, गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई अशी अनेक नावे समोर येतात. या आणि अनेक अशाच कर्तृत्वी स्त्रियांनी जगात वेगळे स्थान निर्माण केले.

आजकाल नवरात्रीत रंगाना फार महत्व आले आहे. आपल्या उत्सवप्रिय मनाला यातून आनंद मिळत असेल तर चांगले पण हे एवढे पुरेसे आहेत की काही वेगळे रंग या नवरात्रीला आपण लावूया …
पहिला रंग – मुलीचा गर्भ नाकारणे थांबवण्याचा.
दुसरा रंग – मुलगी मुलगा जन्मल्यावर सारखाच आनंद मानायचा (मनापासून)
तिसरा रंग – मुलगी आहे म्हणून खंत न करता तिला शिक्षण देण्याचा, तिच्या आवडीला प्राधान्य देण्याचा.
चौथा रंग – मुलीला शिकवून आपल्या पायावर उभी करण्याचा
पाचवा रंग – मुलीला समाजाकडून सहानुभूतीशिवाय जगण्याची सवय करण्याचा
सहावा रंग – बायकांवर येणारे खोटे अतिरंजित आणि आकसयुक्त विनोद न पाठवण्याचा
सातवा रंग – मुलीला सन्मानाबरोबर कुटुंब आणि समाज याप्रती असणार्‍या कर्तव्याची जाणीव देण्याचा
आठवा रंग – स्त्री केवळ शरीर न मानता माणूस म्हणून तिला योग्य तेवढा सन्मान देण्याचा
नववा रंग – स्त्रीने केवळ दिखाऊ डामडौल न स्वीकारण्याचा आणि शारीरिक सौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्याला मान देण्याचा.
दहावा आणि विजयाचा रंग – स्त्रीविषयक सहानुभूती आणि समानता दाखवणारे दिखाऊ भाषणे/लेख/कथा/कविता यापासून दूर राहण्याचा. कारण यातूनच आपण दुर्बळ आहोत अशी खोटी जाणीव स्त्रीच्या मनात रहाते.
असे सगळे रंग जर नवरात्रीत आले तर आपल्या आदिमायेची ही खरी उपासना ठरेल. तसेही कोणत्याही देवीच्या देवळात कधीही दिसते ती आई/माता. पण या नऊ दिवसात तिचे रूप सजते नटते. घटस्थापने पासून दसर्‍यापर्यंत चाललेला हा आईचा उदो उदो मी माझ्या कवितेत वेगळ्या रीतीने मांडलाय….
जुने रूप
रोज रोज नवे रूप, निर्मितीची पूजा
उत्पती स्थिती लयकारी, नाही भाव दुजा/नाही भाव दुजा,
नवे रूप दाखवणार दागिन्यांनी मढून,
मखरात झोके घेणार /मखरात झोके घेणार,
लोक पाहायला येणार
तुझ्या पाया पडणार, तू आई होणार/तू आई होणार,
नऊ दिवस पूजणार
तुझ्या नावे सत्कार होणार, जयजयकार करणार/जयजयकार करणार,
परत पूजेतील मूर्ती
गाभार्‍यात ठेवणार, आता पुन्हा जुने रूप/आता पुन्हा जुने रूप,
नेहमीचेच साधे शृंगार
आणि सात्विक चेहरा, माझ्या ओळखीचा असणार!